आटपाडीतील तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द सजा येथील तलाठी सुधाकर कृष्णा कुंभार, व बाळासो बापुराव पाटील, खाजगी इसम यांना २,०००/- रुपये लाच स्विकारतना रंगेहात पकडले. यामुळे संपूर्ण तालुक्यात महसूल विभागाची लाज वेशीवर आली ही कारवाई सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली
तक्रारदार यांचे वडीलांनी त्यांचे आईचे नावे बोंबेवाडी, ता. आटपाडी येथील जमीन बक्षीसपत्र करून दिली आहे. सदर बक्षीसपत्राची ७/१२ सदरी नोंद करून देणेसाठी तलाठी सुधाकर कृष्णा कुंभार यांनी तक्रारदार यांचेकडे २,०००/- रूपये लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्यूरो सांगली पथकास दिला होता.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये तलाठी सुधाकर कृष्णा कुंभार यांनी तक्रारदार यांचे वडीलांचे बक्षीसपत्राची ७/१२ सदरी नोंद करून ७/१२ उतारा देणेसाठी २,०००/- रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
लाच लुचपत खात्याने प्राथमिक आरोग्य केंद्र समोरील रस्त्यावर सापळा लावला असता तलाठी सुधाकर कृष्णा कुंभार, यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून २,०००/- रूपये लाच रक्कम बाळासो बापुराव पाटील, खाजगी इसम याचेकडे देणेस सांगून लाच रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने तलाठी सुधाकर कृष्णा कुंभार, व्यवसाय तलाठी पिंपरी खुर्द सजा, ता. आटपाडी जि. सांगली रा. कुंभार मळा, उंटवाडी रोड, मेंढेगीरी, ता. जत जि. सांगली व बाळासो बापुराव पाटील, वय ४२, खाजगी इसम रा. पाटील मळा, पांढरेवाडी रोड, आटपाडी ता. आटपाडी जि. सांगली यांचेविरुध्द आटपाडी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई अमोल तांचे सो. पोलीस उप आयुक्त ,पोलीस अधीक्षक विजय चौधरी, अपर पोलीस उप आयुक्त अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, पोलीस उप अधीक्षक, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, पोलीस अंमलदार अजित पाटील, सलिम मकानदार, पोपट पाटील, उमेश जाधव ऋषीकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, रामहरी वाघमोडे, चंद्रकांत जाधव, धनंजय खाडे, अतुल मोरे, चालक अनीस बंटमुरे यांनी केली आहे.