कोकणचा विषारी विकास: लोटे एमआयडीसीतील ऐतिहासिक लढा आणि कंपनीला गावकऱ्यांचा थेट इशारा!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
आज सोमवार दिनांक ६ एप्रिल, २०२६ रोजी रत्नागिरीतील लोटे परशुराम एमआयडीसीच्या मातीवर उसळलेला हा जनसागर केवळ एक आंदोलन नाही – हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि कोकणच्या अस्तित्वाचा निर्णायक हुंकार आहे. ३ एप्रिल २०२६ रोजी कंपनीने घेतलेल्या पत्रकार परिषदेतील दिशाभूल करणाऱ्या दाव्यांना छेद देत, आज कोकणची जनता आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरली आहे.
सर्वप्रथम, या लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या कोंकण नागरी संघर्ष समिती आणि लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि लोटे परिसरातील स्वाभिमानी गावकऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
१. श्री. अशोकराव वासुदेव जाधव आणि श्री. राजेंद्र गोपीनाथ आंब्रे: २१ जानेवारी २०२६ पासून लक्ष्मी कंपनीच्या गेटसमोर जिद्दीने धरणे आंदोलनाला बसून तुम्ही या लढ्याची मशाल पेटती ठेवली आहे.
२. श्री. सचिन सुभाष चाळके (अध्यक्ष): आपल्या खंबीर नेतृत्वामुळे आज हे आंदोलन एका विराट जनआंदोलनाचे रूप घेऊ शकले आहे.
३. श्री. अविनाश सदाशिव आंब्रे (उपाध्यक्ष), श्री. रवींद्र हरिश्चंद्र गोवळकर (उपाध्यक्ष/सचिव) आणि श्री. दिलीप बाबू घाग (सचिव): आपल्या नियोजनामुळे हा लढा तांत्रिक आणि कायदेशीरदृष्ट्या भक्कम झाला आहे.
ज्या ग्रामसभांनी या विनाशकारी प्रकल्पाच्या विरोधात ठराव पास करून लोकशाहीचा मार्ग निवडला, त्या सर्व गावकऱ्यांचे आणि तयांना पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे हे सामूहिक यश आहे.
PFAS: आपल्या रक्तातील विष आणि मानवी जीवनावरील आघात
PFAS हे केवळ एक रासायनिक नाव नाही, तर ते एक भयानक विष आहे. याला फॉरेव्हर केमिकल म्हटले जाते कारण ते निसर्गात कधीही नष्ट होत नाही. हे विष पाणी, माती आणि अन्नाद्वारे मानवी शरीरात शिरून कर्करोग आणि यकृताचे गंभीर आजार निर्माण करते. सर्वात भयावह बाब म्हणजे, हे विष मानवी जनुकांवर परिणाम करून पुढच्या पिढ्यांमध्ये जन्मजात व्यंग निर्माण करू शकते. लक्ष्मी ऑर्गनिक इंडस्ट्रीज झिरो लिक्विड डिस्चार्जचा कितीही दावा करत असली, तरी हे विष जमिनीत झिरपून भूजल कायमस्वरूपी विषारी करते. अलीकडेच झालेले टँकर अपघात हे या विषाच्या अनियंत्रित धोक्याचे जिवंत पुरावे आहेत.
महाराष्ट्र धर्माचे रक्षण: रयतेच्या आरोग्यासाठी एल्गार
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभे केले, जिथे प्रजेचे रक्षण हाच सर्वोच्च धर्म होता. आज जर आपल्या माता-भगिनींच्या आणि मुलांच्या रक्तामध्ये हे विष कालवले जात असेल, तर गप्प बसणे हा महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे. आपल्या मातीचे आणि पाण्याचे रक्षण करणे हाच आमचा खरा महाराष्ट्र धर्म आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील कलम २१ नुसार स्वच्छ आणि सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार हा आपला मूलभूत अधिकार आहे. हे विष पसरवून आमचा हा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही.
इटलीतील गुन्हेगारीचा वारसा कोकणात का?
इटलीमध्ये ज्या मिटेनी कंपनीमुळे साडेतीन लाख लोक बाधित झाले आणि ज्यांच्या अधिकाऱ्यांना कठोर सजा झाली, तोच विषारी प्रकल्प कोकणात का आणला जात आहे? प्रगत देशांनी ज्या रसायनांना मानवी जीवनासाठी घातक मानून नाकारले आहे, त्यांची विषारी प्रयोगशाळा आमचा कोकण का बनवला जात आहे?
प्रमुख आणि कायदेशीर मागण्या
राज्यातील जनतेची लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीला आणि सरकारला स्पष्ट ताकीद आहे:
१. प्रकल्प स्थगिती: जोपर्यंत सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत PFAS प्रकल्पाचे काम तातडीने थांबवावे.
२. EIA अहवाल सार्वजनिक करा: पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अहवाल आणि सामाजिक परिणाम अहवाल त्वरित स्थानिक मराठी भाषेत प्रसिद्ध करावा.
३. स्वतंत्र ऑडिट: गावकऱ्यांनी नियुक्त केलेल्या स्वतंत्र तज्ज्ञ समितीद्वारे कंपनीचे पर्यावरणीय आणि तंत्रज्ञान ऑडिट करण्यात यावे.
४. पारदर्शकता: टँकर अपघातात नेमके कोणते घातक रसायन होते आणि त्याची विल्हेवाट कशी लावली, हे जनतेला स्पष्ट करावे.
५. जागतिक मानके: पिण्याच्या पाण्यातील PFAS ची मर्यादा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार निश्चित करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी.
आज ६ एप्रिल २०२६ रोजी झालेला हा मोर्चा ही केवळ सुरुवात आहे. जर कंपनीने आपल्या आडमुठ्या भूमिकेचा फेरविचार केला नाही, तर हा लढा अधिक तीव्र केला जाईल आणि भविष्यात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल. आमची जमीन, आमचे पाणी आणि आमच्या पुढील पिढीचे भविष्य आम्ही कोणत्याही कंपनीच्या नफ्यासाठी पणाला लावू देणार नाही!
आमची जमीन – आमचे पाणी, आमचा निसर्ग आमचा हक्क!
PFAS विष हटाओ – कोंकण बचाओ!





