अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे यांची नियुक्ती झाली आहे .
सातारा जिल्ह्यातील वडूज येथे नुकत्याच पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ . जयप्रकाश घुमटकर यांनी नियुक्तीचे पत्र साहित्यिक दबडे यांना दिले आहे .
यावेळी पुणे येथील माजी न्यायाधीश रावसाहेब झोडगे , माजी पोलीस उपायुक्त विनायकराव जाधव, मंडळाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा ललिता गवांदे , राष्ट्रीय सरचिटणीस निलीमा जोशी , मंडळाचे विविध विभागाचे पदाधिकारी , चित्रपट निर्माता दिग्दर्शक गणेश शिंदे , वडुजच्या नगरसेविका आरती काळे यांच्यासहीत विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते .
माणदेशातील आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी हे दबडे यांचे गाव आहे . आटपाडीने अखिल भारतीय साहित्य संमेलनाला ग .दि.माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, डॉ . शंकरराव खरात, ना . सं . इनामदार , राजे – श्रीमंत भगवानराव पंतप्रतिनिधी असे पाच अध्यक्ष दिले आहेत . या साहित्यिकांनी आटपाडीचे नाव सातासमुद्रापार केले आहे . सुनील दबडे यांच्या निवडीमुळे माणदेशी मातीचा व माणदेशी साहित्याचा , साहित्यिकांचा गौरव झाल्याचे मत आटपाडी तालुक्यातून व्यक्त होत आहे .
सुनील दबडे हे निवृत्त प्राचार्य आहेत . त्यांनी आतापर्यंत साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृत्तिक क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाची दखल घेऊन मराठी साहित्य मंडळाने त्यांची पाच वर्षांसाठी नियुक्ती केली आहे .







