*माझंही मत…**राज आणि अमित ठाकरेंनी हे भान ठेवायलाच हवे…* ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवराज अमित ठाकरे नुकतेच पुण्यात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात तिथल्या विद्यार्थ्यांच्या काही समस्या सोडवण्यासाठी गेले होते.
तिथे प्राचार्यांच्या दालनात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो बघितला आणि त्यांची तळ पायातली आग मस्तकात गेली. त्यांनी लगेच आपल्या कार्यकर्त्यांना तो फोटो भिंतीवरून काढायला लावला आणि तिथे त्यासाठी प्राचार्यांना दमदाटी देखील केली.
ही बातमी प्रसारित होताच दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या घरासमोर आंदोलन करायला गेले. मात्र तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी रस्त्यातच त्यांना अडवले आणि त्यामुळे राडा झाला. परिणामी या मुद्द्यावरून आता राजकारण रंगले आहे.इथे मुळात प्रश्न असा येतो की यामुळे दोन्ही पक्ष काय साधणार आहेत? अमित ठाकरे हे आता नव्याने राजकारणात पदार्पण करत आहेत. त्यामुळे त्यांना आपला टीआरपी कसा वाढेल हा प्रयत्न करायचा आहे. तोच सध्या सुरू आहे मात्र स्वतःच्या प्रसिद्धीसाठी झुंडशाही केली तर त्याने जनाधार मिळेल अशा भ्रमात जर अमित ठाकरे असतील तर ते मूर्खांच्या नंदनवानात फिरत आहेत असेच म्हणावे लागेल.
अमित ठाकरे यांचे वडील राज ठाकरे हे ज्यावेळी शिवसेनेत होते, त्यावेळी समाजात आणि एकूणच मराठी माणसांमध्ये त्यांचे एक वजन होते. ज्यावेळी त्यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे पटले नाही आणि ते शिवसेना सोडून बाहेर पडले. त्यावेळी देखील जनमत त्यांच्या बाजूने उभे झाले होते. त्यामुळेच त्यांनी उभ्या केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्रातील जनतेने सुरुवातीला उचलून धरले होते. त्याचाच परिणाम म्हणून २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे १२ आमदार विधानसभेत निवडून आले होते.
मात्र नंतरच्या काळात त्यांचे जनमत हळूहळू कमी झाले. आज तर विधानसभेत त्यांचा एकही आमदार नाही. मुंबई महापालिकेत त्यांचे बोटावर मोजणे इतके नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र त्यासाठी सुद्धा या भावाशी म्हणजेच उद्धव ठाकरेंची आधी वैर धरले होते त्याच्याशीच त्यांना हात मिळवणी करावी लागली होती.राज ठाकरेंचा आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जनाधार कमी का झाला याचे कारण शोधायला गेले तर राज ठाकरे यांचे धरसोडीचे राजकारण हे जसे कारणीभूत आहे, तसेच त्यांचे झुंडशाहीचे समाजकारण आणि राडा संस्कृतीची जपणूक ही देखील कारणीभूत ठरली आहे.
आजही त्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक कायम हात घाईवरच उतरलेले असतात. त्यामुळे सामान्य माणसाला राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल जे काही आकर्षण होते आणि जी आपुलकी होती ती संपत चाललेली दिसून येते आहे. त्याची खरी सुरुवात ज्या दिवशी मनसेच्या आमदारांनी भर विधानसभेत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांच्या मुस्काटात हाणली त्याच दिवशी झालेली होती.पुण्यात जाऊन त्या महाविद्यालयातील नरेंद्र मोदींचा फोटो काढणे आणि प्राचार्यांना दमदाटी करणे हा सुद्धा राडा संस्कृतीचाच एक प्रकार आहे असे म्हणता येईल. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत.
त्यामुळे सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक संस्थांमध्ये त्यांचे छायाचित्र सन्मानाने लावणे यात गैर काहीही नाही, किंबहुना तो प्रोटोकॉल आहे. मात्र या क्षणी आमचे आणि मोदींचे मतभेद आहेत म्हणून आम्हाला त्यांचा फोटो शिवाजी महाराजांच्या बाजूला लागलेला नको आहे असे म्हणणे आणि त्यासाठी दंडेली करणे हा अनाठायी अट्टाहास असेच म्हणावे लागेल. त्यातही हा फोटो इथे लावू नका अशी प्राचार्यांना विनंती करता आली असती. मात्र तसे न करता तिथल्याच तिथे आपल्या कार्यकर्त्यांना खुर्चीवर चढवून तो पोटाला फोटो काढायला लावणे हे झुंडशाहीचे आणि पर्यायाने असंस्कृतपणाचेच लक्षण म्हणावे लागेल. सामान्य सुजाण माणसाला हे कधीच पटणारे नाही.
या प्रकाराने सामान्य माणूस कुठेतरी दुखावला हे नक्कीच आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दुखावणे हे तर सहाजिक होते. त्यामुळेच अमित ठाकरेंच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानाकडे वाटचाल सुरू केली. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला अशा बातम्या आहेत. मनसेचे संदीप देशपांडे माध्यमांशी बोलताना ते जिथे असतील तिथे आम्ही जातो आणि त्यांना मनसे स्टाईलने धडा शिकवतो अशा धमक्या देत होते. जर भाजपचे कार्यकर्ते इथे आंदोलन करायला आले तर भाजपच्या सर्व मंत्र्यांच्या निवासस्थानांसमोर आणि भाजपच्या सर्व कार्यालयासमोर आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करू अशीही धमकी ते देत होते.
हा प्रकार सर्व वृत्तवाहिन्यांवर लाईव्ह दाखवला गेला आणि उभ्या महाराष्ट्राने तो बघितला. हे सर्व प्रकार बघून महाराष्ट्रातील सुजाण समंजस मतदार कुठेतरी दुखावलेला आहे हे नक्की. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा किंवा अमित ठाकरेंचा जनाधार वाढणार नाही तर तो घसरेल आणि असेच सुरू राहिले तर एक दिवस तो पूर्णतः संपेल हे निश्चित आहे. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांचे युवराज अमित ठाकरे यांनी आता जनतेला काय हवे याचा विचार करून भविष्यातली धोरणे ठरवायला हवीत. फक्त प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी राडेशाही करण्यात, आणि आम्ही मनसे स्टाईलने धडा शिकवू अशी मुजोरी करण्यात कोणतेही शहाणपण नाही, हा विचार त्यांनी करायला हवा, त्यासाठी त्या दोघांनीही आता भानावर यायला हवे. त्यातच त्यांचे हित आहे. अर्थात हे माझे मत आहे… तुमचे स्पष्ट आणि परखड मत तुम्ही देखील मांडू शकता… त्याचे स्वागतच आहे.






