*आठवणींच्या हिंदोळ्यावर…**आठवणी लक्ष्मणराव जोशींच्या…*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.आज सकाळीच पत्रकार मित्र विनोद देशमुख याचा फोन आला.”अविनाश लक्ष्मणराव जोशींची तब्येत क्रिटिकल आहे, ते विवेकानंद नगरच्या स्वास्थ्यम् हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत.” ही बातमी कळल्यावर आज दुपारीच त्यांना स्वास्थ्यम् हॉस्पिटलमध्ये भेटायला जाऊया असा विचारही केला. मात्र दुपारी बारापासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे तो बेत थोडा पुढे ढकलला गेला. .
..आणि अचानक दुपारी सव्वादोन च्या सुमाराला व्हाट्सअप ग्रुप वर सुधीर पाठक ची लक्ष्मणराव जोशी यांना देवाज्ञा झाल्याची बातमी वाचली. महाराष्ट्रातला एक ज्येष्ठ पत्र महर्षी आपल्याला सोडून गेल्याचे दुःख झाले. लक्ष्मणरावांचा आणि माझा जवळजवळ ५४ वर्षांपासूनचा संबंध, १९७२ मध्ये मी फ्रीलान्स फोटोग्राफर म्हणून प्रेस फोटोग्राफी करू लागलो. त्यावेळी फोटो काढून मी वेगवेगळ्या वृत्तपत्रात नेऊन देत असे. तिथेच तरुण भारतात लक्ष्मणरावांची माझी भेट झाली. त्यावेळी ते मुख्य वार्ताहर होते. नंतर घरी आल्यावर ते आपल्या दूरच्या नात्यातही आहेत असेही कळले. तेव्हापासून सतत संबंध येतच राहिला
.आज लक्ष्मणरांच्या आठवणी लिहायच्या तर असंख्य आठवणी मनात पिंगा घालत आहेत. मात्र आपल्या समवेत असलेल्या व्यक्तीतले गुण ओळखून त्याला प्रोत्साहन द्यायचे हा त्यांच्यातला एक विशेष गुण मला प्रकर्षाने जाणवला. १९७६ पासून मी दूरदर्शनसाठी वृत्त छायाचित्रकार म्हणून काम करू लागलो. त्या काळात दूरदर्शन ला फिल्म सोबत थोडक्यात बातमी लिहून पाठवावी लागत असे. काही वेळा मी बातम्या लिहिलेल्या लक्ष्मणरावांनी पाहिल्या होत्या. मला आठवते १९८३ मध्ये डॉ. विनय वाईकरांच्या “आईना एक गझल” या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ होता. तो कार्यक्रम सकाळी नऊ वाजता धनवटे रंग मंदिरात होता. त्या कार्यक्रमाचे दूरदर्शनसाठी वृत्त संकलन करण्यासाठी मी जाणार याची लक्ष्मणराव कल्पना होती.
त्या दिवशी सकाळी सात वाजताच घरच्या फोनवर मला लक्ष्मणरावांचा फोन आला. “अविनाश तू डॉक्टरांच्या कार्यक्रमाला जाणारच आहेस. तुला माझ्यासाठी एक काम करायचं आहे. आज तरुण भारतात एक महत्त्वाची बैठक आहे. त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही, आणि कोणीही वार्ताहराला पाठवू शकणार नाही. त्यामुळे तू मला बातमी लिहून दुपारी ते दे.” लक्ष्मण रावांचा हा आदेश ऐकून मी जरा दचकलोच. “लक्ष्मणराव टीव्हीसाठी छोटीशी बातमी लिहिणे ठीक आहे, पण तरुण भारत साठी मी बातमी लिहायची हे मला जमेल का?” अशी भिती मी व्यक्त करताच ते तत्काळ म्हणाले “तू चांगली बातमी देशील हा मला विश्वास आहे, तूच मला बातमी लिहून द्यायची आहे.” मग आलिया भोगासी असावे सादर या न्यायाने मी दूरदर्शनसाठी वृत्त संकलन करता करताच तरुण भारत साठी सुद्धा वृत्त संकलन केले आणि बातमी बनवली. दुपारी डॉक्टर वाईकरांच्या घरी भोजनाच्या वेळी लक्ष्मणराव आले असताना त्यांच्या हातात मी ती बातमी दिली. त्यांना हे देखील सांगितले की चुका बऱ्याच असू शकतात तुम्ही बघून घ्या. ठीक आहे मी बघतो असे त्यांनी सांगितले. आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी ती बातमी जशीच्या तशी तरुण भारतात छापून आली होती.
त्यादिवशी तरुण भारतात वार्ताहर असलेल्या एका मित्राने मला फोन करून “अव्या.. तू पुढे जाऊन आमच्या नोकऱ्या खाणार का?” असा प्रश्नही विचारला होता. त्यानंतर अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांना येणे शक्य नसले की लक्ष्मणराव मला हक्काने बातमी लिहायला लावायचे आणि ती तरुण भारतात प्रकाशित करायचे. पुढे जाऊन काही कारणाने मी दूरदर्शनचे काम बंद केले आणि मुद्रित माध्यमात पत्रकार म्हणून सक्रिय झालो. त्यावेळी लक्ष्मणरावांनी बातमी लिहून घेण्याचा माझ्याकडून करून घेतलेला सराव माझ्या बराच कामी आला. विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांवर त्यांचे विशेष प्रेम होते
. नागपूर जिल्ह्यात असलेल्या पेंच प्रकल्पावर तर त्यांनी लेखमालिकाच प्रकाशित केली होती. माझ्या मागे लागून त्यांनी पेंच प्रकल्पावर दूरदर्शनसाठी देखील एक फिचर तयार करायला लावले होते. विदर्भात काही वेगळे घडले की ते मला लगेच सांगायचे, आणि त्यावर “तू टीव्हीसाठी काहीतरी कर” अशी सूचना द्यायचे. नागपूरच्या प्रभाकरराव गोडबोले यांचे ऑटोमॅटिक गोडबोले गेट्स हे त्यावेळी विदर्भात प्रसिद्ध होते. वर्धा जिल्ह्यातील येळाकेळी येथे ऑटोमॅटिक गेट्स चा प्रयोग यशस्वी झाला तेव्हा त्या सकाळीच लक्ष्मणरांचा मला घरी फोन आला, आणि प्रभाकरराव गोडबोलेंसोबत मला त्यांनी वर्धेला पाठवून ते चित्रीकरण मला दूरदर्शन ला पाठवायला लावले होते
. मुंबई दूरदर्शनवर तो यशस्वी प्रयोग दाखवला गेल्यामुळे गोडबोले गेट्सला चांगलीच व्यापक प्रसिद्धी मिळाली होती. ते पूर्ण श्रेय लक्ष्मणरावंचेच होते. तरुण भारतात मुख्य वार्ताहर, वृत्तसंपादक, कार्यकारी संपादक अशा पायऱ्या चढत लक्ष्मणराव पुढे मुख्य संपादक झाले होते. तरुण भारतातून निवृत्त झाल्यावर ते आधी गोमंतक मध्ये, मग जळगाव तरुण भारत मध्ये, आणि मग नागपुरात लोकशाही वार्ता मध्ये मुख्य संपादक म्हणून आले होते. दैनिक लोकशाही वार्ता हे दैनिक लक्ष्मणरावांनी विदर्भात प्रतिष्ठित केले होते. तिथे देखील त्यांनी मला लिहिते केले. आधी त्यांनी दर आठवड्याला माझ्याकडून अ ब क ड या शीर्षकाचा एक स्तंभ लिहून घेणे सुरू केले. हा स्तंभ सुमारे दीड वर्ष चालला. त्यात विविध विषयांवर मी लेखन केले
. मग नंतर त्यांनी माझ्याकडून “उचलली पेन अन्” या शीर्षकाचा एक स्तंभ असाच सुमारे दोन वर्ष लिहून घेतला होता. त्यात विविध विषय मला त्यांनी हाताळायला लावले होते. २०११ मध्ये माझ्या मागोवा घटितांचा आणि कालप्रवाहाच्या वळणांवरून या दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांचे हस्ते झाला. यावेळी दोन्ही पुस्तकांवर बोलण्यासाठी लक्ष्मणराव एक अतिथी म्हणून आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी “अविनाशला फोटोग्राफर म्हणून ओळखायला लागलो. फोटोग्राफरचा तो पत्रकार कसा झाला, आणि नंतर लेखक कसा झाला ते कळलेच नाही. मात्र एक लेखक म्हणून तो आता समोर येतो आहे याचा खरंच आनंद आहे,” असे उद्गार काढले होते. २००९ पासून मी माझ्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असे.
त्याला देखील लक्ष्मणराव नेहमी सहकुटुंब उपस्थित असायचे. माझ्या नव्या घराच्या वास्तूपूजेला ते आवर्जून आले होते त्यावेळी ते गोव्यात होते. तरीही ते उपस्थित राहिले होते. २०२० मध्ये माझ्या दृष्टिक्षेप या वैचारिक लेखसंग्रहाचे प्रकाशन तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचे हस्ते झाले होते. या पुस्तकासाठी मी लक्ष्मणरावांना प्रस्तावना मागितली होती. त्यांनी दिलेल्या प्रस्तावनेचे शीर्षकच “जो स्वयेची कष्ट गेला, तोचि भला” असेच दिले होते, आणि त्यात पत्रकारितेत मला कराव्या लागणाऱ्या संघर्षावर प्रकाश टाकला होता. मी रामटेकच्या गडावरून या नियतकालिकाचा दरवर्षी दिवाळी अंक प्रकाशित करत असे. त्यातही लक्ष्मणरावांना लेख मागितल्यावर ते आवर्जून लेख देत असत. वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यावर ते लोकशाही वार्तातून निवृत्त झाले. मात्र त्यानंतरही अगदी दोन वर्षांपूर्वीपर्यंत ते समाज माध्यमावर नियमित लेखन करीत असत.
विशेषतः चालू घडामोडींवर त्यांचे लेखन असायचे. वयापरत्वे त्यांचे वाहन चालवणे बंद झाले होते. मला आठवते दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमासाठी आदल्या दिवशी मला त्यांचा फोन यायचा, आणि “अविनाश, तू सकाळी कार्यक्रमाच्या वृत्त संकलनासाठी जाणारच आहेस, तर मला घेऊन चल” असे ते सांगत असत. मग मी घरून निघालो की त्यांना फोन करत असे. ते पायी चालत वसंत नगरच्या गेट पर्यंत येऊन थांबायचे. मी स्कूटर घेऊन तिथे पोहोचलो की त्यांना घेऊन रेशीमबागला जात असे. येतानाही आम्ही दोघे सोबत येत असू. जवळजवळ चार-पाच वर्ष हा कार्यक्रम चालला होता.
२०२४ मध्ये मी जवळजवळ सहा महिने अंथरुणावर होतो. त्याच दरम्यान निवडणुका आल्या होत्या. अंथरुणावर पडल्या पडल्याच मी मोबाईलवर व्हाट्सअप आणि फेसबुक बघत असे. सोबत मोबाईलवर सगळ्यांशी संपर्क देखील चालायचा. निवडणुकीच्या आदल्या दिवशी लक्ष्मणरावांनी पत्रकारांच्या व्हाट्सअप ग्रुप वर एक पोस्ट टाकली होती. सगळ्यांनी उद्या मतदान करा आणि लक्ष्मी नगरच्या सिग्नल पाशी असलेल्या बटाटेवडा वाल्याकडून चना तर्री सोबतच बटाटेवडा खा असे आवाहन केले होते. मी त्यांना फोन करून मी तिथे तुमच्याबरोबर बटाटे वडा विथ तर्री खायला किती वाजता येऊ असे विचारले. तेव्हा या निवडणुकीत तुला बटाटेवडे खायला परवानगी नाही. पुढल्या निवडणुकीत देईल असे त्यांनी गमतीत सांगितले देखील होते.
निवडणुकीच्या दिवशी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने मी मतदान केंद्रावर गेलो आणि व्हीलचेअरवर बसून मी मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. बाहेर आल्यावर काही प्रेस फोटोग्राफर्सनी माझा व्हीलचेअरवरच फोटो घेतला. तो मी व्हाट्सअप वर शेअर केला होता. तो बघून त्या रात्रीच लक्ष्मण रावांचा मला फोन आला. “अविनाश अशा परिस्थितीतही जाऊन तू मतदान केले हे खरेच महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य आहे” असे मत त्यांनी व्यक्त केले होते. दरम्यान वसंत नगर चे घर सोडून लक्ष्मणराव मुलीकडे राहायला गेले होते.
हे घर सहकार नगरच्या पलीकडे होते. आजारपणामुळे माझे वाहन चालवणे बंद झाले होते. त्यामुळे भेट होणे शक्य नव्हते. तरीही अधून मधून मी कोणालातरी म्हणायचो “एकदा मला लक्ष्मणराव कडे घेऊन चला.” प्रत्येक मित्र आश्वासनही द्यायचा. मात्र तो योग येऊ शकला नाही. सुमारे चार महिन्यांपूर्वी लक्ष्मणरांच्या ८८ व्या वाढदिवसाला मी त्यांना फोन केला होता. तेव्हा ते ठाण्याच्या मुलीकडे होते. नागपूरला आलो की भेटू असे त्यांनी सांगितले होते. मात्र तो भेटीचा योग येण्याआधीच आज आधी ते क्रिटिकल असल्याची बातमी कळली आणि नंतर ते गेल्याचीच बातमी आली. लक्ष्मणरावांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.






