• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

कालिदास शिंदे यांचे ‘ झोळी ” आत्मकथन

माणगंगा by माणगंगा
November 2, 2021
in सांगली
0
कालिदास शिंदे यांचे ‘ झोळी ” आत्मकथन

मनोगत


“झोळी” हे आत्मकथन वाचकांच्या समोर ठेवत आहे. मी अठरा विश्व दारिद्रय असलेल्या भिक्षेकरी “नाथपंथी डवरी गोसावी” या भटक्या जमातीत जन्माला आलो. भटकंती तर आमच्या पाचवीला पूजलेली आहे.

आमचे जिवन भटकंती करून जगणे असे आहे. माझा समाज आजही भिक्षेवरच पूर्ण पणे अवलंबून आहे. आमचे दुसर्‍याच्या दारात जाऊन बारा घरचा तुकडा मागतल्या शिवाय पोटच भरत नाही. आमची भिक्षे शिवाय चूल पेटत नाही. जमातीचा जोगी गावातून भिक्षा मागून पाला बिर्‍हाडावर येत नाही. तो पर्यंत पालावरच लहान लेकरू सुद्धा उपाशी तापाशी पोटाच्या भुखेसाठी तडपडते.


हा समाज पारंपारीक लोक कला, लोक संस्कृती जपणारा आहे. हा समाज पिढ्यान पिढ्या मुख्य प्रवाहातील समाजासाठी धार्मिक सेवा, धार्मिक पुजा, गोंधळ विधी सादर करत आला आहे. पिढ्यांपिढ्या हे नाथपंथी जिवन स्विकारले असल्यामुळे त्या तत्वज्ञानांनुसार कोणत्याही गोष्टींचा लोभ हव्यास न पाळता निस्वार्थी वृत्तीने समाजात प्रबोधनाचे काम करत आपले योगदान देतच आला आहे. या योगदानाच्या मोबदल्यात या समाजाला काय मिळाले, तर काखेळा झोळीच. आजवर यांच्या काखेची झोळी थांबलेली नाही. त्यामुळे त्यांच्यात अपेक्षित विकास व सामाजिक परिवर्तन होऊ शकले नाही.

तसेच या समाजाला विकासाच्या कोणत्याच प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यात आले नाही. तसेच कोणतेही राजकीय प्रतींनिधीत्व त्यांना मिळालेले नाही. आता पर्यंत माझ्या समाजाच्या वाट्याला फक्त अवहेलना, अपमानच आला आहे. आज बाह्य समाजात आमची ओळख काय आहे असे कोणासही विचारले तर ते सहजपणे सांगतात की, भिकारी. माझ्या समाजाने पिढ्यांपिढ्या दिलेल्या सामाजिक, धार्मिक योगदानाचे फळ ‘भिकारी’ म्हणून मिळालेली ओळख.


महाराष्ट्रात पारंपरिक लोक संस्कृतीचे जतन, संवर्धन “ गोंधळ विधी” पार पाडण्यासाठी डवरी गोसावी, नाथपंथी गोंधळी यांना आमंत्रण दिले जाते. हा पारंपरिक गोंधळ विधी संपन्न झाल्यावर मात्र त्यांना काहीच किंमत नसते. तो वर्तमान व भविष्यकाळात सर्व बाजूंनी दुर्लक्षितच राहतो. या समाजाच्या कडे धार्मिक पारंपारीक पुजा करणारे या नात्याने जरी बघितले असले तरी त्यांचा वापर आजवर मंनोरजना साठीच होत आला आहे. लोकांचे मनोरंजन करून मिळणारा मोबदला तुटपुंजा असतो. पोटाची खळगी भरण्यासाठी झोळी घेऊन लोकांचा उंबरा पूजल्याशिवाय दूसरा पर्यायच त्यांच्या जवळ नसतो.
आजवर विवाह प्रसंगी पुजा पाठ करणारा, धार्मिक कार्य करणारा प्रस्थापित समाज त्यांचे योगदान देत आला आहे. परंतु हे विवाह झाल्यावर पुढील देव देवता पूजन, नाथचे व देवीचे गोंधळ विधी जागरण करण्यासाठी डवरी गोसावी, भराडीच का लागतो. हे कार्य दुसर्‍या कोणत्याही समाजाकडे देता आले असते तर का दिले गेले नाही. या कार्याच्या मोबदल्यात या समाजाला बैत म्हणून वंझळ पसा धान्य बिदागी मिळते. याच्या पलीकडे आमची गरज मुख्य प्रवाहातील समाजाला कवडी मोल राहिली आहे.


माझा समाज लोकांची हागणदारी ती आपली वतनदारी मानणारा आहे. या वतनाचे इमाने इतबारे लोक संस्कृती व धर्म जागृती करण्यासाठी मुखात गाणी आणि हातात डवर, संभळ, तुणतुणे घेऊन समाजात प्रबोधन करत आहे. परंतु त्यांच्या अंगी असणारे निपजत कला, कौशल्ये,गायन, वादन आज काल बाह्य झाले आहे. त्यामुळे फक्त भाकरीचा तुकडा मिळवण्यासाठी त्यांच्या जिवनाची अधिकच परडत होताना दिसून येत आहे. या पोटाच्या भुकेसाठी ते भारतभर भटकत फिरून परागंदा झाले आहेत. यांच्या भटकंतीच्या जिवनामुळे त्यांच्या भावी पिढीचे आयुष्य अंधारात आहे. या मुलांना न गाव, न रहिवासी पुरावा, न रेशन कार्ड इ. त्याच बरोबर ज्या भुईच्या तुकड्यावर हा समाज उभा आहे, त्या पायाखालील जमीनीवर सुद्धा आपला हक्क व अधिकार त्याला सांगता येत नाही. त्याला माणूस म्हणून जिवन मिळत नाही. आजवर त्याची दाद कोणीही घेतलेली नाही. आपली लोकशाही पूतळ्या प्रमाणे उभी आहे, तिची हालचाल होताना दिसत नाही. कारण इथे फक्त या जमातींच्या मतांची गणता होते. परंतु त्यांच्या डोक्यांची मोजदाद कुठेच होताना दिसत नाही.


आत्तापर्यंत महाराष्ट्रातील विमुक्त व भटक्या जमातींवर एकूण पन्नास आत्मकथने प्रकाशित झाली आहेत. या पन्नास आत्मकथांना मधून बहुतेक आत्मकथने विमुक्त जमाती विषयी आहेत. त्यांत “माजी गुन्हेगार जमाती” म्हणून असणारा सामाजिक कलंक यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. आजही विमुक्त जमातीवर गुन्हेगारीचा लागलेला सामाजिक कलंक पिच्छा सोडताना दिसून येत नाही. यातील काही जमाती बहुसंख्येने गावकूसा बाहेर आणि गावगाड्या मध्ये स्थायिक झालेल्या आहेत.

सध्या विमुक्त जमाती मधील समाज बांधव आपली पाल बिर्‍हाड घेऊन तुरळकच भटकेपणाचे जिवन जगताना दिसून येतात. सद्यस्थितीत ही विमुक्त जमाती ह्या श्रमाची व पारंपारीक कौशल्ये यांच्या आधार घेऊन आपला उदर निर्वाह करत आहेत. दुसर्‍या बाजूला बघितले तर भिक्षेकरी भटक्या जमाती मधील आत्मकथने हाताच्या बोटावर मोजण्या इतकी प्रसिद्ध झाली आहेत. भटक्या जमातीच्या बाबतीत मात्र कमालीचे भटकंतीचे जिवन वाट्याला आले आहे. यातील माझा समाज हा पारंपारीक गोंधळ ही कला सादर करून लोक संस्कृतीचा गाढा ओढत आहेत. तसेच पिढ्यांपिढ्या काही भटक्या जमाती देव देवता व पशू प्राणी घेऊन भिक्षा मागून परावलंबी जिवन जगत आले आहेत. सध्या ही तेच आत्मसन्मान हीन जिवन जगत आहेत. विमुक्त जमातींच्या आत्मकथांनातून त्यांचा जिवन परिचय व संघर्ष वाचकांसमोर आला आहे. मी भिक्षेकरी समाजात पाला बिर्‍हाडात राहून पाल ते पीएचडी पदवी प्राप्त मिळवण्याचा जो संघर्ष केला आहे तो मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे तो वाचकांना नक्कीच आवडेल.

तसेच या आत्मकथानात मी मांडले आहे की, आजही माझा समाज पंच्यान्न्व टक्के उपेक्षा सहन करत भटकंतीचे उपेक्षित जिवन जगत आहे. माझ्या समाजात एका बाजूला या जमातीचे पोट भरण्याचे प्रश्न आ वासून उभे आहेत. समाजात ज्याला शिकायचे आहे त्याला परिस्थिती मुळे शिक्षण मिळत नाही. माझ्या आई वडिलांचे जीवन पूर्ण भटकंतीचे होते, त्यामुळे माझ्या शिक्षणाचा खर्च करणे त्यांच्या कुवतीच्या बाहेर होते.
आजवर विमुक्त भटक्या जमाती मधील आत्मकथनांचे आकलन केले असता असे दिसून आले की, प्रत्येक लेखकांचा जिवन जगण्यासाठी केलेला संघर्ष रेखाटला आहे. यातील काही मोजकीच पण निवडक आत्मकथने ही त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासावर भर देतात. या आत्मकथनात माझा भटकंतीच्या जीवनात संघर्ष शिक्षणाचा मांडला आहे. त्याच बरोबर माझ्या समाजाच्या जीवनाचे भावविश्व मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्य प्रवाहातील समाजासाठी माझ्या समाजाने नानाविध सांस्कृतिक योगदान दिली आहेत. असा समाज आज उपेक्षित जिवन जगत आहे.

आजही त्याला झोळी शिवाय तारणारे कोणी नाही हे जरी समोर दिसत असले. तरी त्यांची झोळी ज्या दिवशी थांबेल तो त्यांच्या जीवनातील सामाजिक परिवर्तनाचा दिवस असेल. आज झोळी पोटाला अन्न देते, परंतु त्यांचा सन्मान हिरावून घेते. आता या समाजाला मागतेपणाचे जिवन नको झाले आहे. इथल्या लोक संस्कृतीचा वारसा जपल्याने व तिचे ओझे पिढ्यांपिढ्या वाहिल्याने त्यांच्या वाट्याला भिक्षेकरी जिवनच आले आहे. हे भिक्षेकरी जिवन नाकारून त्या विरुद्ध बंड करण्यास भाग पाडण्याची जबाबदारी इथल्या समाजाची व पुरोगामी विचारवंताची आहे.
महाराष्ट्र सामाजिक, सांस्कृतिक चळवळी साठी ओळखला जातो. इथे बर्‍याच मोठ्या प्रमाणात दलित, आदिवासी, मागास वर्ग, विमुक्त व भटक्या जमातीच्या चळवळी उभ्या राहिल्या आहेत. या चळवळी ह्या जमातीच्या अवकाशाचा वेध घेऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आजही त्यांच्या काखेची झोळी हटलेली नाही. “झोळी बंद करा” अशा मोकळ्या व कोरड्या घोषणा देणे सोपे आहे. परंतु या उपेक्षित जमातींना आपण उपजीविकेसाठी काय पर्याय देत आहोत, याचा विचार आजवर झालेला नाही.

भटक्या जमातीसाठी सामाजिक काम करणारे, अभ्यास करणारे, साहित्य लिहणारे मोठे झाले. परंतु या जमातींकडे पाठीमागे वळून पहिले तर भिक्षा मागणारा नाथ पंथी डवरी गोसावी समाज मात्र आहे तिथेच आहे. आम्ही “जन्मजात भिकारी” म्हणून जन्मतो आणि भिकारी म्हणूनच मरतो. या जमातींना मयताला ही पैसे वेळेवर मिळत नाहीत. आमच्या मागते पणाची अवहेलना स्मशानात गेल्यावरही थांबलेली नाही. मयातच्या वेळी केलेली उसनवारी फेडण्यासाठी त्यांचे वर्षभर जाते. या भटक्या जमातीवर बाहेरचे अन्याय जरी करत असेल तरी समाजाने स्वीकारलेले जीवन त्यांना अधीकच मागास बनवते हे नाकारता येत नाही.


आजही भटक्या व विमुक्त जमातीच्या साहित्याला स्वतंत्र ओळख मिळालेली नाही. हे साहित्य आज दलित साहित्य म्हणून इथल्या प्रस्थापित साहित्यिक मंडळींनी पिंजर्‍यात बंदीस्त केले आहे. इथल्या समाज रचनेत सुद्धा हीच अवस्था विमुक्त व भटक्या जमातीची आहे. आजही इथे असणार्‍या प्रत्येक विमुक्त व भटक्या जमातीचा सामन्यातील सामान्य माणूस, तुम्ही लावलेल्या सामाजिक कुंपणाच्या बाहेर उभे राहून “दोन घास लेकरा बाळांच्या पोटाला द्या” अशी याचना करताना दिसून येतो. हे लाचारीचे भिक्षेकरी जिवन त्यांच्या वाट्याला आले आहे. या जमातींना सर्व अभिमान, स्वाभिमान सोडून दुसर्‍यांच्या दारात भिक्षा मागयला उभे राहायला लागते. हे सारे चित्र बदलेले पाहिजे. यामध्ये सामाजिक परिवर्तन बाहेरचे येऊन करू शकत नाहीत. आता स्वतःच जागे होऊन समाज उत्थनासाठी पुढे आले पाहिजे.


आत्मकथन हे जिवनाच्या शिखरावर पोहचल्यावर सांगतात असा प्रगांडा प्रस्थापित व्यवस्थेत आहे. माझा जीवन संघर्ष हे आत्मकथन लिहण्यास मला प्रेरणा देऊन गेला आहे. मी आयुष्या मध्ये संघर्ष करून पुढे आलो आहे. मी तोच संघर्ष आपणासमोर मांडतोय. अजूनही खूप संघर्ष मांडायचा आहे. आज वर इथल्या सामाजिक विचारवंतांनी भटक्या जमातींनी शिक्षण घ्यायला पाहिजे, भटक्या जमातीची मूल-मुली शिकत नाहीत अशी विवंचना समाजापुढे आणली आहे. परंतु विमुक्त भटक्या जमाती मधील जी मूल-मुली शिकली त्यांचे काय, त्यांनी आता शिकून काय करावे असा गंभीर प्रश्न माझ्या पुढे उभा आहे. या जमातींची सामाजिक न्याय देणारी राखीव जागा, आरक्षणे प्रस्थापितांनी घेतली. आज या जमाती मधील युवक युवती उच्च शिक्षण घेऊन ही बेरोजगार आहेत. या आत्मकथानात एका बाजूला आई वडील भिक्षा मागताना अवहेलना, अपमान सहन करत आमच्या पोटाची भुख भागवतात. तर दुसर्‍या बाजूला मी भटकंतीचे जिवन असताना माझा शिक्षणाच्या भुकेचा ध्यास पूर्ण करण्यासाठी केलेला संघर्ष आहे.

माझा समाज बहुढंगी रूप धारण करून कला जरी सादर करत असला तरी कधीच खोटे पणाचा आव आणत नाही. त्याने आजवर कला सादर करून लोकांचे मनोरंजन,गुणगान केले. त्याच्या मोबदल्यात त्याला भिक्षेसाठी हांजीहाजी करून बिदागी मिळते. इथल्या समाज व्यवस्थेने आमच्यावर सदैव हात पसरवण्याची वेळ आणली. याच समाज व्यवस्थेने आम्हाला देव बनवले, परंतु त्याच भटक्या देवाला आज लोकांच्या हागणदारीत जिवन जगण्यास भाग पाडले आहे. त्या हागणदारीतली जागा ही त्यांना स्थायीक म्हणून राहण्यासाठी मिळत नाही. समाजाच्या वाट्याला जे जिवन आले ते माझ्याही वाट्याला आले आहे. माझ्या अनुभवा पेक्षा या जमातीच्या जीवनातील अनुभव कटू आहेत.


प्रस्थापित समाजाला माझा समाज कसं जगतोय, किती यातना सहन करतोय, पावसा पाण्याचा अर्ध ओला भिजत, उन्हा तानाच्या झळा सोसत समाजाच्या बाहेर जगतो. तर कधी अनवाणी पायाने पहाटे पासून संध्याकाळी पर्यंत पोटासाठी कण कण अन्नाचा दाणा पशू पक्षा प्रमाणे गोळा करून आपली मुले सांभाळतो, येथ पर्यंतचा दिनक्रम प्रस्थापित समाजाला माहीत ही नसेल. त्यामुळे या आत्मकथानात समाजाच्या यातना, अवहेलना मांडण्याचा प्रयत्न प्रातीनिधिक स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वी डवरी समाजाचा मुख्य प्रवाहात धार्मिक कार्य करण्यास स्वीकार होत होता. त्यामुळे गावातील लोक त्यांना मानत होते. परंतु आता लोक त्यांना मानत ही नाहीत आणि भीक ही घालत नाहीत. आजही त्यांना जातीच्या नावानेच ओळखले जाते व त्या प्रमाणे बोलले जाते.


या समाजाला पोटाच्या भुकेसाठी दिवस उजाडायची ही वाट पाहता येत नाही. दिवस उजाडताच त्यांना पोटातली भूक शमवण्यासाठी लोकांच्या दारात हात पसरून उभे राहावे लागते. असे त्यांचे जीवन कधी बदलणार ही मनात खंत आहे. आजवर त्यांनी “तहान लागल्यावर विहीर खोदणारे” जीवन जगले आहे. माझ्या समाजाचा एक जीवन नियमच आहे की, भिख मागून खायची पण चोरी करायची नाही. त्यामुळे या समाजातील कोणीही चोरी करताना दिसून येत नाही. त्यामुळे हा समाज चोरी पेक्षा भिक्षेला प्रतिष्ठेचे समजतो. आज आपल्या दारात भिक्षेसाठी जो याचना करतो, त्याला कमी पणाच्या भावनेने बघितले जाते. आजही या समाजात बरोबरीचे हक्क, अधिकार युक्त बरोबरीचे जिवन मागण्याची मानसिकता निर्माण झालेली नाही.


मी अशा समाजाचे जिवन मांडले आहे की, जो समाज काखेला झोळी लावल्या शिवाय जगू शकत नाही. आजवर माझ्या कित्येक पिढ्यांनी पोटाच्या भुखे साठी लोकांचे उंबरे झिजवले आहेत. आजही चार घर गावातली भिक्षा मागतल्या शिवाय आमची चूल पेटत नाही. या समाजाने पोटाच्या भुकेसाठी त्याने भिक्षेचे स्वरूप बदलले, परंतु पूर्ण पणे भिक्षा मागणे सोडले नाही. यात त्याने बदल केले की, गाई घेऊन फिरणे, देवाचा रथ घेऊन भिक्षा मागणे, गोसावी,फकीरी, वारकरी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती वर भिक्षा मागणे भिक्षा मागण्याचे उप प्रकार स्वीकारत गेला आणि अजूनही नवीन भिक्षेच्या पर्यायाच्या शोधातच आहेत. तसेच भंगार वेचणे, स्टोव्ह दुरूस्ती, गॅस दुरूस्ती सारखे तत्सम व्यवसाय भटकंतीचे जीवन जगताना स्वीकारले आहेत. या उपजीविका साधनांना ही मुख्य प्रवाहातील समाजात सन्मानाचे स्थान दिले गेले नाही.


आम्ही आई वडिलांच्या बरोबर भिक्षा मागत पाला बिर्‍हाडावर भटकंती करत फिरायचे. त्यामुळे माझ्यासाठी शिक्षण हे दिवा स्वप्नच होते. भटकंतीचे भिक्षेकरी जिवन अनुभवून आश्रमशाळेत शिकून पाल ते पीएचडी पर्यंतचा शिक्षणाचा खडतर जिवन प्रवास मोठ्या जिद्दीने पार पाडला. माझे हे एकमेव आत्मकथन असेल जे भटकंती जिवन जगत पीएचडी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. मी पाला बिर्‍हाडात राहत असताना माझ्या समाजातील मुलांच्या हाती शाळेची पाटी येण्या ऐवजी झोळी आली. मी बिर्‍हाडावर थांबलो असतो तर माझ्या ही काखेला भिक्षेची झोळी आली असती. माझ्या वडिलांना आजही गावात “नाथाचा डवरी” म्हणून मान जरी देत असले. तरी आजवर गावाच्या निर्णय प्रक्रियेत कुठेच आम्हाला स्थान दिले गेले नाही. आई वडिलांनी मिळणार्‍या भिक्षेच्या आधारावर व कठीण परिस्थितीवर मात करून शिक्षण पूर्ण करण्यास मोठी साथ दिली. त्यांच्या मुळेच मला इथवरचा शिक्षणाचा प्रवास पूर्ण करता आला. मी भटकंतीचे पाला बिर्‍हाडावर जीवन जगून उच्च विभूषित झालो. या जीवन प्रवासा दरम्यान जे जीवन अनुभवले ते वास्तव समाजा समोर यावे असा प्रपंच आहे.


माझे सामाजिकीकरण पाला बिर्‍हाडात जीवनाचे अनुभव घेत झाले आहे. या प्रक्रियेत भिक्षेकरी मानसिकतेचा प्रभाव माझ्यावर पडणे साहजिकच आहे. या भिक्षेकरी मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी मी शिक्षण घेण्याचा मार्ग स्वीकारला. मला आई वडिलांच्या भटकंतीच्या जीवनामुळे एका ठिकाणी राहून शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे माझी शिक्षणासाठी भटकंती झाली झाली. भटकंतीचे जीवन जगतच आश्रम शाळा ते पीएचडी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी समर्थ साथ आई वडिलांच्या झोळीने दिली. समाजाच्या झोळीचा उपयोग मला शिक्षणासाठी झाला आहे. त्यांनी मला शिक्षण घेत असताना वेळोवेळी उसने पासणे देऊन स्वतःची झोळी रिती केली. असे अनंत उपकार माझ्यावर झोळी चालवणारे व त्या झोळीत भर भरून दान घालणार्‍या बळीराजाने केले. त्यामुळे बळीराजा व माझे आई वडील यांचे विषयी कृतज्ञता व्यक्त करेल तितकी कमीच आहे.
मला शालेय जीवनापासून पोटाला दोन घास मिळतील याची भ्रांत होती. आई वडील, समाज यांचे दारिद्रयाच्या जीवनाचे निरीक्षण करत असताना त्यांच्या मध्ये राहून स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणले. आई वडील, समाज यांचे जीवन हाल अपेष्टा बघून मी अस्वस्थ व्हायचो. या समाजाला दिवसभर उनातानाचे भिक्षा मागून आणलेले अन्न धान्यावर आपला अधिकार सांगता येत नव्हता. त्यांनी दारोदारी भटकून हात पसरून आणलेले ओंजळ पसा धान्य याला गावातील लोक तुम्ही चोरी करून धान्य आणले असेल असे बोलून आपमानित करायचे.

परंतु आई वडिलांना हा अपमान, अवहेलना सहन करून दुसर्‍या दिवशी पुन्हा भिक्षा मागायला जाऊन धान्य विकून तेल, चटणी, मीठ आणून सध्याकाळची चूल पेटवायला लागायची. नाहीतर हाकनाक उपाशी मारावे लागले असते. आई वडिलांनी आपले स्वतःच्या पोटाला पिळा देऊन आपल्या आशा आकांक्षा बाजूला ठेऊन आमच्या शिक्षणाचा विचार केला. त्यांनी माझ्या शिक्षणासाठी पै पै करून समाजाचा व्याजाने घेतलेला पैसा फेडला. तर कधी गळ्यातले मणी मंगलसूत्र ही गहाण ठेवावे लागले. मी ज्या वेळेस टीस मध्ये शिकायला गेलो त्यावेळेस त्यांची माझी फी भरण्याची त्यांची ऐपत नव्हती. त्यामुळे मला बँकेतून शैक्षणिक कर्ज घेऊन पीएचडीच्या शिक्षण खर्चाची तडजोड करावी लागली.


माझ्या समाजाची अशी मानसिकता होती की, मी भिक्षा मागावे, चांगली हाळी आणावी. आई वडिलांची झोळी बंद करावी त्यांची जागा मी घ्यावी. “शिकून काय केले तुझ्या शिक्षण तुझे पोट भरणार नाही, पोटाच्या भुकेसाठी तू महाग झालास, ऐवढे शिकून काय फायदा” असे नाही ते समाजाचे ऐकावे लागायचे. त्यामुळे आज समाजात जाऊन बसायचे यासाठी ही विचार करावा लागतोय. मुख्य प्रवाहातील समाजाची विकासाकडे गाडी अधिक वेग घेत आहे. तर या समाजाच्या मानसिकतेची गाडी आहे तिथेच थांबूनच आहे, हलायला तयार नाही. तिला विचाराचे अमृत देऊन माणसात आणले पाहिजे.
भटकंतीचे जिवन जगणार्‍या “ नाथ पंथी डवरी गोसावी” समाजात मला जन्मानेच झोळीत टाकले आहे. या समाजाचा दृढ विश्वास आहे की, जन्म व मृत्यू पर्यंत झोळीच समाजाची साथ देते. आपणास माहीत आहे की, ब्रिटिश राजवटीत भटकंती करणार्‍या काही जमातींना “ माजी गुन्हेगार जमाती” अशा सामाजिक कलंकित केले जाते. माझा समाज ही या सामाजिक कलकांचा शिकार होत आला आहे. आजही नाथपंथी म्हणून भिक्षा मागण्यास गेल्यावर त्याला चोर म्हणून मारहाण होते तर काही जीवे मारण्याची ही प्रकरणे ज्वलंत आहेत. माझ्या समाजाने स्वतःच्या पोटाच्या भुकेसाठी चोरी करायची नाही यासाठी भिक्षेचा मार्ग स्वीकारला आहे.

परंतु मुख्य प्रवाहातील समाज यांना आयती भिक्षा द्यायची कुठून द्यायची असे बोलतात. ही आयती भिक्षा मिळवण्यासाठी त्याला काखेला झोळी लावून वणवण भटकंती करावी लागते. या आयत्या भिक्षेच्या लोभा पायी माझ्या सारख्या कित्येक मुलांना काखेला झोळी लावावी लागते व आपले कुटुंब चालवावे लागते. यामुळे या मुलांचे वाट्याला भिक्षाच आल्याने त्यांचे सारे जीवनच उध्वस्त होते. माझा समाज या मुलांना भिक्षे ऐवजी त्यांच्या हाती पुस्तक देण्याची मानसिकता ठेवत नाही. या मुला-मुलींचे जीवन बरबाद होते, याचे सौर सूतक या समाजाला नाही. समाजाला लहान थोरा सहित झोळी सोडणे रुचत नाही. समाजात जर कोणी “ झोळी बंद” अशी मोहीम सुरू केली, तर तो जमातीचा दुश्मन झाला म्हणून समजा. या समाजाच्या मानसिकतेत माझी जडण घडण होत गेली. याच भिक्षेवर मला जिवन जगून पीएचडी पर्यंतचा शिक्षणाचा प्रवास यशस्वी करावा लागला. मी या झोळीच्या मोहात पडलो नाही, त्या ठिकाणी हातात पुस्तक घेतले. मला प्रभावित करून गेली ती इथल्या मुख्य प्रवाहातील स्थायिक समाजाची जीवन शैली, श्रम, कौशल्ये आधारित जीवन मूल्ये व पद्धत. दुसर्‍या बाजूला बघितले तर माझा समाज गाव कुसाच्याही ही बाहेर ओसाड माळरानावर आपली कालबाह्य कला, कौशल्ये जतन संवर्धन करताना दिसतो. परंतु त्यांच्या या कलांना आजच्या काळात काहीच सन्मान राहिला नाही. या कालबाह्य झालेल्या कलांना आम्ही अजून किती पिढ्या गोंजारत बसणार आहोत. या बद्दल काही बदल करणार आहोत की नाही, का? आयुष्यभर नशिबालाच दोष देत दैववादी बनणार आहोत. जोपर्यंत समाजाला जिवन जगण्याचे शास्त्र कळणार नाही तोपर्यंत तो झोळी त्याग करणार नाही. तोपर्यंत समाजात परिवर्तन होणार नाही.


या समाजाकडे झोळी, डवर, त्रिशूळ, गुलालाची डबी सोडून जिवन जगण्याचे दुसरे साधन नाही. माझ्या वाड वडिलांनी पिढ्यांपिढ्या भिक्षा हाच पोट भरण्याचा मार्ग अवलंबला. त्यामुळे आज आम्हाला काखेला झोळी लावून भिक्षा मागूनच जगावे लागले. अजून किती पिढ्या आम्ही भिक्षा मागून जिवन जगणार आहोत. आज भिक्षेला संधि साधूंनी चोर्‍या मार्‍या करून बदनाम केले. ‘करणार एक आणि भरणार एक’, ‘चोर सोडून सान्याशाला फासी’ या म्हणी प्रमाणे माझ्या समाजाला याच्या वेदना, अपमान, अन्याय अत्याचार सहन करावा लागत आहे. आमचा जन्मच सन्याशी जोगी यांच्या पोटी गृहस्थी आश्रम धारण केल्यावर झाला आहे. या गृहस्थी झालेल्या नाथपंथी लोकांनी समाज प्रबोधंनाची धुरा अखंड पणे संभाळली. या दरम्यान ते पालवासी जगतच राहिले. त्यांच्या जीवनात कित्येक उपेक्षा आल्या, तरी ही आज त्याची जाणीव त्यांना का होत नाही?.

ते पालवासी होऊनच जिवन जगण्यावरच भरोसा का ठेवतात? हा एक स्वतंत्र संशोधनाचा व त्यांची मानसिकता समजून घेण्याचा विषय होऊ शकतो. या जमातीकडे पारंपरिक गोंधळ विधी कुळाचार धार्मिक कार्य आहे. तसेच त्याच्या अंगावर भगवा वेश, गळ्यात शैली शिंगी, हातात डवर, त्रिशूळ हे का सुटत नाही यावर सामाजिक क्रांती होण्याची गरज आहे. माझा समाज एका बाजूला धर्माने दिलेले तात्विक नाथपंथी जिवन जगतो. तर दुसर्‍या बाजूला या नाथपंथाच्या आचारणाचा पगडा यामुळे आजची त्यांची अवस्था “न घरका न घाटका” अशी झाली आहे. या आचरण पद्धती मुळे त्यांनी कधीच एका ठिकाणी स्थायिक व्हायचे नाही, धन संचय करायचं नाही, त्याग वृत्तीनेच जिवन जगायचे अशी त्याची धारणा असल्यामुळे त्यांचे जीवनात कमालीचे जीवनात कमालीचे दारिद्र्य, निरक्षर पणा व परावलंबीचे जिवन वाट्याला आले आहे. यातून परिवर्तन झाले नाही तर तो अजून अधोगती कडे जात आहे. त्यांच्या मध्ये आसणार्‍या कला, व नाथपंथीय धारणा सध्याच्या काळात कालबाह्य होत चालल्या आहेत. याची जाणीव सध्या कुठेतरी या जमातीमध्ये होताना दिसून येत आहे. माझ्या समाजातील काहींची भिक्षापात्र त्याग करण्याची मनाची तयारी असूनही पर्यायी उपजीविकेचे साधन नसल्याने काखेला झोळी लावून भिक्षेलाच जावे लागते.


माझ्या समाजात मुलांच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्याहून ही समाजातील मुलींचे शिक्षणाचे प्रमाण नगण्य आहे. अशा समाजातून भटकंतीचे जिवन जगत असतानाही संघर्ष करून पीएचडी पर्यंतचे शिक्षण यशस्वी पणे पूर्ण केले. दुसर्‍या बाजूला समाजात उच्च शिक्षण घेणारे दुर्मिळ दिसून येतात. मी शिक्षण घेत असताना बर्‍याच पुरोगामी चळवळीचा सुर पाहिला तर असे लक्षात आले की, विमुक्त भटक्या जमातीचे आत्मकथांनाच्या माध्यमातून ललित लिखाण पुढे आले आहे. परंतु या जमातीवर समाजशास्त्रीय, मानववंश शास्त्राच्या निकषातून संशोधन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी ही उणीव भरून काढण्यासाठी भारतातील नामांकित टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत दोन एमफिल व पीएचडी अशा पदव्या मोठा संघर्ष करत मिळवल्या. या विद्यापीठात भारतातील माझ्या समाजावर पाहिला प्रबंध लिहण्याचे योगदान करता आले.


माझ्या समाजाने नैतिक निती मूल्ये जोपासण्याच्या धारणेमुळे स्वतःला एका चौकटीत बंधीस्त केले आहे. तसेच मुख्य प्रवाहातील समाजाने आमच्याकडे पारंपारिक कुळाचार विधी करणारे पुजारी डवरी यांच भूमिकेतून बघितले आहे. एका वर्षाच्या काल चक्रात हा समाज जगत असताना माणूस म्हणून कसे जीवन जगत असेल याचा कधीच विचार केला गेला नाही. यामुळे आज पर्यंत माझ्या समाजातील एकाही लोक कलावंत यांना महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाचा एकही पुरस्कार मिळालेला नाही. शासनाच्या पात्रतेच्या निकषात हा समाज बसणार कधी, तसेच त्यांच्या कलांना स्वीकारणार कधी हा खरा मूलभूत प्रश्न समाजातील कलाकाराच्या पुढे उभा आहे.
सध्या उच्च शिक्षण घेऊन ही झोळी काखेला लावायची वेळ माझ्यावर आली आहे. यापेक्षा दुसरे भयावह चित्र इथल्या शिक्षण व्यवस्थेचे कुठले नाही. पोटाची भुख माणसाला काहीही मार्ग स्वीकारण्यास भाग पाडते. इथली समाज व्यवस्था हतबल होऊन भटक्या विमुक्त जमातीला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करायला मागे पुढे पाहत नाही. सध्यस्थितीत मला पीएचडी ही उच्च विभूषित पदवी प्राप्त करूनही सहाय्यक प्राध्यापक पदाची नोकरी मिळालेली नाही, ही माझी अवस्था आहे. अजून ही सघर्ष करतोय, कुठे काम मिळाले नाही. स्थायिक होऊ शकलो नाही. आजवर दोन तीन ठिकाणी करार तत्वावर नोकर्‍या केल्या त्याही करार संपुष्टात आल्यावर बंद झाल्या. ऐवढे शिक्षण घेऊनही अवहेलनाच पदरी पडली आहे.


माझा इथपर्यंतचा शिक्षण घेत असतानाचा जिवन प्रवास खडतर राहिला. ज्या आईने मला तिच्या झोळीतून आणून दिलेला प्रत्येक घास माझे जीवन सार्थक करून गेला. परंतु मला त्या माता माऊली ची झोळी बंद करता आली नाही. आज मी समाजात एकादा नोकरी, व्यवसाय करतो आहे अस सांगणे सुद्धा मला अवघड होत आहे. समाजासाठी काही तर आपले योगदान असावे. पुढच्या पिढीतील मुलांच्या वाट्याला आपल्या सारखे जिवन भटकंतीचे जिवन येऊ नये. तसेच त्यांच्या काखेला झोळी येऊ नये असे वाटते.
मी भटकंतीचे जीवन जगत असताना शिक्षणाचा ध्यास घेऊन शिक्षण पूर्ण केले आहे. समाजाची “ एक न धड भाराभर चिंध्या” अशी अवस्था आहे. आज समाजातील काही मूल –मुली यांनी शिक्षण घेतले आहे अशी दुर्मिळ उदाहरणे आहेत. यातील बर्‍याच जणांची नोकरी नाही अशी अवस्था आहे. आज शिकलेल्या मुलांना ही त्यांचे आई वडील भिक्षा मागून पोसत आहेत. त्यातल्या मी ही एक आहे. नोकरी नसल्यामुळे समाजात मला स्वीकारले जात नाही, अपमान केला जातो, शिक्षण घेऊन फिरतो यामुळे हिणवले जाते. तसेच मला घरातील भावंडे, आई वडील यांच्या ही रोष्याला सामोरे जावे लागते. ही सारी अवहेलना मला पावला गणीस सहन करत, समाजाचे टोमणे खात जगावे लागते.


मी जरी शिक्षण घेतले असले तरी समाजाची बोली भाषा, जीवन, रूढी परंपरा,संस्कृती, कला, धारणा, येव्हार, अंधश्रद्धा, श्रद्धा, धार्मिक उपजीविका साधने समजून घेताना अस्वस्थ होतो. तसेच त्यांचेवर होणारे अन्याय अत्याचार यांचा मागोवा घेत असताना कस लागतो. त्यांच्यावर अन्याय होऊन ही स्वतःलाच दोषी, अपराधी आहे अशी समजूत घालताना समाजाला जवळून पाहिले आहे. यांच्या वर कितीही अन्याय अत्याचार झाला तरीही त्यांचा कोणी वाली नाही. याची प्रचिती अलीकडे घडलेल्या “राईनपाडा हत्याकांड” या प्रकरणात दिसून आले. या समाजाचे एकच संघटन नाही. तसेच या हत्याकांडा प्रकरणी न्याय मिळण्यासाठी इतर भटक्या जमाती पूर्ण ताकदिनिशी रस्त्यावर उतरल्या नाहीत. जर सर्व विमुक्त भटक्या जमातींनी मिळून लढा उभा केला असता, तर त्यांच्या संरक्षणाचा कायदा आज अस्तीत्वात आला असता. जीवनात सतत डॉ. बाबासाहेब यांनी सांगितलेले विचार डोळ्यासमोर होते की, आम्हाला फक्त तुमच्या कोरड्या संवेदना नको आहेत. आम्हाला आमचे हक्क व अधिकार मिळाले पाहिजेत.
आजवरच्या जिवन प्रवासात आई वडील, भाऊ देविदास, नवनाथ, अमोल व बहीण सौ. संगीता चंद्रकांत इंगवले, सौ. ललिता कालिदास शेगर व माझी पत्नी सौ. शितल (प्रिया) मुलगा यश, मुलगी श्रेया यांची समर्थ साथ मिळाली. यामुळेच मी इथ पर्यंतचा प्रवास करू शकलो.


तसेच ज्यांच्या सहवासात मी लहानाचा मोठा झालो असे माझे नातेवाईक माझे आजोबा कै. आप्पा धोंडीबा शिंदे, माझे आई कडील आजोबा कै. एकनाथ बाबर, चुलत आजोबा श्री. बजरंग बाबर, कै.अशोक इंगवले, श्री.महादेव इंगवले, श्री.बबन इंगवले, श्री.अर्जुन शिंदे, श्री. जनार्धन बुरुंगले (माळवे), श्री. नवनाथ अर्जुन शिंदे, श्री.नाथा बाबर (कारभारी), माझे मामा श्री. बुवा एकनाथ बाबर, श्री. दादा एकनाथ बाबर, श्री. सावकार एकनाथ बाबर, श्री. अरुण एकनाथ बाबर,श्री. राजेंद्र बजरंग बाबर, श्री.शंकर बाबर, , भाचा श्री. विक्रम इंगवले व सर्व नातेवाईक यांचा नावानिशी उल्लेख करता येत नाही त्यांचे ही सहकार्य लाभले आहे. तसेच आमचे सध्याच्या पिढीत नाते संबंध जोडले गेले आहेत ते पाहुणे श्री. भगवान लक्ष्मण इंगवले, श्री. दर्शन इंगवले, कु.आण्णा इंगवले, श्री.नवनाथ चव्हाण, श्री.अनिल रावसाहेब इंगवले यांचे सहकार्य लाभले.


अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. मच्छिंद्र चव्हाण, सह पोलिस आयुक्त,पुणे श्री. भरतकुमार तांबिले, प्रा.गोरख भाऊ इंगोले, श्री. मिलिंद चव्हाण, प्रा. सुभाष भोसले, प्रा. नारायण भोसले, डॉ.श्री.कृष्णा इंगोले, सौ.मिराताई बाबर, श्री. विजय जाधव, श्री. अंबरनाथ इंगोले, श्री.शरद जगताप, श्री. भरत जगताप, श्री. शिवाजी इंगोले, श्री.भाऊराव शिंदे श्री.अनिल चौगुले, श्री.दिनेश शिंदे, श्री.अनिल चव्हाण, श्री.सहदेव सावंत, श्री. विश्वनाथ जगताप, श्री.दत्ताभाऊ शिंदे व अंकुश शिंदे (आबापुरी-लोक कलाकार) यांचे सामाजिक कार्य करण्यासाठी समर्थ साथ मिळत आहे.


तसेच समाजातील मान्यवर श्री. धोंडीराम इंगवले, श्री. शिवनाथ शिंदे, श्री. मच्छिंद्र भोसले, श्री.आनंदराव जगताप, श्री.नारायण शिंदे, श्री.अशोक जगताप, जे. के. माळी, श्री. रामचंद्र माळी सर, श्री.भालचंद्र सावंत यांचा सहवास लाभला.


तसेच हे आत्मकथन प्रकाशित करण्यासाठी विशेष सहकार्य श्री. मच्छिंद्र चव्हाण साहेब, सह पोलिस आयुक्त,पुणे व श्री.महादेव शिंदे साहेब,कार्यकारी अभियंता- मुंबई महानगर पालिका, मुंबई, श्री. शिवनाथ शिंदे, माजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांचे लाभले आहे, त्यांचा ही मी आभारी आहे.
सदरचे आत्मकथन वाचन प्रा.प्रदीप मोहिते, सौ.दीपाली चौगुले, प्रा. श्री. रेणुकादास उबाळे, प्रा. श्री. नागनाथ चुणचुणे यांनी वेळात वेळ काढून केले. व या आत्मकथनाची फॉरवर्ड अल्प कलावधीत श्री. दादा इदाते, श्री. बाळकृष्ण रेणके, श्री. लक्ष्मण गायकवाड यांनी दिली, यामुळे मी त्यांचा आभारी आहे.


या आत्मकथनाची अभ्यासपूर्ण प्रस्तावना डॉ.सुदाम राठोड, सहाय्यक प्राध्यापक, नाशिक यांनी लिहून दिली, मी त्यांचा आभारी आहे.
तसेच मी माझे गावचे विद्यमान सरपंच श्री. अमोल मोरे, उपसरपंच श्री. विकास मोरे, श्री. मुजू तांबोळी(पत्रकार), गणेश जाधव (पत्रकार), शाहीर श्री.जयवंत रणदिवे यांचा ही आभारी आहे.


या आत्मकथनाला प्रकाशित करण्याची उत्तमपणे जबाबदारी पार पाडणारे समीक्षा प्रकाशन, पंढरपूरचे प्रकाशक श्री. प्रवीण अनिल भाकरे व मुद्रित शोधणं करणारे स्मिता प्रिंटर यांचा आभारी आहे.


दिनांक- २५/०९/२०२०
ठिकाण- दिघंची

Views: 1,032
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
सोलापुरातील कोरे कुटुंबियांचा समाजापुढे आदर्श; मृत मुलीच्या स्मरणार्थ प्रबुद्ध भारत पाक्षिकास आर्थिक मदत !

सोलापुरातील कोरे कुटुंबियांचा समाजापुढे आदर्श; मृत मुलीच्या स्मरणार्थ प्रबुद्ध भारत पाक्षिकास आर्थिक मदत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)