कोळेकरवस्ती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी मारहाण प्रकरणाची चौकशी एल.सी.बी कडे द्यावी… जर पत्रकार दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी…..पुष्पाताई बोबडे यांची निवेदनाद्वारे मागणी…
प्रतिनिधी…विटा
आटपाडी तालुक्यातील कोळेकरवस्ती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीस मारहाण प्रकरणाची चौकशी एल .सी.बी.कडे द्यावी.तसेच पालकासह यु. टी. जाधव यांच्यावर सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल करावा. तसेच या प्रकरणात पत्रकार दोषी असल्यास त्याच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी सिंह सेनेच्या महाराष्ट्र राज्य महिला प्रमुख पुष्पाताई बोबडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विटा येथील विभागीय पोलीस अधीक्षक पद्मा कदम यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे .
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोळेकर वस्ती बाळेवाडी येथील शाळेतील विद्यार्थिनीला मारहाण प्रकरणाची शहानिशा होऊन सत्य समोर आणून दोषीवर कारवाई करावी.
बाळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या कोळेकर वस्ती शाळेमध्ये इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनीस शाळेतील शिक्षकाकडून मारहाण करण्यात आली होती. मारहाण झालेल्या पीडीतेचे पालक माध्यमासमोर आपल्या पाल्याला मारहाण झाल्याचे कबूल करून स्वतः तयार केलेला मारहाणीचा व्हिडिओ प्रसारित करतात.तर त्यानंतर पीडीतेचे पालक आता मारहाण झालीच नाही असे सांगून तक्रार देण्यास नकार देत आहेत.
म्हणजे यामध्ये त्यांच्यावर कोणाचा दबावआला आहे की, लाच घेऊन ते गप्प बसले आहेत. किंवा आरोप असलेले शिक्षक बाबासाहेब शेख यास पाठीशी घालत आहेत. अशा प्रश्नांची आणि प्रसारमाध्यमांची दिशाभूल करून वेळ वाया घालवणाऱ्या पिढीतेच्या पालकावर कारवाई करून गुन्हा दाखल करावा.
जर यामध्ये पत्रकार दोषी असल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत संशयित शिक्षकाने जर असे कृत्य केलेच नसेल तर अटकपूर्व जामीन साठी कोर्टाकडे अर्ज का केला हेही तपासने गरजेचे आहे.
या प्रकरणाची तपासणी करणारे शिक्षण विभागातील तपास अधिकारी यांनी नेमकी काय तपासणी केली याचीही चौकशी होऊन सत्यता पडताळली पाहिजे.
शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु.टी. जाधव हे या प्रकरणांमध्ये एवढ्या गांभीर्याने दखल का देत आहेत. त्या संशयित शिक्षकास पाठीशी घालण्यासाठी पत्रकारांना प्रकरण मिटवून घेण्यासाठी जाहिरात देण्याचे अमिष का दाखवत आहेत ? याचीही कसून चौकशी होऊन गुन्हेगार प्रवृत्तीला पाठीशी घालणाऱ्या यु. टी .जाधव यांच्यावर सह. आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे .त्याचबरोबर सदर प्रकरणाची चौकशी एल.सी.बी कडे देऊन या प्रकरणातील सत्यता पडताळणी करून पोलीस स्टेशनने गोपनीय अहवाल तयार करावा व या प्रकरणाचा छडा त्वरित लावावा.
मोठ्यांच्या राजकारणामुळे त्या पिढीतेवर होणारा अन्याय कदापी सहन केला जाणार नाही. अन्यथा योग्य न्याय प्रक्रियेसाठी रस्त्यावर उतरू याची नोंद घ्यावी असा इशारा सिंह सेनेच्या महाराष्ट्र राज्य महिला प्रमुख पुष्पाताई बोबडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदाद्वारे दिला आहे.