गावागावांत अंगत-पंगत होत आहे कालबाह्य
आता शाळा, कार्यालये, शेतांतच खाल्ला जातो एकत्रित डबा
त-हाडी:-लहान मुलं जेवत नव्हती, त्यांना खेळवत कडेवर घेऊन दारा-अंगणात फिरत घास खाऊ घालावा लागायचा, कधी चिमणी कधी कावळे, मांजर, कुत्र्यांच्या पिलाजवळ तर कधी कावळ्याला तुकडा टाकून एक घास काऊचा, एक घास चिऊचा करून जेवू घालावे लागत होते. त्यातूनच मुलं थोडी मोठी झाली की जेवणाची गोडी लागावी म्हणून लहानलहान मुलं हौशीने अंगतपंगत करायची. कुणाची कांदा-भाकर, कुणाची दही-साखर, कुणाची तूप-पोळी यायची. आग्रहाने एकमेकांना चटणी, भाजी, ठेचा, लोणचं वाढलं जायचं. यातून लहान मुलं पोटभर जेवायची आणि उड्या मारत खेळायची. आज हा प्रकार क्वचितच नजरेस पडतो.
गेल्या दोन-तीन दशकांपासून ग्रामीण भागातील मुलांची अंगत-पंगत कालबाह्य झाली आहे. तर दुसरीकडे शाळा, कॉलेज, विविध कार्यालये, कंपन्या, व शेती शिवारांत शेतमजूर मात्र एकत्रित डबा खात गप्पात रंगून जात असल्याचे चित्र आहे. वीस वर्षांपूर्वीचा बालपणीचा काळ सुखाचा होता. सोशल मीडियाचाही गाजावाजा नव्हता. मित्रांसोबतच दिवस घालवावा लागायचा.अगदी जेवण, शाळा, ट्यूशन, खेळ, अभ्यास यात कधी वेळ निघून जायचा कळत नव्हतं. मुले जेवतानाही एकटी जेवत नव्हती. मित्र-मैत्रिणी आपआपल्या घरून ताट वाढून घेऊन येत असतं आणि एकत्रित बसून एकमेकांच्या अन्नपदार्थांची देवाण-घेवाण करीत असतं. गप्पागोष्टींत रंगत हसत-खेळत जेवण करीत होते. कुटुंबातील काही मंडळीही मुद्दाम यासाठी प्रोत्साहन देत होती. मात्र आज ही अंगतपंगत दिसून येत नाही.
चौकट:- एकत्र बसून डबा खाल्ल्यामुळे विद्यार्थ्यांना एकमेकांचे वेगवेगळे पदार्थ, भाज्या खाण्याची सवय होती. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्यही चांगले राहते. विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी कमी होतात. शिवाय डब्यात असलेला कुठलाही पदार्थ खाण्याची इच्छा होते.
रावसाहेब चव्हाण
कै आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय त-हाडी शिक्षक
चौकट:- जुन्या काळी आम्ही अंगत- पंगत करायचो. कालांतराने ही पद्धतच बंद पडली.
आता शाळेत विद्यार्थी एकत्रित बसून डबा खातात. यामुळे बालपणीची आठवण येते. एखाद्याने डबा नाही आणला तरी इतर मित्र एकमेकांना सामावून घेतात. यामुळे एकात्मतेची भावना वाढते शिवाय विद्यार्थी हसतखेळत पोटभर जेवण करतात.
देविदास मोरे
शिक्षक त-हाडी
चौकट:- मधल्या सुटीत एकत्रित बसून डबा खाण्यात मोठा आनंद वाटतो. आपण कुटुंबासोबत जेवत असल्याचा भास होतो. आम्ही सर्व मैत्रिणी, शिक्षक एकमेकांना आपापल्या डब्यातील पदार्थांची देवाण-घेवाण करतो. गप्पागोष्टी करत, हसत खेळत आम्ही डबा खातो.
- संदिप खोंडें, विद्यार्थी







