पावसा अभावी तलावा सह नदी-नाले कोरडेठाक
त-हाडी सह परिसर अजूनही तहानलेला…
त-हाडी
शिरपूर तालुक्यात रिमझिम पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी कशीबशी आटोपली आहे. मात्र पावसाला जोर नाही, परिणामी परिसरातील तलावासह नदी-नाले अजूनही कोरडेठाक आहे. पुष्य नक्षत्रात आता जोरदार पाऊस पडावा, अशी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची अपेक्षा आहे. दरम्यान, रविवारी (ता. २२) पावसाची रिमझिम झाली.
जुलै महिन्याचा तिसरा आठवडा सरला आहे. मात्र त-हाडी सह परिसरात जोरदार पाऊस पडलेला नाही. यापूर्वी पडलेल्या थोड्या बहुत पावसावर त-हाडी ,वरुळ, भटाणे जवखेडा, त-हाडकसबे, अभानपुर ,जळोद ममाणे, भामपुर येथील शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. अनेकांना ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था करावी लागली. मात्र जोरदार पाऊस नसल्याने बोरवेल पाणीपातळीही घटू लागली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
सध्या रिमझिम पावसामुळे मका तूर,मुग उडीद कपाशीच्या पिकाला काहीसा आधार झालेला आहे. मात्र ऊसा सह फळबागांवरील संकट कायम आहे. दरवर्षी या कालावधीत ओढे नदी नाले दुथडी वाहत असतात. यंदा पाऊस नसल्याने नदीचे पात्र अजूनही कोरडेच आहे. त्यामुळे परिसरातील छोट्या मोठ्या पाझर तलावाची अशीच स्थिती आहे.
सध्या शेतात पिकांच्या अंतरमशागतीची कामे सुरू आहेत. कीटकनाशकाची फवारणी शेतकरी करीत आहेत.
चौकट:-
पावसाला जोर नसल्याने पिकांवर रोगराई पडत आहे. त्यातही कपाशीवर कोकडा व इतर रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना औषधी फवारणीवर खर्च करावा लागत आहे.
विशाल कंरके, शेतकरी, त-हाडी
चौकट:-
सध्या मकाचे पीक पिवळे पडू लागले आहे. पिकावर रोगराईचे सावट आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
रतिलाल शिंदे शेतकरी ममाणे
चौकट:-
पपईवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे पपई काळसर पडत असून पपईची गळ होत आहे.
तसेच बुरशीजन्य रोगामुळे नुकसान झालेल्या फळांना बाजारातही समाधानकारक भाव मिळात नाही. त्यामुळे शेतकन्यांना नुकसान सोसावे लागले.
कैलास कंरके शेतकरी, त-हाडी







