घ्या समजून राजे हो !!
*उद्धवपंतांनी आता ही नौटंकी थांबवावी..
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: अचानक हातून सत्ता गेली म्हणजे कोणताही माणूस पिसाळल्यासारखा करतो. प्रसंगी ताळतंत्र सोडून वागतो. त्याच्या वागण्यात काहीच थरबंध राहत नाही.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे यांची अवस्था काहीशी अशीच झालेली आहे. दररोज ते काही ना काही नवीन विधाने करतात. बरेचदा त्यात काहीही अर्थ नसतो. मात्र अशी निरार्थक विधाने ते सध्या दररोज राणा भीमदेवी थाटात करत असतात. नुसतीच विधाने करून थांबत नाहीत, तर ते अशी निरर्थक कृतीही करत असतात.
अशीच कृती गेल्या दोन दिवसांपासून उद्धवपंत करीत आहेत. त्यामुळे ते उभ्या महाराष्ट्रासमोरच नाही तर देशासमोरही हास्यास्पद ठरले आहेत. मात्र त्यांना त्यांचे भानच नाही. इतकेच काय पण या प्रकारात ते प्रसंगी स्वतःविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील ओढवून घेऊ शकतात अशी परिस्थिती आहे. मात्र उद्धवपंताना त्याचे भान नाही.
झाले असे की दोन दिवसांपूर्वी उद्धवपंत यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी येथे हेलिकॉप्टरने निवडणूक प्रचार सभेला केले होते. हेलिकॉप्टर मधून खाली उतरल्यावर निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांची बॅग तपासायला मागितली. त्यावरून उद्धवपंत गरम झाले. त्यांनी त्या अधिकाऱ्यांना त्यांचे ओळखपत्र मागितले आणि त्यांचीच उलट तपासणी सुरू केली. तुम्ही माझ्या बॅगा तपासता तशा नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे (इथे मिंधे असा उल्लेख आहे) अजित पवार यांच्या बॅगा तपासात नाही का असा सवालही त्यांनी केला. मोदींच्या बॅगा तपासा आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करा असा दमही त्यांनी या अधिकाऱ्यांना भरला. तुम्ही आज माझ्या बॅगा उघडा पुढे मी तुम्हाला उघडतो अशीही तंबी त्यांनी दिली.
त्यानंतर झालेल्या जाहीर सभेतही त्यांनी या प्रकाराचा उल्लेख केला. मोदी शहा हे काही वेगळे नाहीत. त्यांच्या बॅगा का तपासल्या जात नाहीत असा सवाल पुन्हा एकदा त्यांनी केला आणि देशातील आणि राज्यातील भाजप सरकार विरोधकांना त्रास देण्यासाठी अधिकारांचा वापर करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकाराचे राजकीय पडसाद उमटणे सहाजिकच होते. त्यानुसार उमटलेही संजय राऊत, वर्षा
गायकवाड, सुप्रिया सुळे,नाना पटोले, विजय वडेट्टीवार प्रभृत्तींनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या प्रतिक्रियाही दिल्या.
या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी उद्धवपंत लातूर जिल्ह्यातील औसा येथे प्रचार सभेसाठी हेलिकॉप्टरने गेले होते. तिथेही त्यांच्या बॅगा तपासायला मागितल्या. पुन्हा एकदा उद्धवपंत संतापले. त्यांनी या अधिकाऱ्यांचे ओळखपत्र, नेमणूक पत्र तर मागितलेच, पण त्यांचे पैशाचे पाकीट, त्यांची नेमणूक कधी झाली, त्यांनी आजवर किती जणांच्या बॅगा तपासल्या इत्यादी चौकशी सुरू केली. त्यांनाही मोदी शहांच्या जागा का तपासल्या नाही असा सवाल केला.
उद्धवपंतांच्या दोन दिवसातल्या या कृती राजकीय वर्तुळातच नव्हे, तर सामान्य नागरिकांमध्येही चर्चेचा विषय ठरला आहे. वस्तूतः निवडणुकीची आचारसहिता लागली की लोकप्रतिनिधींचे अधिकार गोठलेले असतात. सर्व सूत्रे ही निवडणूक आयोगाच्या आणि त्यावेळी त्यांच्या हाताखाली असलेल्या शासकीय यंत्रणेच्या शासकीय हातात असतात. त्यामुळे हे निवडणूक आयोगाच्या आधीन असलेले शासकीय अधिकारी आणि कर्मचारी कोणाच्याही बॅगा तपासू शकतात आणि कोणतीही चौकशी ते करू शकतात. त्याला कोणीही अडथळा निर्माण करू शकत नाही.
उद्धवपंतांची ही घटना आणि त्यानंतर त्यांनी व्यक्त केलेला संताप हा जाहीर होताच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी प्रभृतींच्या बॅगाही तपासल्या गेल्याचे त्या त्या व्यक्तींनी जाहीर केले. त्यामुळे फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांच्याच आणि त्यातही उद्धवपंत ठाकरेंच्याच त्या तपासल्या जातात असा जो त्रागा होता तो निरर्थक होता हे स्पष्ट झाले. निवडणूक काळात आधी नमूद केल्याप्रमाणे सर्व अधिकार निवडणूक आयोगाच्या हातात असतात. लोकप्रतिनिधींचे फारसे काही चालत नाही. त्यामुळे अगदी पंतप्रधान यांची सुद्धा बॅग तपासली जाऊ शकते. या प्रकरणात निवडणूक आयोगाने ही खुलासा केला आहे की ही तपासणी हे आमचे रुटीन प्रोसिजर आहे. यात कोणताही भेदभाव केला जात नाही.
आता उद्धवपंतांनी निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरत तुम्ही मोदी आणि शहांच्या बॅगा तपासा आणि मला व्हिडिओ पाठवा असा दम भरला आहे. त्याकडे आपण वळूया. मोदी शहा हे आज देशातील अतिविशिष्ट व्यक्ती आहेत. ते विमान प्रवासाला निघतात तेव्हा त्यांच्यासोबत निवडक अधिकारी असतातच.
हे अधिकारी विमानात चढण्यापूर्वीच या नेत्यांच्या सोबत असलेले सामान सिक्युरिटी चेक मधून तपासून घेत असतात. तसेच उतरल्यावरही तपासणीची व्यवस्था हे अधिकारीच करत असतात. परिणामी मोदी शहा किंवा तत्सम दर्जाचे लोकप्रतिनिधी हे रिकाम्या हातानेच चढताना किंवा उतरताना दिसतात. साधारणपणे राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री अशा दर्जाच्या मंत्र्यांना तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हा मान दिला जातो. त्यात वावगे काहीही नाही. त्यामुळे मोदी आणि शहांचा उल्लेख करत त्यांच्या बॅगा तपासणार का ही उद्धव पंतांची मागणी हास्यास्पदच ठरते. इथे मला एक प्रसंग आठवतो. मी तत्कालीन संरक्षण मंत्री पी.व्ही. नरसिंहराव यांच्या समावेत काही वेळा हेलिकॉप्टरने प्रवास केला आहे. त्या काळात नरसिंहराव यांच्या समवेत कोण प्रवास करणार आहे तसेच नरसिंहरावंसोबत कोणते सामान आहे याची सर्व माहिती त्यांचे तत्कालीन विशेष कार्य अधिकारी राम खांडेकर देत असत. आणि सामानाची तपासणीही करून घेत असत. नरसिंहराव साहेब स्वतः येऊन फक्त विमानात किंवा हेलिकॉप्टर मध्ये बसायचे आणि विमानाने टेक ऑफ घ्यायचा.
वस्तुतः भारतीय राज्यघटनेनुसार निवडणूक आयोगाला विशेष दर्जा आहे. त्याला विशेष अधिकारही आहेत. उद्धवपंत राजकीय क्षेत्रात वावरत असल्यामुळे त्यांनी राज्यघटना वाचली असावी असे समजायला हरकत नाही. निवडणूक काळात जे शासकीय अधिकारी निवडणूक सेवेत असतात त्यांनाही ते अधिकार असतात. मात्र ते अधिकार धाब्यावर बसवून उद्धव पंत या अधिकाऱ्यांना धारेवर धरू बघतात. वस्तूतः ते अधिकारी उद्धवपंतांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास नाकारू शकत होते. मात्र त्यांनी उद्धव पंतांचा मान ठेवून त्यांना उत्तरे दिली., हा त्यांचा चांगुलपणा, मात्र त्यांनी नाकारले असते तर उद्धवपंतांची काय अवस्था झाली असती याचा विचार त्यांनी करायला हवा. हे अधिकारी शासकीय अधिकारी आहेत. त्यामुळे कर्तव्यावर शासकीय सेवेत आहेत. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ते उद्धवपंतांविरुद्ध गुन्हेही दाखल करू शकतात याचे भान उद्धव पंतांनी ठेवायला हवे.
दुसऱ्या दिवशी झालेला प्रकार त्यांनी पुन्हा औसा येथील सभेत जाहीररित्या सांगितला. त्यानंतर त्यांनी आणखी एक प्रकार सांगितला. त्या दिवशी औसा येथून ते सोलापूरजवळ जाहीर सभेला जाणार होते. मात्र त्यावेळी सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा होती. मोदी सभेला येणार असल्यामुळे आणि ते अतिविशिष्ट व्यक्ती असल्यामुळे ज्या विमानतळावर मोदींचे विमान उतरणार होते तेथे आगे मागे दोन तास कोणतीही विमाने किंवा हेलिकॉप्टर उतरवण्याची मनाई करण्यात आली होती. त्याचा उल्लेख करीत औसा येथील सभेत उद्धवपंतांनी चांगलीच आगपाखड केली. ही आगपाखडही चर्चेचा विषय ठरली आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, गृहमंत्री , संरक्षण मंत्री ही सर्व मंडळी आधी नमूद केल्याप्रमाणे अतिविशिष्ट व्यक्ती म्हणून ओळखले जातात. या व्यक्तींच्या प्रवासादरम्यान घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींच्या प्रवासाच्या वेळी विशेष काळजी घेतली जाते. अशा व्यक्तींचे विमान उड्डाण करणार असेल किंवा उतरणार असेल त्यावेळी मागेपुढे तासभर तरी इतर विमानांना उड्डाण किंवा उतरण्यास परवानगी दिली जात नाही. ही नित्य नियमित प्रथा आहे. उद्धवपंत राजकीय क्षेत्रात दीर्घकाळ वावरले आहेत. त्यामुळे त्यांना ही प्रथा माहीत नसेल असे वाटत नाही. तरीही त्यांचा निरर्थक कांगावा का हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडू शकतो. इथे एक २००८ सालचा संदर्भ आठवतो.
त्यावेळी महाराष्ट्रात विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकांचे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. काँग्रेस पक्षाने सुबोध मोहिते यांचे नाव त्या जागेसाठी निश्चित केले होते. सुबोध मोहिते अर्ज दाखल करण्यासाठी नागपूरहून निघाले. विमानाने ते पुण्यात आले. पुण्याहून शासकीय हेलिकॉप्टरने ते मुंबई येथे येणार होते. त्यानुसार ते हेलिकॉप्टर मध्ये बसले. मात्र त्यावेळी पुण्याहून तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे विमान उडाण करणार होते. परिणामी सर्वच विमानांना उडाण करण्याची परवानगी नाकारली. यात मोहित्यांचे हेलिकॉप्टर देखील अडकले. परिणामी ते अर्ज दाखल करायला वेळेत मुंबईला पोहोचू शकले नाहीत. ते पोहोचू शकत नाहीत असे बघून तत्कालीन काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांच्या जागी दुसऱ्या उमेदवाराला अर्ज दिला. मोहित्यांची संधी त्यावेळी हुकली. त्याला कारण अतिविशिष्ट व्यक्तींचे विमान प्रवास हेच ठरले होते.
गेले तीन दिवस झाले उद्धव ठाकरेंची या सर्व प्रकारात आगपाखड सुरू आहे. मोदी आणि शहा तसेच शिंदे आणि फडणवीस यांच्यावर त्यांची आरडाओरड सुरू आहे. अर्थात त्यामागे हातून गेलेली सत्ता, हातून निसटलेला पक्ष आणि झालेली निराधार अवस्था हीच कारणीभूत आहे.
अशी निराधार अवस्था झाल्यामुळे उद्धवपंत सध्या ताळतंत्र सोडून वागत असल्यासारखे दिसते आहे. माझ्यावर अन्याय होतो आहे असे म्हणत त्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना अकारण धारेवर धरत आहेत. त्यांचे हे वागणे महाराष्ट्रातील सामान्य जनता बघते आहे आणि त्याकडे नौटंकी म्हणून दुर्लक्षही करते आहे.
आपले हे असे वागणे सर्वसामान्य नागरिकांच्या मते नौटंकी ठरते आहे. हास्यास्पद ठरते आहे. याचे भानही उद्धव पंतांना नसावे हे खरे दुर्दैव मानावे लागेल. त्यांच्याभोवती असलेले संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल परब यांच्यासारखे भाट देखील त्यांना भानावर आणत नाहीत हे देखील आणखी एक दुर्दैव मानावे लागेल.
असे असले तरी शिवसेनेला एक इतिहास आणि परंपरा आहे. ठाकरे घराण्यालाही एक इतिहास आहे. तो इतिहास, ती परंपरा कायम राखावी यासाठी तरी उद्धवपंतांनी भानावर यावे आणि ही नौटंकी थांबवावी अशी सर्वसामान्य मराठी माणसाची अपेक्षा आहे.
वाचकहो पटतेय का तुम्हाला हे ? त्यासाठी आधी समजून तर घ्या राजे हो….