‘मी क्रांतिवीर पाहिला होता’ – प्रा. साहेबराव चवरे
झरे/प्रतिनिधी
झरे येथील जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था झरेचे, झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात पद्मभूषण, क्रांतिकारक व आटपाडी तालुक्यातील पाणी चळवळीचे प्रणेते डॉ. नागनाथ आण्णा नायकवडी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पद्मभूषण क्रांतिवीर डाॅ. नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर व सचिव भीमाशंकर स्वामी सर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी बोलताना प्रा. साहेबराव चवरे सर म्हणाले की, ज्याप्रमाणे ग. दि. माडगूळकर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबाबतीत म्हणाले होते की, ‘मी सिंह पाहिला होता’ त्याप्रमाणे पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या रुपात ‘मी क्रांतिवीर पाहिला होता’. असे ते मोठ्या अभिमानाने म्हणाले.
पद्मभूषण क्रांतिवीर डाॅ. नागनाथ आण्णांनी पाणी चळवळ सुरू केली नसती तर 13 दुष्काळी तालुक्यांचा पाण्यासाठी कोणीही विचार केला नसता. आटपाडी, सांगोला तालुक्यात पाणी आणणाऱ्या पद्मभूषण क्रांतिवीर डाॅ. नागनाथ आण्णा नायकवडी नावाच्या भगिरथाने 13 दुष्काळी तालुक्यांचे नंदनवन केले. अशा भगिरथास त्यांनी विनम्र अभिवादन केले.
ते पुढे बोलताना म्हणाले की, सांगली जिल्ह्यातल्या वाळव्यातल्या एका शेतकरी कुटुंबात 15 जुलै 1922 साली त्यांचा जन्म झाला. मॅट्रिकचे शिक्षण अर्ध्यात सोडून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला.
१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात अगदी तारुण्यात आपल्या मुठीत क्रांतीचा अंगार घेऊन ते घरात पुन्हा पाऊल न ठेवण्याची शपथ घेऊन घराबाहेर पडले. धुळ्याजवळ चिमठाण्याचा खजिना लुटण्यात त्यांचा सहभाग होता.
यावेळी बोलताना संस्थेचे सचिव भीमाशंकर स्वामी सर म्हणाले की, 1957 आणि 1985 असे दोन वेळा वाळवा मतदार संघातून ते विधानसेभेवर निवडून गेले. नागनाथ आण्णांनी राजकारणात आपली एक वेगळी छाप निर्माण केली होती. 1985 साली विधानसभेची निवडणूक लढवत असताना त्यांना ‘सिंह’ हे निवडणूक चिन्ह म्हणून मिळाले होते. पण अण्णाचे कार्यकर्ते एवढे तयारीचे होते की, निवडणूक प्रचारात त्यांनी खराखुरा ‘सिंह’ प्रचाराला आणला होता.
पुढे बोलताना ते म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर काळात नागनाथ आण्णांनी गावात बालवाडी काढली. मग शाळा, मग हायस्कूल आणि मग सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मदतीने ‘हुतात्मा किसन अहीर’ साखर कारखाना काढला. महाराष्ट्राला भूषण ठरलेल्या काही मोजक्या हस्तींमध्ये पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे नाव अग्रस्थानी येते.
यावेळी पाणी चळवळीचे कार्यकर्ते, शेतकरी तसेच पालक व विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वाघमारे सर यांनी केले. तर आभार प्रविण पारसे सर यांनी मानले.







