पक्षी वाचवूया…पक्षी जगवूया..या अनोख्या उपक्रमास सलाम
……..मारुती शिरतोडे*
आपण सोबतच्या फोटोत जे दृश्य पाहताय ते कुठल्या उद्यानातले नव्हे,कुठल्या मोठ्या पार्कमधले नव्हे, प्राणिसंग्रहालयातील नव्हे अथवा कुठेतरी शेतकर्याच्या मळ्यातील मोठ्या वाड्यासमोर असलेले दृश्य नव्हे तर ते दृश्य आहे सांगली जिल्ह्याच्या पलूस पंचायत समिती आवारातील…….
तुम्ही म्हणाल इथे असे शेकडो पक्षी कसे काय उतरतात हो? तर गेल्या दोन वर्षात कोरोना कालावधीत पलूस पंचायत समितीच्या कोरोना नियंत्रण कक्षात ड्युटी करत असताना सकाळी सकाळी मला जे दृश्य पाहायला मिळत होते तेच मी या व्हिडिओमध्ये बंदिस्त केलेले आहे…..
पलूस पंचायत समिती शिक्षण विभागातील मी एक कर्मचारी.जिल्हा परिषद शाळा नं.२ पलूस येथे कार्यरत असणारा शिक्षक.गेली तेरा वर्षे मी पलूस तालुक्यातील मोराळे व पलूस याठिकाणच्या शाळेत काम केलेय.मला पलुस तालुका हा सर्वार्थानी सधन तालुका भासतो. इथला इतिहास हा स्वातंत्र्यलढ्यातील अनेक घटनांनी रोमांचकारी जसा वाटतो तसाच इथला भूगोल सुद्धा खूप मनोहारी दिसतो. इथले सगळेच नाद भरी बर का! इथला संपूर्ण भाग हा पानस्थळ आहे. कृष्णामाई सारखी देशातील मोठी नदी याच तालुक्यातून पुढे निघून जाते.येरळा नदी याच तालुक्यात कृष्णेला येऊन भिडते.त्यामुळे दोन्ही नद्यांचे काठ निसर्गाने बहरलेले दिसतात.ऊसशेती व द्राक्ष शेती,भाजीपाला सह विविध अन्नधान्यांनी सदा फुललेली असते. त्यामुळे निसर्गाचे अद्भूत लेणे या पलूस तालुक्यात अवतरलेले आपल्याला कायमच दिसून येते.
त्यामुळे इथली माणसंसुद्धा निसर्गावर प्रेम करणारी, निसर्गाकडे संवेदनशीलतेने पाहणारी,माणुसकीने वागणारी प्रेमळ माणसं या तालुक्यात आढळून येतात.इतर कोणत्याही ठिकाणावरून या तालुक्यात येऊन स्थायिक झालेली माणसं सुद्धा या सगळ्या निसर्गाच्या अद्भूत लेण्यांमुळे कायमची इथलीच बनून जातात.अशी माणुसकीने ओथंबलेली ,पशु,पक्षी,निसर्गावर मनापासुन प्रेम करणारी जी माणसं मला या तालुक्यात दिसली त्यात पलूस पंचायत समितीच्या निवासस्थानामध्ये राहणारे धर्माधिकारी दामंप्त्य यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल
.सौ.कल्पना धर्माधिकारी व श्री. योगेश धर्माधिकारी या दामंप्त्यापैकी सौ कल्पना योगेश धर्माधिकारी मॅडम या उच्चशिक्षित असून बीएस्सी संगीत विशारद आहेत.तर त्यांचे पती आपल्या सांगली जिल्हा परिषदेकडे बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहेत. गेली वीस वर्षाहून अधिक काळ हे दांपत्य पलूस मधील पंचायत समितीच्या शासकीय निवासस्थानात राहते.सौ. धर्माधिकारी मॅडम या हार्मोनियम निष्णांत असून त्यांनी सुमारे पंधरा वर्षे तासगाव डीएड कॉलेज वर संगीत शिक्षक म्हणून उत्कृष्ट काम केलेले आहे. अशा या आदर्श संगीत शिक्षिका निसर्गा विषयी खूप संवेदनशील आहेत.पशु पक्षांवर,वृक्ष वेलींवर झाडांमाडांवर नितांत प्रेम करणाऱ्या या मॅडमचा स्वभाव मितभाषी अन मनमिळावू आहे.
मॅडमच्या मते पक्षी हा निसर्गातला छोटासा घटक पण मोठ्या प्रमाणात निसर्गातील स्वच्छता राखणारा महत्वाचा घटक आणि फार सुंदर दिसणारा आपला मंजूळ आवाज सर्वांपर्यंत पोचवणारा पक्षी मग तो कोणता का असेना तो मला खूप आवडतो अन भावतोही.परंतु गेल्या कित्येक शतकांमध्ये पृथ्वीची लोकसंख्या जसजशी वाढायला लागली, तंत्रज्ञानात जसजशी वेगवान प्रगती व्हायला लागली तशी पक्षांच्या,प्राणीजगताच्या अधिवासाना, त्याच्या मूळ अस्तित्वाला धोकादायक ठरणारी परिस्थिती निर्माण झाली.आणि पृथ्वीच्या पाठीवरुन पक्षांच्या अनेक प्राण्यांच्या कित्येक जाती कायमच्या नष्ट होऊ लागल्या ही बाब धर्माधिकारी मॅडम यांच्या मनाला कायम सलतेय. त्या म्हणाल्या की अलीकडील काही वर्षात आधुनिक तंत्रज्ञानामुळे,विविध ठिकाणी मोबाईलचे टॉवर जाळे पसरलेमुळे निसर्गातला छोटा सजीव घटक पक्षी याला खूप मोठी हानी पोहोचली असून मानवाचा जादा होणारा विकास निसर्ग पर्यावरणाला मोठा धोका ठरू पाहात आहे.
म्हणून चला आपण पक्षी वाचवूया,,चिमण्या जगवूया हे अभियान स्वतःपासून राबवण्याचे मी ठरवले आणि पक्ष्यांसाठी पंचायत समितीच्या आवारात धान्य पसरण्यास सुरवात केली. हळूहळू हे धान्य खाण्यासाठी येणाऱ्या पक्षात वाढ होऊ लागली. गेली आठ वर्षे या धर्माधिकारी मॅडम नित्यनेमाने आपल्या राहत्या घरी पंचायत समितीच्या आवारात सकाळी सात वाजता धान्य टाकतात. ते धान्य टिपण्यासाठी नित्यनेमाने शेकडो पक्षी पंचायत समितीच्या आवारात उतरतात.गेल्या आठ वर्षात दररोज सकाळी सात वाजता पलूस पंचायत समितीला शेकडो पक्षी आवर्जून भेट देतात.पंचायत समितीच्या आवारात मुक्तपणे घिरट्या घालतात.
मैदानावर धर्माधिकारी मॅडम यांनी टाकलेले धान्य टिपतात व कोणतीही घाण न करता दूर उडून जातात. रोज सकाळी अडीच किलो धान्य नित्यनेमाने आवारात पसरले जाते. या धान्यावर शेकडो पक्षी ताव मारतात.इथे येणाऱ्या पक्षांमध्ये पारवे,चिमण्या,कावळे आणि इतर छोट्या मोठ्या पक्षांचे आपल्याला सहज दर्शन होते.खरतर रोज सकाळी आपल्याला पंचायत समितीच्या आवारात विविध पक्ष्यांचे मनोहारी दर्शन धर्माधिकारी मॅडम यांच्या पक्षांसाठी धान्य या उपक्रमामुळेच घडतेय. मॅडम म्हणाल्या की पसरलेल्या धान्यांमध्ये हायब्रीड आणि तांदूळ हे धान्य चिमण्यांसाठी असते तर गहू आणि ज्वारी मोठ्या पक्षांसाठी पसरलेले असते.
जेव्हा धान्य टिपण्यासाठी पक्षी इथे उतरतात तेव्हा धर्माधिकारी मॅडम स्वतः या ठिकाणी थांबून राहतात. आलेल्या पक्षी पाहुण्यांच्या वर कुत्र्यांनी मांजरांनी हल्ला करू नये,त्यांना कुणी इजा पोहचवू नये याची काळजी त्या घेतात. एखाद्या दिवशी धान्य टाकायला उशीर झाला तर सगळे पक्षी धर्माधिकारी मॅडम ज्या घरात राहतात त्या घराच्या टेरेस वरती जाऊन बसतात.इतकी निसर्गातल्या पक्षांना धर्माधिकारी मॅडमची लागली आहे. हल्ली मॅडम काही दिवस सांगलीत राहतात तर काही दिवस पलूस मध्ये राहतात. जेव्हा त्या सांगलीत असतात तेव्हा एका खोलीमध्ये पक्ष्यांसाठी धान्य असलेलं पोतं ठेवतात आणि शेजारच्या मावशींना सांगतात की दररोज सकाळी अडीच ते तीन किलो धान्य पंचायत समितीच्या आवारात पसरून ठेवा.अशारितीने धान्य पसरण्यामध्ये कधीही खंड पडलेला नाही.
सकाळी सकाळी आपल्याला पंचायत समितीच्या आवारात पसरलेले धान्य दिसते. शेकडो पक्षी आलेले दिसतात. मनसोक्तपणे हे पक्षी मॅडम नी दिलेले खाऊ खाऊन दूर निघून जातात.हे गेल्या आठ वर्षातील दृश्य म्हणजे मॅडम च्या ठायी असलेले कमालीचे पक्षी प्रेम, निसर्ग प्रेम आपल्याला दिसून येते.शेकडो पक्षी दररोज पलूस पंचायत समिती च्या दिशेने सकाळी सकाळी आपल्या घरट्यातून उडून धाव घेतल्याचे दृष्य जेव्हा आपल्या नजरेस पडते तेव्हा मन प्रसन्न होते. आजूबाजूच्या पर्यावरणाचा या पर्यावरणामध्ये असणारे विविध प्रकारच्या जीवांचा एकमेकावर अवलंबून असलेला समतोल, पक्ष्यांची प्राण्यांची सरपटणाऱ्या प्राण्यांची कीटकांची मानवी प्राण्यांची एकमेकांमध्ये असलेली गुंतवणूक ह्या साखळीच्या कड्या एकमेकात गुंतलेल्या असतात.त्यामुळे एका वनस्पतीच्या एका प्राण्याच्या एका पक्षाच्या नाहीशा होण्यामुळे कुठेतरी या साखळीतला दुवा निखळतो आणि पर्यावरणाचा तोल बिघडतो हे लक्षात घेऊन प्राणी-पक्षी निसर्गातील सर्व झाडे वेली यांचा अर्थात पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी धर्माधिकारी दामंप्त्या प्रमाणे प्रत्येकाने आपापल्या परीने जर काही प्रयत्न केला तर पृथ्वीवरून नामशेष होणाऱ्या विविध प्राण्यांच्या पक्ष्यांच्या जाती टिकवण्याच्या प्रक्रियेतील जाणीव जागृतीमध्ये आपलाही सहभाग नक्कीच दिसेल.
आपण प्रत्येक जण आपल्या हातून रोज पर्यावरण रक्षणाच्या कामाला थोडीफार मदत करु शकतो हाच धडा धर्माधिकारी मॅडमनी समाजासमोर ठेवला आहे. धर्माधिकारी मॅडम आणि त्यांचे सर या दोघांनाही या चांगल्या आदर्श कामाबद्दल पलूस पंचायत समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी यांच्यावतीने मनापासून धन्यवाद
© मारुती बळवंत शिरतोडे
जि. प. शाळा नं. 2 पलूस







