अजंदे बुद्रुक येथे विजेचा धक्का लागून बैल जागीच ठार
भाटपुरा :
अजंदे बुद्रुक येथील शेतकरी प्रदीप भगवान वारुळे वय 38 यांच्या अजंदे बुद्रुक शिवारातील गट क्रमांक 105 /1 उसाच्या शेतात मशागतीचे काम सुरु असताना दिनांक 13 जून रोजी सकाळी9:30 वाजेच्या सुमारास विद्युत खांबांच्या लोंबकळलेल्या तारांतील विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरील खांबांवरील तारा मागील 21 मे2022 रोजी देखील याच ठिकाणी या तारा तुटून पडलेल्या होत्या. त्यावेळेस शेतकरी प्रदीप वारुळे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या संबंधित कर्मचाऱ्यांना दूरध्वनीवरून माहिती दिली होती . त्यावेळेस विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दखल घेतली नाही.
त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आज पुन्हा त्या घटनेची पुनरावृत्ती होऊन एका मुक्या प्राण्याचा नाहक बळी गेल्याने शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. घटना घडल्यानंतर संबंधित इन्चार्ज अभियंत्यांना फोन केला असता त्यांनी उचलला नाही व घटनास्थळी देखील प्रत्यक्ष भेट दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर अधिक रोष व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित वीज अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.