‘ घरोघरी शाळा ‘ मुख्याधापक संजय खरात दहिवडी यांचा उपक्रम महाराष्ट्र मध्ये आदर्श विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरेल – विनय गौडा
विद्यार्थ्यांच्या घरी स्वतंत्र शाळा निर्माण करून अखंडितपणे शिक्षण सुरू
माण ;
वडगाव ता़ माण जि.सातारा या ठिकाणी सुरू असलेल्या ‘घरोघरी शाळा’ या उपक्रमांतर्गत नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी त्याच्या घरातच तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र शाळेचे उद्घाटन सातारा जिल्हयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
वडगाव शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक संजय खरात यांनी कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी गत शैक्षणिक वर्षापासून वडगाव ता.माण येथे त्यांच्या स्वकल्पनेतून घरोघरी शाळा हा उपक्रम राबवून प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी स्वतंत्र शाळा निर्माण करून विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडीतपणे सुरू ठेवले आहे. नवीन शैक्षणिक वर्षातही कोरोना संकटामुळे शाळा बंद असल्याने इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या स्वतंत्र शाळांपैकी कु.अर्पिता ठोंबरे या विद्यार्थिनीसाठी तिच्या घरात तयार केलेल्या शाळेचे उद्घाटन सातारा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या शुभहस्ते व जि.प. वर्धाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. सदर उद्घाटनासाठी विद्यार्थीनीच्या घरात व घराबाहेर फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. दारात आकर्षक रांगोळी काढण्याबरोबरच रस्त्यात फुलांचा सडा टाकण्यात आला होता. मान्यवरांचे आगमन होताच कु.अर्पिता ठोंबरे या विद्यार्थिनीने मान्यवरांना गुलाबपुष्प देवून त्यांचे स्वागत केले. सौ.माया ठोंबरे यांनी विनय गौडा व मा.सचिन ओंबासे यांचे औक्षण करून स्वागत केले.
घराच्या दाराला लावलेली रिबन कापून घरोघरी शाळेचे उद्घाटन करून घरात तयार केलेली शाळा पाहताच ‘छान केलं आहे सर्व हे’ !!!असे सहज उद्गार विनय गौडा यांनी काढले. कु.अर्पिता ठोंबरे हिने घरातील भिंतीवर लावलेल्या तक्त्यांचे अचूकपणे वाचन करून दाखवताच उपस्थित सर्वांनी उत्स्फुर्तपणे टाळ्या वाजवून विद्यार्थीनीचे कौतुक केले. सदर घरातील ८० वर्षाच्या अशिक्षित आज्जीनीही घरात लावलेले तक्ते अचूकपणे वाचन करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
दोन्ही जिल्हयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर उपक्रमाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली. सदरचा उपक्रम राज्याला दिशादर्शक असल्याचे मत व्यक्त करून संजय खरात सरांना शाबासकीची थाप देवून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास पं.स.माणचे बी.डी.ओ.सर्जेराव पाटील , पं.स.माणच्या विस्ताराधिकारी सौ.सोनाली विभुते मॅडम, केंद्रप्रमुख नारायण आवळे ,वडगावचे सरपंच अजिनाथ जाधव ,उपसरपंच संजय ओंबासे व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.