कोल्हापूर दि . २३ ( माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल )
जोतिबा येथील मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी जोतिबा डोंगर येथे पारंपारिक पद्धतीने नगरप्रदक्षिणा (दिंडी) सोहळा झाला.
भाविका विना निघालेल्या दिंडी मार्गावर सोशल डिस्टंसिंगचा वापर करीत नगर प्रदक्षिणा पूर्ण केली . दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी ही नगरप्रदक्षिणा काढली जाते.
जोतिबा डोंगराभोवतालची बारा ज्योतिर्लिंगे व अष्टतीर्थ यांच्या दर्शनासाठी भाविक प्रदक्षिणेत सहभागी होतात. जोतिबा डोंगरा सभोवती ३० कि .मी . चा अनवाणी जमिनीवर खाली न बसता ही दिंडी पुर्ण केली जाते .सोमवारी सकाळी मंदिरात धार्मिक विधी झाला .श्रींचे दर्शन घेतल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत दिंडी निघाली . दिंडी मुख्य मंदिरातूत दक्षिण दरवाजातून गजगतीने मार्गस्थ झाली. अग्रभागी वीणाधारी गजानन डवरी सोबत पताका होता .सकाळी दहा वाजता दिंडी गायमुख तलाव येथे आली. तेथील श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिरात धार्मिक विधी झाला . दिंडी पुन्हा मार्गस्थ झाली. साडेअकरा वाजता दिंडी जोतिबा धडस खळा येथे आली. तेथून ती नंदीवन, आंबावन, नागझरी, , व्याघजाई तीर्थ, तसेच अष्टतीर्थाचे दर्शन घेऊन दिंडी मुरगुळा येथे आली.
दिंडी पुन्हा दानेवाडी मार्गे सारकाळ येथे दिंडी आली.गिरोली (ता. पन्हाळा) येथे आली. तेथील श्री निनाई मंदिरात विविध धार्मिक विधी व आरती झाली. येथेच एका दगडावर सातार्डेकर शिवारामध्ये बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती कोरल्या आहेत. तेथे आरती करून दर्शन घेतले.पुन्हा गायमुख येथे आली . तेथून जोतिबा मंदिरमार्गे पुन्हा श्री मूळमाया यमाई मंदिरात सांय ६.३० वाजता नगर दिंडी आली. सुंठवडा वाटपाने नगरप्रदक्षिणेची सांगता झाली . पोलिस बंदोबस्त तैनात होता . जोतिबा डोंगरवर भाविकांना प्रवेश बंदी केली होती . दुसऱ्या वर्षीही नगर दिंडी भाविका विना झाल्यामुळे व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला .







