चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो
आटपाडी प्रतिनिधी
विभूतवाडी ता. आटपाडी येथील कै.जनार्दनबापू यांचे हॉटेल आणि त्या हॉटेल मधील चवदार भजी फेमस होती.आजही त्या हॉटेल मध्ये भजी मिळतात ..हे भजी खाण्यासाठी नागरिकच नव्हे तर पशुपक्षी सुद्धा येतात असाच एक कावळा रोज भजी खाण्यासाठी येथे दररोज हॉटेलमध्ये येत असतो.
याबाबत सविस्तर माहिती अशी की चार इंच चोच असणारा कावळा असून, तो दररोज बस स्थानककातील हॉटेलमध्ये जाऊन एकच भजी घेऊन जातो. बस स्थानकाच्या आजूबाजूला सतत नागरिकांची गर्दी असते परंतु या गर्दीतून तो येऊन हॉटेलच्या बाहेर कट्ट्यावरती बसतो. व ओरडतो त्यानंतर हॉटेल मालकाला ओरडण्याचा आवाज आल्यानंतर हॉटेल मालक त्याला एक भजी नेऊन देतो .जर हॉटेल मालकाने त्याला भजी देण्यास वेळ केला, तर तो धडक माणसातून हॉटेल मध्ये जातो व एक भजी चोचीमध्ये उचलून घेतो व निघून जातो. त्यानंतर तो पुन्हा दिवसभर फिरकत नाही .पुन्हा तो दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला भजी घेण्यासाठी येत असतो.
गावातीलच कै. जनार्दन लोहार यांनी जवळपास 40-50 वर्षांपूर्वी हॉटेल बस स्थानकामध्ये सुरू केले होते. बस स्थानकासमोर लिंबाचे मोठे झाड आहे व बस स्थानकाच्या पूर्वेला दीडशे वर्षांपूर्वीचे चिंचेचे झाड आहे. या झाडावर सकाळी अनेक पक्षी येत असतात .त्यामध्ये कावळे सुद्धा येत असतात. पूर्वी तो कावळा सकाळी सात ते आठच्या दरम्याने हॉटेलच्या बाहेर येऊन ओरडत असायचा .त्यावेळेला कै. जनार्दन लोहार हे त्याला एक भजी टाकत असे ,त्यामुळे त्या कावळ्याला सवय लागून गेली व तो कावळा माणसाळला होता.
हॉटेल मालक जनार्दन लोहार यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी यांच्याकडे हॉटेल चालवण्याची जबाबदारी आली. तरीसुद्धा तो कावळा तिथे येतच होता .आणि त्या कावळ्याची सवय यांना माहीत होती. त्यामुळे सकाळी एक भाजी देण्याची परंपरा सुरूच राहिली त्यानंतर सध्या त्यांचां मुलगा संजय लोहार व सून मनीषा लोहार हॉटेल व्यवसाय संभळत आहेत.
आजही तो चार इंच चोचीचा कावळा सकाळी सातच्या दरम्याने हॉटेलच्या बाहेर येऊन बसतो, आणि ओरडायला चालू करतो त्याला जर वेळेत भजी दिले नाही तर तो गर्दीतून थेट हॉटेलमध्ये जाऊन परातीतला एक भजा उचलून घेऊन तो निघून जातो.
अशी परंपरा ही दुसऱ्या पिढीत ही सुरू राहिली आहे. मुक्या जनावरांना जेवढा लळा लावेल तेवढे ते प्रामाणिक वागतात. घोडे असो, बैल जोडी असो ,कुत्रा असो किंवा अन्य प्राणी माणसाळलेले असतात असे अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे.
जसं की मालकाने शिट्टी मारल्यानंतर घोडा किंवा कुत्रा त्या मालकाकडे पळत येतो हे त्याला शिकवलेले असते. परंतु या कावळ्याला अशी कोणतीही शिकवण नसताना तो सतत सकाळी सात ते आठच्या दरम्यान हॉटेलच्या बाहेर येतच असतो. व भजी घेऊन जातो. ही परंपरा आजही सर्व नागरिक दररोज बघतात.