३१ तलाठ्यांवर १३५ गावांची जबाबदारी…!
अन् तलाठ्यांअभावी शेतकऱ्यांची खोळंबू लागली कामे
त-हाडी, ता. १० (प्रतिनिधी): तलाठी हा महसुल खात्याचा महत्त्वाचा दुवा असून शेतकऱ्यांची कामे तातडीने मार्गी लागावी या उद्देशाने महसूल विभागाने एकापेक्षा अधिक गावांसाठी तलाठी सज्जांची निर्मिती केली व एका सज्जास एक तलाठी असे धोरण आखले. मात्र शिरपूर तालुक्यातील १३५ गावांची जबाबदारी केवळ ३१ तलाठ्यावर सोपवून महसुल प्रशासनाकडूनच या नियमाला बगल दिली गेल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबल्याचे चित्रे पाहवयास मिळते.
शिरपूर तालुक्यात ११ मंडळातंर्गत ६४ सज्जे असून १३५ गावांसाठी तलाठ्यांची ६४ पदे मंजुर आहेत.मात्र ३३ सज्जांवरील तलाठ्यांची पदे रिक्त असल्याने केवळ ३१ तलाठ्यांना १३५ गावांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. प्रत्येक तलाठ्याकडे एक ते सहा गावे देण्यात आल्याने गौणखनिज उत्खननाला पाय फुटून शासनाच्या कोट्यावधी महसूलला तस्करांकडून चूना लावला जात आहे.सोबतच शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबून त्यांना तलाठ्यांचा शोध घेत दररोज एक दोन गावांची भ्रमंती करावी लागत आहे.
त-हाडकसबे सह , शिरपूर बु, शिरपूर खु,वरवाडे, अमोदा, थाळनेर -२ आढे, भावेर, बभळाज,अजनाड, अर्थे बु, कूवे, नवे भामपुर,उमर्दा, मोहिदा, वकवाड,नांदेड. खबाळे,पळासनेर,पनाखेड,आंबे,भिलटदेव, जातोडे, हिंगणी बु, निमझरी, लैकी, फत्तेपूर (फॉ), मालकातर, सुळे, खामखेडा प्र था, गरताड
,अतिरिक्त शिरपूर या सज्जातील ३३ गावांच्या शेतकऱ्याची तलाठ्यांअभावी परवड होत असून या सज्जाचा अतिरिक्त कारभार अन्य ‘सज्जा’च्या तलाठ्याकडे सोपविण्यात आला आहे.
प्रत्येक सज्जातंर्गत एक ते सहा गावे असून तलाठ्यांअभावी महसूलची चाके रुतली आहे. महसूल विभागाचा तलाठी हा कणा मानला जातो. तलाठ्याशी वाय महसूल विभागाच्या पूर्णत्वाची कल्पना करणे अशक्य आहे. शासनास महसूल जमा करून देण्यात तलाठ्यांचा मोठा सहभाग असतो. मात्र रिक्त पदांमुळे महसुलासोबतच फेरफार, ई – पिक नोंदणी, शेतजमिनीच्या वाटण्या, वादग्रस्त जमिनीचे शिवरस्ते, जमिन मोजणी, हद्दी कायम करणे,भूमिहीन प्रमाणपत्र, सातबारा उतारे, विहीरी व बोअरवेलच्या नोंदी करणे आदी कामे रखडून शेतकऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. तलाठ्याअभावी त्यांचे ‘सज्जा’ कार्यालय ओस पडले आहेत. त्यामुळे रिक्त सज्जाच्या ठिकाणी तातडीने तलाठ्यांच्या नेमणूका करून शेतकऱ्यांची अडचण सोडवावी अशी मागणी करण्यात येत आहे.
विशाल कंरके (शेतकरी 'तथा' सामाजिक कार्येकर्ते, त-हाडी),"शेतकऱ्यांना बदलल्या परिस्थितीत तलाठ्यांकडून शेत जमिनीच्या विविध दस्तऐवजांची गरज सारखी भासते. सोबतच अनेक फेरफार व इतर नोंदीसाठी दोन - दोन महिने शेतकर्यांना तलाठ्याअभावी प्रतिक्षा करावी लागते.एका - एका तलाठ्याकडे तीन-तीन, चार-चार सज्जाचा भार असल्याने शेतकऱ्यांची अनेक कामे रखडत आहे, त्यामुळे शासनाने त्वरीत रिक्त जागांवर तलाठ्यांच्या नियुक्त्या करून 'एक सज्जा एक तलाठी' या धोरणाची तातडीने अंमलबजावणी करावी."
सोबत फोटो :