“झाले बहु, होतील बहु,आहेतही बहु, परंतु या सम हा”!!!
आज श्री.सिध्दनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खरसुंडी या शाखेचे प्राचार्य आदरणीय श्री.टी.एस.कदम सर आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत,त्यानिमित्त त्यांच्याविषयीच्या काही आठवणी सांगण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न.
इंग्रजीमध्ये एक Quotation आहे,"All good things must come to an end ''.. (प्रत्येक चांगल्या गोष्टींचा शेवट असतोच.) त्याप्रमाणे आज आदरणीय श्री. कदम सरांच्या शैक्षणिक क्षेत्रातील चांगल्या कारकिर्दीतील हा शेवटचा दिवस.खरे तर श्री. कदम सर खरसुंडी येथील शाखेमध्ये 1 सप्टेंबर 2022 रोजी रुजू झाले. मुख्याध्यापक या पदाचा कोणताही अनुभव त्यांना नव्हता,तसेच केवळ 9 महिन्यांचा कालावधी त्यांना मिळाला होता आणि या कालावधीमध्ये त्यांना खूप शालेय,प्रशासकीय कामे मार्गी लावायची होती खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी हा 20-20 सामनाच खेळायचा होता.
ते जेंव्हा हजर झाले तेंव्हाच त्यांची कार्यपध्दती सर्वांनीच ओळखली होती. “He came, he saw,he conquered”… (ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले.) या उक्तीप्रमाणे त्यांच्या आचरणाने,स्वभावाने आणि कार्यशैलीने आम्हा सर्व सेवकांची मने त्यांनी जिंकली.डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेऊन त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासमोर नतमस्तक होऊन आपल्या मुख्याध्यापक पदाचा श्री गणेशा सुरु केला,अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ते कर्मवीर भाऊराव पाटील यांना ते न चुकता वंदन करत होते.
“साधी राहणी आणि उच्च विचारसरणी”असलेले श्री. कदम सर यांनी या शैक्षणिक वर्षामध्ये प्रशालेचे प्रशासन कोणासही न दुखवता व सर्वांना समवेत घेऊन उत्कृष्ट चालवले.शालेय परीक्षांव्यतिरिक्त इतरही स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या प्रशालेचे विद्यार्थी चमकले,त्याकरिता श्री. कदम सरांची अमूल्य प्रेरणा मिळाली.विद्यार्थ्यांपासून,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी ते अतिशय नम्र भाषेमध्ये बोलत असत.त्यांच्या या कालावधीमध्ये प्रशालेने कला, क्रीडा, आरोग्य, विज्ञान प्रदर्शन,आरोग्य,सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित सर्व उपक्रम लीलया पार पाडले.आपल्या संपूर्ण सेवेमध्ये सरांनी नेहमी प्रामाणिकपणा,शिस्त व संयमाची कास धरली.या त्यांच्या चांगल्या शिदोरीमुळे अल्पावधीतच सर विद्यार्थी,शिक्षक व पालकांना आपले वाटू लागले.आपल्या अल्प कालावधीमध्ये त्यांनी आम्हा सर्वांना उत्कृष्ट मार्गदर्शन करुन आपल्या कामाचा ठसा संपूर्ण परिसरामध्ये उठवला त्यामुळे प्रशालेचे नाव सर्वदूर पोहचून, प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.आज सांगण्यास अभिमान वाटतो की,एका अध्यात्मिक, प्रामाणिक, कष्टाळू, जिद्दी, संयमी, कुशाग्र विनोदबुद्धी असलेल्या, तसेच उत्कृष्ट इंग्रजी विषयातील तज्ञ मार्गदर्शकास शिक्षणक्षेत्र मुकलेले आहे.
आपणास शेवटी आपल्या सेवा निवृत्ती नंतरच्या दुसऱ्या इंनिंगसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो,आपले जे स्वप्न अपूर्ण आहे, ते तात्काळ पूर्ण होवो, आपल्याला आरोग्यमय जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो…!!!💐💐🙏🙏
आपला नम्र,
श्री. आर आर घोटीकर.






