प्रा . आप्पासाहेब खोत यांच्या कथांतून बदलत्या कृषीजिवनाचे प्रभावी चित्रण
मराठी साहित्यात मराठी कथेचे प्रामुख्याने तीन टप्पे दिसून येतात . १९४५ पर्यंतची जुनी कथा, १९४५ ते १९९० पर्यंतची नवकथा , १९९० ते आजपर्यंतची आजची नवकथा .
प्रत्येक टप्प्यातील अनेक शब्दप्रभूंनी मराठी साहित्यातील कथाप्रांत समृद्ध केला आहे . आजच्या नवकथेमध्ये प्रा . आप्पासाहेब खोत यांच्या ग्रामीण कथेने वाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
१९९० पासून प्रा . आप्पासाहेब खोत यांनी आजपर्यंत सातत्याने कथालेखन , कथाकथन आणि कादंबरी लेखन केले आहे . प्रा खोत हे महाराष्ट्रात कथाकथनकार म्हणून सुपरिचीत आहेत . कथालेखनातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे.
कथाकथनामुळे लेखकाच्या लेखनाला बाधा येते आणि त्यांच्या हातून लेखन होत नाही ह्या विधानाला खोत सरांची लेखनी अपवाद आहे . त्यांचे कथाकथन जितक्या ताकदीचे आहे तितक्याच ताकदीचे त्यांचे कथालेखन पण आहे .
गवनेर , महापूर , रानगंगा , कळवंड , माती आणि कागूद , मरणादारी , वापसा असे आतापर्यंत एकूण सात कथासंग्रह प्रसिद्ध आहेत . नुकताच त्यांचा ‘काळीज विकल्याची गोष्ट ‘ . हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे .
‘काळीज विकल्याची गोष्ट ‘ हा ग्रामीण कथासंग्रह शिवडी मुंबई येथील ललित पब्लिकेशनने प्रकाशित केला आहे . मुखपृष्ठावर बैलगाडी , बैलजोडी व शेतकऱ्याचे आकर्षक चित्र आहे . मलपृष्ठावर लेखक आसाराम लोमटे यांनी कथासंग्रहातील कथांबद्दल आपले मत व्यक्त केले आहे .
कथासंग्रहामध्ये एकूण चौदा कथा आहेत . प्रा . खोत यांची कथाकथनाची कथा आणि लेखनाची कथा ही वेगवेगळी आहे . ‘काळीज विकल्याची गोष्ट ‘ . या कथासंग्रहातील कथांतून त्यांनी बदलत्या कृषी जिवनाचे प्रभावी चित्रण केले आहे .
मुक्या प्राण्यांबद्दलचे प्रेम, माणसांमाणसांतील कमी होत असलेली माणुसकी , नात्यांतील गुंतागुंत, दुष्काळ , दुष्काळामुळे निर्माण होणारे प्रश्न , दुष्काळावर मात करणारा शेतकरी , ऊस उत्पादकांचे प्रश्न, दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न , पिकांवर पडणारे रोग , गावांगावांतले राजकारण , भावाभावांतले वैर , मध्यमवर्गीय स्त्रियांचे प्रश्न आदी विविध विषयांवरच्या भिषण वास्तव मांडणाऱ्या कथा या कथासंग्रहात आहेत .
‘काळीज विकल्याची गोष्ट ‘ . या कथेत माणदेशातील दुष्काळाचे वर्णन करण्यात आले आहे . दुष्काळामुळे बैलजोडी दावणीला टाचा घासून मरण्यापेक्षा त्यांना विकलेलं बरं , विकताना पण ती कसाबाला न विकता खात्यापित्या दावणीला गेलेलीच बरं असा विचार करणारे औदुंबर काका , त्यांचा मुलगा नागनाथ, काकांची पत्नी पार्वती व रामलक्ष्मणाची मुकी बैलजोडी यांच्या आगळ्या वेगळ्या प्रेमाचे हृदयद्रावक वर्णन या कथेत करण्यात आले आहे . दुष्काळामुळे दिड लाखाची माणदेशी जातीवंत खिलार बैलांची जोडी अवघ्या लाखात विकल्यावर आपण आपले काळीज विकले अशी जाणीव करून घेऊन रडणारा शेतकरी वाचताना वाचकांच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय रहात नाही .
थोरली लेक कमलचं आकस्मिक निधन झाल्यावर तिचे तीन महिन्याचे बाळ व जावयाचा उघडा पडलेला संसार वाचविण्यासाठी, आपली लग्न ठरलेली दुसरी लेक मंगलचं लग्न जावयाबरोबर लावून देणाऱ्या शामरावच्या कुटुंबाचे परिवर्तनवादी विचार ‘ वडाची पारंबी ‘ . या कथेतून मांडले आहेत .
‘ दूध आणि फॅट ‘ . या कथेत दूध डेअरीकडून दूध उत्पादकांची केली जाणारी पिळवणूक व फसवणूक याचे ज्वलंत चित्रण करण्यात आले आहे .
‘ लोकरी मावा ‘ . या कथेत ऊसावर पडलेल्या लोकरी माव्यामुळे उद्ध्वस्त झालेला कर्जबाजारी शेतकरी , यांचे भिषण वास्तव मांडण्यात आले आहे . आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला त्याची पत्नी आत्महत्येपासून रोखते आणि म्हणते , . ‘ झालं गेलं इसरून जायाचं . एकांदयावर्षी एकांदं पिक वाया गेलं म्हणून जलम वाया जाईत न्हाई . धनी कुणब्यानं मरायचं नसतं आणि रडायचंबी नसतं . लढायचं असतं ‘ .
‘ बांधावरचं झाड ‘ . या कथेत जमिनीच्या बांधामुळे भांडण करून सख्खे भाऊ ऐकमेकांचे पक्के वैरी कसे होतात व पिढ्यान पिढ्या वैर कसे जोपासतात . याचे वर्णन करण्यात आले आहे .
घराच्या घरपणाला संस्कारांची सावली असली तर ते घर असते . संस्कारांची सावली नसली तर घराला नुसतीच घर – घर असते असे विचार ‘ घरपण ‘ . या कथेतून मांडण्यात आले आहेत .
‘काळीज विकल्याची गोष्ट ‘ . या कथासंग्रहातील सर्वच कथा कसदार आहेत . प्रा . खोत हे ग्रामीण मातीशी नाळ असणारे कथाकार आहेत . त्यांच्या लेखनात सातत्य आहे . आदरणीय आसाराम लोमटे यांनीही या कथासंग्रहाच्या मलपृष्ठावर तसे अधोरेखित केले आहे.
ग्रामीण माती, ग्रामीण शेती, ग्रामीण वास्तव परिस्थिती आणि ग्रामीण संस्कृत्ती या सर्वांचा वास्तवपूर्ण अविष्कार प्रा . खोत यांच्या कथांतून दिसून येतो . शेती मातीचा हुंदका आणि हुंकार त्यांच्या कथांतून व्यक्त होताना दिसतो . या कथांच्या माध्यमातून यंत्रयुगातील बदलत्या खेडयापाडयाचे वास्तव दर्शन घडते .
सहा कादंबऱ्यांचे लेखन तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चरित्र लेखनही खोत सरांनी केले आहे . त्यांच्या साहित्याचा अभ्यासक्रमातही समावेश झाला आहे . महाराष्ट्रातले प्रतिष्ठेचे अनेक साहित्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत . अनेक ग्रामीण साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भुषविली आहेत . ई . टीव्हीवरून प्रसारित झालेल्या त्यांच्या कथाकथनांच्या कार्यक्रमांना श्रोत्यांनी डोक्यावर घेतले होते .
प्रा . आप्पासाहेब खोत यांनी साहित्यातले विविध साहित्यप्रकार दमदारपणे हाताळले असले तरी ग्रामीण जिवनातले तळ कसदारपणे साकारणारी त्यांची कथा दिवसेंदिवस फुलत आहे . हे ‘काळीज विकल्याची गोष्ट’ . हा कथासंग्रह वाचल्यावर लक्षात येते .
प्रा . सुनील दबडे
( आटपाडी ), जि . सांगली .







