• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

श्रीमंत बाबासाहेब (दादा) देशमुख : महान संघर्ष योद्द्धा- प्रा. विजय शिंदे

माणगंगा by माणगंगा
March 10, 2022
in सांगली
0
श्रीमंत बाबासाहेब (दादा) देशमुख : महान संघर्ष योद्द्धा- प्रा. विजय शिंदे

आटपाडी तालुक्याचे भाग्यविधाते श्रीमंत बाबासाहेब देशमुख ( दादा) यांची १० मार्च २०२२ रोजी ९९ वी जयंती..

    तसेच १० मार्च २०२२ ते १० मार्च २०२३ हे वर्ष दादांचे जन्मशताब्दी वर्ष कालावधीचे असून. यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा आढावा ......

कै. रस्तुमराव उर्फ बाबासाहेब चित्रोजीराव देशमुख यांचा जन्म १० मार्च १९२३ रोजी झाला तर त्यांचे निधन ३० मे १९८६ साली झाले

( लेखन…. प्रा. विजय शिंदे मराठी विभागप्रमुख श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय,आटपाडी)

श्रीमंत बाबासाहेब देशमुख म्हणजे महान संघर्षयोद्धा होय…

अनेक शतकानंतर एखादा महामानव जन्माला येतो आणि आपल्या अविश्रांत कष्टाने आकाशाला गवसणी घालणाऱ्या स्वप्नांनी कालचक्राला कलाटणी देत देत स्वतःच्या परिसराचा चेहरामोहराच बदलून टाकतो.

अशा महामानवांच्या प्रयत्नांनी त्यांचा परिसर इतका बदलतो की कालचा तो हाच का प्रदेश ? असा काही वेळा आपल्या मनाला प्रश्न पडतो.
श्रीमंत बाबासाहेब देशमुख आटपाडी तालुक्याला लाभलेले असेच एक महामानव होते. त्यांनी तालुक्याला फक्त जन्माला घातले नाही, तर त्याला सांगली जिल्ह्यातील इतर सधन तालुक्यांच्या बरोबरीने प्रगत करण्यात त्यांनी आपली संपूर्ण हयात घालविली.
उच्चकुलीन, सरंजाम घराण्यातला जन्म तरीही ऐषआरामात जीवन घालविण्याऐवजी त्यांनी स्वतःला समाजसेवेत झोकून दिले.
प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आणि समाजसेवेच्या ध्यासापोटी कसल्याही साधनसामग्री शिवाय एक माणूस डोंगराएवढे प्रचंड कार्य करू शकतो ही गोष्ट संघर्षवीर बाबासाहेबांनी स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिली.
आपल्या एका आयुष्यात जे कार्य केले ते इतरांना अनेक जन्म घेऊनही करता येणार नाही.
काही माणसं जन्माने मोठी असतात, काहीवर ते लादलं जातं, तर काही माणसं स्वतःच्या कर्तबगारीने मोठी होतात. मात्र जन्मानं आणि कर्तृत्वानं या दोन्ही गोष्टींनी मोठी असणारी माणसं अगदी क्वचितच पहायला मिळतात.
श्रीमंत बाबासाहेब देशमुख हे या दोन्हीही गोष्टींनी मोठे होते.
त्यांचा जन्म आटपाडीतील थोरल्या वाड्यातला.
या वाड्याला परंपराही खूप मोठी. इ.स.पूर्व ९११ पासून वतनदारांचा हा वाडा. मूळ पुरुष चित्रोजी चव्हाण- देसाई उर्फ देशमुख. “सेना खासकेल समशेरबहाद्दूर , सरसुभे, प्रांत आटपाडी.

अशी त्यांची विजापूर दरबारची पदवी होती. औंध संस्थांचे ते एक नंबरचे सरदार. विजापूरच्या आदिलशहानं दिलेली प्रचंड जहागिरी. अगदी सुखाचारीपासून ते पार पलिकडे खवासपुरापर्यंत. इथले सर्व धर्मांचे सणा -उत्सवांचे मानपान प्रथम यांचे. शंकराचार्यांचा पदस्पर्श या वाड्यात झालेला. शंकराचार्यांनी “महाजन” ही दिलेली पदवी आणि ताम्रपट यांचा.
त्यांनी न्यायदानाचे बावन्न अधिकार दिले ते याच वतनदार देशमुख वाड्यास. जो काही न्यायनिवाडा करायचा तो यांनी.
अशा परंपरेचे पाईक असलेल्या उच्चकुलीन घराण्यात आण्णासाहेब आणि सूर्याक्कादेवी या माता-पित्याच्या पोटी बाबासाहेबांचा जन्म १० मार्च १९२३ रोजी त्यांचे आजोळ उमराणी या गावी डफळेसरकार यांच्या घरी झाला.

सन १९३० साली आप्पांचे म्हणजेच आजोबांचे देहावसान झाले. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण आटपाडी येथे पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी औंध संस्थानचे अधिपती बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी त्यांना औंध येथे नेले.

परंतु १९३९ मध्ये बाबासाहेबांचे वडील अण्णासाहेबांचे अचानक निधन झाल्यामुळे परत ते आटपाडीस आले.
अगदी कमी वयामध्ये आजोबांचे आणि वडिलांचे छत्र हरविल्यामुळे बाबासाहेबांवर खूप मोठी कौटुंबिक जबाबदारी येऊन पडली. त्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण अपुरे राहिले. त्यानंतर त्यांनी आपल्या सार्वजनिक आयुष्यास सुरुवात केली.

 बॅरिस्टर आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांचे बरोबर "ग्राम राज्य" योजनेतील साक्षर योजनेत सहभाग घेतला आणि आटपाडीच्या बत्तीस खेड्यात हिंडून प्रौढ साक्षर योजना राबविली.

१९३९ मध्ये ते अज्ञान असल्यामुळे त्यांची स्थावर जंगम मालमत्ता औंध संस्थानच्या कोर्ट ऑफ वाॅर्डमध्ये गेलेली होती. परंतु १९४१ मध्ये सज्ञान झाल्यावर त्यांची संपूर्ण स्थावर-जंगम मालमत्ता कोर्ट ऑफ वाॅर्ड औंध संस्थान यांनी बाबासाहेबांच्या ताब्यात दिली.
१९४२ मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी आटपाडी गावामध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रसेवा दलाशीही बाबासाहेबांचा संबंध आला.
त्यानंतर मात्र सन १९४२ ते १९४६ या कालावधीमध्ये त्यांनी आपले संपूर्ण लक्ष शेतीत घातले.
परंतु बाबासाहेबांवर पुन्हा एक मोठा आघात झाला आणि त्यांच्या मातोश्री सूर्याक्कादेवी यांचा १९४६ मध्ये मृत्यू झाला.
अल्प काळामध्ये त्यांच्यावर कुटुंबाची, सार्वजनिक कामाची जबाबदारी आली. यातूनच त्यांनी खूप संघर्ष करीत आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली.
१९४६ मध्ये बाबासाहेब देशमुख यांचा वसंतदादांशी संबंध आला आणि आटपाडी येथे त्यांची पहिली भेट झाली. यातूनच त्यांच्या राजकीय जीवनाला हळूहळू सुरुवात झाली. त्यानंतर १९४८ मध्ये बहाद्दूरवाडीकरांची कन्या विजयादेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आणि वैवाहिक जीवनास सुरुवात झाली. पुढे मात्र औंध संस्थानाचे विलीनीकरण झाले.

१९४८ मध्ये गांधीवधानंतर झालेल्या जळीताच्या वेळी सामंजस्याच्या भूमिकेतून दादा ठामपणे उभे राहिले.
१ ऑगस्ट १९४९ साली नवीन दक्षिण सातारा (सांगली) जिल्हा अस्तित्वात आला. १९५१ मध्ये “गाव तेथे प्राथमिक शाळा” या योजनेत त्यांनी पुढाकार घेतला.
१९५२ मध्ये आटपाडीला महालाचा दर्जा प्राप्त झाला. तरीही हा स्वतंत्र तालुका नव्हता. दुःख, दैन्य , दारिद्र्य यात गोरगरीब, भोळीभाबडी माणसे होरपळत होती. ओसाड माळरान, शिक्षणासाठी होणारी गैरसोय, दुष्काळामुळे लोकांचे होणारे स्थलांतर आणि अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जीवन जगणारी माणसे दादांनी स्वतः पाहिली, अनुभवली.
दरम्यानच्या काळात वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, बाबासाहेब आखाडकर, बॅरिस्टर आप्पासाहेब पंत यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

  शैक्षणिक क्रांती झाल्याशिवाय तालुक्याचा विकास होणार नव्हता. म्हणूनच १२ डिसेंबर १९५३ साली आपल्या मित्रांना समवेत घेऊन बाबासाहेब देशमुख यांनी दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. "गाव तेथे प्राथमिक शाळा ", "वाडी तेथे बालवाडी" या योजनांची त्यांनी पूर्ण अंमलबजावणी केली. सन १९५३ ते १९८६ या ३३ वर्षांच्या कालखंडात बाबासाहेबांनी १९ माध्यमिक विद्यालये, 

१ महाविद्यालय, २ ज्युनियर कॉलेज, ४ वसतिगृहे, ३ वाचनालये आणि 1 तंत्र शाळा एवढे शैक्षणिक कार्य वाढविले. आज या शैक्षणिक संस्थेचा वटवृक्ष झालेला आहे.

श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी १९५५ मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना केली.१९५७ मध्ये सक्रिय राजकारणात यशस्वीरित्या पदार्पण केले आणि लोकल बोर्डावर काँग्रेसतर्फे प्रचंड बहुमताने निवडून आले. या काळात त्यांनी संपूर्ण आटपाडी महालाचा अभ्यास केला. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गाव, वाडी यांचा सर्वे केला.  लोकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन जनसंपर्क वाढविला. यातूनच त्यांच्या मनामध्ये स्वतंत्र तालुक्याचा विचार घोळू लागला. 

दरम्यानच्या काळात त्यांनी ताकारीहून खानापूरला मार्केट कमिटी आणली.
१९६२ साली प्रथमच जिल्हा परिषद अस्तित्वात आली आणि जिल्हा परिषदांच्या अधिपत्याखाली पंचायत समित्या स्थापन झाल्या. १९६२ साली निर्माण झालेल्या आटपाडी – खानापूर तालुक्याचे पहिले सभापती होण्याचा बहुमान त्यांनी प्राप्त केला.
१९५८ साली विनोबा भावे यांच्या भूदान यात्रेचे आटपाडीत स्वागत केले आणि त्यामध्ये सक्रीय सहभाग नोंदविला.
१९५८ मध्ये दिघंची हायस्कूलची स्थापना केली आणि त्यातूनच पुढे १९६१ मध्ये भवानी हायस्कूलचे आटपाडी एज्युकेशन सोसायटीकडे हस्तांतरण झाले.
त्यानंतर त्यांनी आटपाडी तालुका स्वतंत्र करण्यासाठी बाळासाहेब देसाई, बाबासाहेब आखाडकर या व्यक्तींच्या माध्यमातून मोरारजी देसाईंना साकडे घातले आणि या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले.

अखेर १ एप्रिल १९६५ रोजी आटपाडी तालुका स्वतंत्र झाला. त्यानंतर आटपाडी साठी स्वतंत्र पंचायत समिती स्थापन केली. आणि ऑक्टोबर १९६५ मध्ये श्रीमंत दादा एकमुखाने तालुक्याचे पहिले सभापती झाले. १९६५ ते १९७९ या सलग १४ वर्षांच्या कालावधीमध्ये आटपाडी तालुक्याचे सभापती म्हणून काम पाहिले. याच काळात एका पंचवार्षिक निवडणुकीत सर्व सभासद बिनविरोध निवडून आणले.
हा त्यांच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ आहे. तालुक्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी ठिकठिकाणी सर्वे करून या तालुक्यात ९ मोठे इरिगेशन तलाव, १५० पाझर तलाव तयार करण्यात आले. संपूर्ण तालुक्यात प्रमुख ठिकाणी बडींग व नाला बडिंगची कामे हाती घेण्यात आली.व ती पूर्णत्वास नेली.

त्यामुळे हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली आले. शासनाच्या “अधिक धान्य पिकवा” मोहिमेत भाग घेऊन उन्हाळी हंगामात प्रामुख्याने संकरित ज्वारी ६० हजार एकर, कापूस ५ हजार एकर, भुईमूग ३ हजार एकर असा उन्हाळी कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविला. हे कार्य पाहण्यासाठी श्री.शरदरावजी पवार, श्री. श्रीमंतराव बोर्डे, आणि श्री.शंकरराव चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्री आले होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चांदीची ढाल व रुपये ५०००/ चे गहू पायलेट प्रकल्पासाठी बाबासाहेबांना बक्षीस दिले गेले.
तसेच त्यांनी शासनाच्या “कुटुंब कल्याण” कार्यक्रमात भाग घेऊन सतत पाच वर्षे १०० टक्के काम करून तालुक्याचा जिल्ह्यात सतत पहिला नंबर ठेवला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून आटपाडी तालुक्यात स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करुन घेतली.

१९६५ साली खरेदी विक्री संघाची स्थापना केली. सन १९६८ मध्ये न्यायालयाची स्थापना केली. याशिवाय पंचायत समिती साठी जागा आणि इमारत, तहसील कार्यालयासाठी जागा व इमारत, दिवाणी व फौजदारी न्यायालयात जागा व इमारत, एसटी डेपो इमारत अशा एकूण जवळपास साठ गोष्टी बाबासाहेब देशमुख यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाल्या. त्याचप्रमाणे आटपाडीच्या दोन्ही ओढ्यावर दगडी पूल, माणगंगा नदीवर पूल बांधल्यामुळे दळणवळणाच्या सोयी उपलब्ध होऊन सुकर झाल्या.
१९६८ मध्ये पंचायत समितीची शंभर टक्के कर वसुली करुन राज्यात पहिला क्रमांक प्राप्त केला.
आटपाडी तालुक्यातील मुलामुलींची उच्च शिक्षणाची गरज ओळखून १९६९ मध्ये महाविद्यालयाची स्थापना केली. याशिवाय १९७१ मध्ये बँक ऑफ इंडियाची शाखा, १९७२ मध्ये बाबासाहेब देशमुख गृहतारण निर्माण संस्था स्थापन केली.
तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी म्हणून नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली तसेच तालुक्यामध्ये विहिरींना, गावांना आणि छोट्या प्रकल्पांना विद्युत पुरवठा व्हावा म्हणून आटपाडी येथे स्वतंत्र विद्युत केंद्र उभारले.
दूरध्वनी केंद्र,प्राथमिक आरोग्य केंद्र, जनावरांसाठी दवाखाने, सिद्धनाथ मंदिराचा जीर्णोद्धार, गाव तिथे एस.टी. अशी अनेक कामे श्रीमंत दादांनी सभापती कालावधीत पूर्ण केली.
तसेच शिक्षण प्रसाराचे मोठ्या प्रमाणात जाळे विणले गेले.

   तसेच १९७२ मध्ये सहकारी साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून तालुक्यातील शेतकरी वर्गाची मोठी परिषद आयोजित करण्यात केली. १९७२ मध्ये स्वतंत्र मार्केट कमिटीची स्थापना केली व याच बाजार समितीचे पहिले सभापती म्हणून कार्यकाळ भूषविला. १९७२ मध्ये यशवंत जिनिंग फॅक्टरी सुरू केली. सन १९७२ - ७३ च्या मोठ्या दुष्काळामध्ये मोठ-मोठे पाझर तलाव, रस्ते , टँक्स आणि इतर अनेक महत्त्वाची कामे करून लोकांच्या हाताला काम दिले.

१९७३ मध्ये आटपाडी एस.टी.डेपोची स्थापना केली. १९७५ मध्ये विटा मर्चंट बँक शाखा, तसेच भूविकास बँक शाखा स्थापन केली. १९८० मध्ये प्राथमिक शिक्षक सहकारी बँक शाखा. तसेच आटपाडी, दिघंची, खरसुंडी, करगणी येथे शासकीय दवाखाने उभे केले. त्याचबरोबर आटपाडी, दिघंची, खरसुंडी, नेलकरंजी येथे पशुवैद्यकीय दवाखाने, कॉटेज हॉस्पिटल योजना, त्याशिवाय विणकर सहकारी सोसायटीची स्थापना ही याच काळात करण्यात आली. धार्मिक कार्य म्हणून महाराष्ट्रातील अग्रगण्य कुलदैवत श्री. सिद्धनाथ खरसुंडी देवालयाच्या शिखराचा जीर्णोद्धार करुन श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांचे अध्यक्षतेखाली लाखो रुपयांचा खर्च करून शिखर उभारलेले आहे.

     १९६५ ते १९७९ या १४ वर्षांच्या आपल्या सभापतीपदाच्या कार्यकाळामध्ये भीषण दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आटपाडी तालुक्यात आमुलाग्र स्वरुपामध्ये विकास योजना राबवून तालुक्याचा कायापालट केला. अनेक सोयी सुविधा निर्माण केल्या.गोरगरीब,सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करुन जगण्याची उर्मी निर्माण केली.त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे बहुमोल कार्य केले.लोकांचे दुःख,दैन्य,दारिद्र्य,हाल - अपेष्टा कमी व्हाव्यात म्हणून स्वतःचे संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.आपल्या तीनही मुलांना समाजकार्य, प्रामाणिक जीवनविकासाचे धडे दिले. श्रीमंत दादांना त्यांच्या पत्नी विजयादेवी देशमुख यांची मोलाची साथ लाभली. माणदेशातील कोणत्याही जाती धर्मातील व्यक्ती वाड्यात आल्यानंतर उपाशी कधी गेला नाही. पोटभर जेवण करुन बिनधास्तपणे लोक मुक्काम करत. तालुक्याच्या विकासामध्ये मुख्य भूमिकेत जरी श्रीमंत दादा असले तरी पडद्यामागील भूमिका पार पाडण्याचे काम त्यांच्या पत्नीने केले. म्हणून अन्नपूर्णा आईसाहेब अशी बिरुदावली त्यांना लाभली. 

जाती धर्मापलिकडे जाऊन सामाजिक मूल्यव्यवस्था जपण्याचे महत्वाचे कार्य दादा आणि आईसाहेबांनी केले.
श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी स्वरूपाचे होते. त्यांचे शिक्षण कमी झाले असले तरी विचारांची बैठक पक्की होती.या परिसरातील शिकलेल्या मंडळींना बरोबर घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या विकास योजना कशा राबवता येतील याबाबतीत ते सातत्याने विचारविमर्श करीत असत. दादांकडे असणारे नेतृत्व गुण , सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणे, त्यांच्या घरी गेल्यानंतर घोंगड्यावर बसणे, मित्रमंडळींच्या सहवासामध्ये राहणे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना दादा हवेहवेसे वाटत असत. याशिवाय तालुक्यातील प्रसिद्ध साहित्यिक ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर , शंकरराव खरात, म.गो. पाठक, कृष्णराव सपाटे अशा अनेक साहित्यिकांच्या गप्पा मैफिलीमध्येही श्रीमंत दादा रमत असत. हुरडा पार्टीचे आयोजन केल्यानंतर दादा आवर्जून सहभागी होत असत. श्री.नारायणराव देशपांडे,श्री.भास्करराव देशपांडे, ह.ग.देशमुख अशा जाणकार व्यक्तींचा सहवास त्यांना लाभला. यातून त्यांचे सर्वसमावेशक व्यक्तिमत्व घडत गेले.

आटपाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासातून झालेला कायापालट आणि त्यातूनच दादांच्या मनामध्ये एका नव्या स्वप्नाने घर केले. दादांना आपल्या तालुक्यामध्ये साखर कारखाना असावा असे वाटू लागले. १९७९ नंतर त्यांनी आपला सारा वेळ साखर कारखान्याच्या कामासाठी व्यतीत करण्याचे ठरविले. आणि पुन्हा एकदा गरुडझेप घेतली. खरेतर दादांच्या अथक परिश्रमातून आटपाडी तालुका महाराष्ट्राच्या नकाशावर ताठ मानेने उभा होता कारण तालुक्यातील दुष्काळी भागाचा कायापालट करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तालुक्याचा कायापालट करण्यात त्यांनी जे रात्रंदिवस भगीरथ प्रयत्न केले ते कुणालाही विसरता येणार नाहीत.
    १९८१ मध्ये दादांनी दहा कोटी रुपयांच्या साखर कारखान्यास परवानगी मिळविली.यामध्ये शरदचंद्रजी पवार व आबासाहेब खेबुडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. परंतु या साखर कारखान्याच्या उभारणीच्या काळात त्यांना तीन संकटांशी सामना करावा लागला. त्यातले पहिले शेअर्स गोळा करणे, दुसरे कारखान्याचे परवानगी पत्र मिळविणे आणि तिसरे जागेचा प्रश्न सोडविणे. या तिन्ही गोष्टी खूप अवघड होत्या. परंतु त्यातूनही दादांनी जिद्दीने आणि अत्यंत कुशलतेने या प्रश्नांची सोडवणूक करून कारखाना उभा केला. 

कारखाना उभारणीच्या काळात दादांना विरोधकांबरोबरच स्वकीयांनीही जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला. आटपाडीसारख्या माळरानावर साखर कारखाना उभा करणे ही
दादांची कल्पना विरोधकांना कुचेष्टेची वाटू लागली. परंतु अशा परिस्थितीमध्येही कोणाची पर्वा न करता, कोणाचाही विरोध न करता अविश्रांत श्रम घेऊन त्यांनी सहकारी साखर कारखान्याचे स्वप्न साकार केले.
तालुक्यात औद्योगिक क्रांतीची प्रभात निर्माण केली. या कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यातील शेकडो लोकांच्या हाताला काम मिळणार होते. हे दादांनी जाणलेले होते.
साखर कारखाना उभा करीत असताना दादांनी आपल्या शरीर प्रकृतीकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. दिवसेंदिवस ते शारीरिकदृष्ट्या क्षीण होत चालले. तरीही ते कारखान्याचे काम करतच राहिले. अगदी शेवटच्या दिवसात म्हणजे १९८६ च्या पहिल्या आठवड्यात पुणे येथील तज्ञ डॉक्टरांना त्यांनी आपली प्रकृती दाखविली.
औषधोपचार चालू केले. डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांतीचा त्यांना सल्ला दिला. परंतु दादांनी मात्र या सगळ्याकडे डोळेझाक केले. कारखाना उभारणी करूनच आपण विश्रांती घेवू ही त्यांची भूमिका होती. कारण थोड्याच दिवसात पांढर्याशुभ्र दाणेदार साखरेचे पोते या माळावरून सोनारसिद्धाच्या साक्षीने बाहेर पडणार होते.

दि.१५ मे १९८६ रोजी दादा कारखान्याच्या साईटवर आले. त्यांनी शिवाजीराव जाधव यांना जवळ बोलविले व म्हणाले, “आज गुरुवारचा चांगला दिवस आहे. आज बॉयलर प्रदिपन करू.” त्यावर जाधव म्हणाले, “सरकार , आज तयारी काही नाही. दुसरा नंतरचा मुहूर्त काढू या.” त्यावर दादा म्हणाले, “आता दुसरा मुहूर्त काढून बाॅयलर प्रदीपन करायला मला नंतर वेळ कोठे आहे ? आजच बॉयलर पेटवू.” आणि त्याच दिवशी दादांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन झाले.
बाॅयलर प्रदिपनच्या तिसर्या दिवशी त्यांना हार्ट अटॅक आला. तात्काळ त्यांना मशीन हाॅस्पीटल मिरज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली.परंतु लढता लढता हा महान योध्दा आपले संघर्षमय जीवन सोडून दि.३० मे १९८६ रोजी इहलोक सोडून गेले.
माणदेशातील आटपाडी तालुक्याचे भाग्यविधाते,कर्मयोगी,तपस्वी,त्यागी,स्वाभीमानी,शिक्षणमहर्षी,जाणताराजा,सहकारमहर्षी,कुशल राजकारणी श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांची प्राणज्योत मालविली. तालुक्याबरोबर संपूर्ण माणदेश हळहळू लागला. त्यांच्या कार्याच्या आठवणींनी आक्रंदून रडू लागला.
श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या रूपाने आटपाडी तालुक्याला जाणतं नेतृत्व लाभलं. तालुक्याच्या निर्मितीपासून त्याच्या संपूर्ण प्रगतीचा आलेख त्यांनी उंचावत ठेवला. हे करीत असताना कोणतीही गोष्ट त्यांना झगडल्याशिवाय अथवा संघर्षाशिवाय प्राप्त झाली नाही.
स्वतंत्र आटपाडी तालुका त्यांनी झगडूनच मिळविला. आटपाडीला मार्केट कमिटी त्यांनी संघर्ष करूनचं मिळविली. आटपाडी एज्युकेशन सोसायटी स्थापन करून श्री. भवानी विद्यालय हायस्कूल कवठेकर सोसायटीकडून संघर्षातूनच मिळविले. साध्या-साध्या सोयी मग ते कोर्ट असो, एस.टी. डेपो अथवा मुंबईला आटपाडीची गाडी सुरू करायची असो. त्यांना संघर्ष करावा लागला. जणू काय त्यांचा जन्मच मुळी संघर्षासाठी झाला होता. तरीही बाबासाहेब देशमुख यांनी जे एका जन्मात केले ते दुसऱ्यांना अनेक जन्म घेऊनही करता येणार नाही.
दादांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त प्रा.विश्वनाथ जाधव यांनी ‘श्रीमंत बाबासाहेब देशमुख’ यांचे ५४ पृष्ठांचे छोटेखानी अभ्यासपूर्ण चरित्रलेखन करुन १० मार्च २०२१ रोजी प्रकाशित केले आहे. यातून त्यांनी अनेक नवे संदर्भ वाचकांसाठी लिखितरुपात आणले आहेत. याबरोबरचं दादांचे एकूण जीवनकार्य चरित्रग्रंथरुपाने व्यापक स्वरुपात जन्मशताब्दी वर्षाच्यानिमित्ताने वाचकांच्या हाती आले तर निश्चितचं वाचक याचे मनापासून स्वागत करतील .
श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, कृषी , सहकार, औद्योगिक, व्यापार आणि तालुक्याच्या संपूर्ण विकास कार्यासाठी आपले आयुष्य व्यतीत केले, हे कुणालाही विसरता येणार नाही. आटपाडी तालुक्याच्या विकासाचा पाया रचणारा एक महान कर्मयोगी, संघर्षयोद्धा म्हणून आपणास सतत प्रेरणा मिळते. त्यामुळे श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांची इतिहासामध्ये नोंद घेणे गरजेचे आहे. श्री.राजेंद्रअण्णा देशमुख,श्री.उदयसिंह काका देशमुख व श्री.अमरसिंह बापू देशमुख ही दादांची तीनही मुले, तसेच सुना व नातवंडे दादांचे प्रामाणिक कार्यकर्तृत्व,विचार तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत.
श्रीमंत बाबासाहेब देशमुख ( दादा) यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यास व विचारांना विनम्र अभिवादन . …

लेख -प्रा.विजय शिंदे
श

    

Views: 1,381
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
चंद्रमणी बुद्ध विहाराचा नुतनीकरण सोहळा संपन्न…!

चंद्रमणी बुद्ध विहाराचा नुतनीकरण सोहळा संपन्न…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)