*माझंही मत*;*अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड*;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.शिल्लक शिवसेनेचे एक आमदार आणि उद्धवपंत ठाकरेंचे एक निकटवर्ती अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना एकत्र याव्या अशी अपेक्षा व्यक्त करत अन्यथा भाजप शिवसेनेला संपवून टाकेल अशी भीती व्यक्त केली आहे.
तोच राग पुढे आळवत शिंदे यांच्या शिवसेनेचे दुसरे आमदार अब्दुल सत्तार यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या नाहीत तर भाजप हळूहळू आम्हाला संपवत नेईल. आता भाजपने हात पाय तोडत फक्त आमचे मुंडकेच कापायचे ठेवले आहे अशी टीका केली आहे. ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने मता बॅनर्जींच्या तृणमल काँग्रेसला संपवले त्याचप्रमाणे ते आम्हाला संपवतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे जोरदार राजकारण रंगलेले काल बघायला मिळाले.वस्तुतः कोणत्याही पक्षाला दुसरा मोठा पक्ष संपवत नसतो तर तो पक्ष त्यातील नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या चुकांमुळेच संपत असतो. शिवसेना आतापर्यंत का फुटली याचा इतिहास तपासला तर भाजपचा कुठेही हात नाही हे स्पष्ट दिसते.
१९९२ मध्ये सर्वप्रथम छगन भुजबळांसोबत १५ आमदार शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा मंडल आयोगाचा मुद्दा हाती घेत भुजबळ यांनी राम राम ठोकला होता. भुजबळांना मंडल आयोगाबद्दल बाळासाहेबांनी घेतलेली भूमिका मान्य नव्हती, त्याचप्रमाणे मनोहर जोशी इतकेच ताकदवान आणि ज्येष्ठ नेते असूनही भुजबळांना संधी मिळत नव्हती हे देखील त्यांचे दुःख होते. त्यांच्या बाहेर निघण्याला भाजपा नव्हे तर शरद पवार कारणीभूत झाले होते. १९९८ मध्ये सुरेश नवले, गणेश नाईक, आणि गुलाबराव गावंडे शिवसेना सोडून बाहेर पडले, तेव्हा देखील ते शरद पवारांच्या काँग्रेसमध्येच पोहोचले होते. म्हणजे इथेही भाजपचा काहीही हात नव्हता.
२००५ मध्ये नारायण राणे शिवसेनेतून १५-१६ आमदार घेऊन बाहेर पडले, त्यावेळी तिथे उद्धव ठाकरेंनी त्यांना बाहेर पडण्यास बाध्य केले असे इतिहास सांगतो. त्यावेळी राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले होते, भाजपमध्ये नाही. नंतर २००६ मध्ये राज ठाकरे जेव्हा शिवसेनेला रामराम ठोकून बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली तेव्हाही त्यांना दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंचे वर्तनच कारणीभूत ठरले होते. त्याचवेळी राज ठाकरेंना आतून पाठिंबा देणारे शरद पवार होते असे त्यावेळी उघडपणे बोलले गेले होते. २०२२ मध्ये ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदार घेऊन शिवसेनेला जय महाराष्ट्र केला,
त्यावेळी देखील तिथे भाजपाचा काहीही हात नव्हता असे इतिहास सांगतो. उद्धव ठाकरेंनी जी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत अभद्र युती केली, ती या सर्व मंडळींना फारशी पटत नव्हती आणि अतिरेक झाला तेव्हा त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. अशावेळी मैत्रीच्या संबंधातून भाजपाने त्यांना मदत केली तर त्यात काही फारसे चुकले असे मला तरी वाटत नाही. लोकशाहीत प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपची काहीही गरज नाही उद्धव ठाकरे स्वतःच ते काम करत आहेत. आता दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा त्यांच्यासोबत आली तरी फारसा फरक पडणार नाही हे स्पष्ट दिसते आहे. दुसरे असे की सुरुवातीच्या काळात शिवसेना आणि भाजपची युती झाली, तेव्हा २०१४ पर्यंत शिवसेनाच दादागिरी करत होती. ज्यावेळी दादागिरी असह्य झाली त्यावेळी भाजपने त्यांना रामराम ठोकला.
तेव्हाच जर भाजपने ठाकरेंनी आपले वर्तन सांभाळले असते तर कदाचित युती तुटली देखील नसती.तृणमूल काँग्रेस बद्दल बोलायचे झाल्यास तृणमूल आणि भाजपची २००४ पर्यंत मैत्री होती. तृणमूल काँग्रेसने केंद्रातील सत्तेत वाटा मिळावा म्हणून ती मैत्री केली होती. २००४ नंतर तृणमूल भाजप पासून वेगळीच झाली होती.. नंतर तृणमूलने काँग्रेस सोबत जाऊन बंगालमध्ये सत्ता मिळवली आणि नंतर आपली ताकद वाढल्यावर तिथे जो काही नंगानाच केला होता, त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली होती. केंद्र सरकारने आणि निवडणूक आयोगाने निवडणूक काळात विशेषतः एस आय आर च्या मदतीने इथले बोगस मतदार हाकलले आणि कडक सुरक्षा पुरवून मतदान घडवून आणले.
त्यामुळे तिथल्या जनसामान्यांनीच तृणमूलला नाकारलेले आहे. हे सर्व मुद्दे लक्षात येत अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांनी भाजपवर उगाच आगपाखड करू नये. आपण एक बोट समोरच्याकडे दाखवतो तेव्हा तीन बोटं आपल्याकडे वळत असतात हे त्यांनी लक्षात घेऊन आपण कुठे चुकतो आहोत आणि चुकलो आहोत याचे आत्मपरीक्षण करावे आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा. तेच त्यांच्या हिताचे ठरेल. अर्थात हे माझे मत झाले……… तुमचे स्पष्ट आणि परखड मत तुम्ही देखील मांडू शकता…




