सुनील पाटील लोकभूषण आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित
24 वर्षाच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचा गौरव
आष्टा/प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद सोशल फौंडेशन आणि सत्यशोधक महिला विचारमंच आष्टा यांच्या वतीने आज तांदुळवाडी गावचे सुपुत्र, दैनिक तरुण भारतचे आष्टा प्रतिनिधी सुनील एकनाथ पाटील यांना जिल्हा बँकेचे संचालक वैभवदादा शिंदे व माजी राज्यमंत्री प्रा. मच्छिंद्र सकटे यांच्या हस्ते लोकभूषण आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आष्टा येथील हेवन हॉलमध्ये स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशनच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
यावेळी चितळे दूध डेअरीचे संचालक मकरंद चितळे, जनसेवा अर्बन बँकेचे संदीप माळी, समतावादी महिला मंचच्या प्रदेशाध्यक्षा सौ. पुष्पलता सकटे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय दणाणे, वरदराज शिंदे, बाबासो जाधव, रंजना माळी, कविता घस्ते, सोनाली कोळी,निशा वळवडे, सुनील शिंदे, सागर जगताप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनील पाटील हे तांदुळवाडी गावचे रहिवासी आहेत. त्यांनी ग्रामीण भागात वाचन चळवळ रुजावी यासाठी विवेक ग्रंथालयाची स्थापना केली. ग्रंथालय चळवळ वाढवण्याबरोबर वाचन चळवळीत ही सक्रिय सहभाग घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींना वाचनाची गोडी लागावी यासाठी विवेक ग्रंथालयाच्या माध्यमातून भरीव प्रयत्न केले. याचबरोबर ग्रंथालयाच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले. साप्ताहिक वारणेचा वाघ मधून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासात सुरुवात केली. त्यानंतर त्यांची सन 2000 साली दैनिक तरुण भारत साठी तांदुळवाडी वार्ताहर म्हणून निवड झाली. सन 2009 साली दैनिक तरुण भारत साठी आष्टा प्रतिनिधी मधून त्यांची निवड झाली. गेली चोवीस वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात आहेत. लेखणीच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न सोडवले आहेत. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून दिला आहे. महापूर, कोरोना संसर्ग काळ या काळात त्यांनी समाज उपयोगी पत्रकारिता केली. याचबरोबर पत्रकारिता क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीला त्यांनी नेहमीच मार्गदर्शनाची भूमिका घेतली आहे. गेल्याच आठवड्यात त्यांची महाराष्ट्र शासन नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झाली आहे.
त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आजवर केलेल्या कार्याची दखल आष्टा येथील स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशनने घेतली. आणि लोकभूषण आदर्श पत्रकारिता पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. प्राध्यापक मच्छिंद्र सकटे, वैभवदादा शिंदे यांनी सुनील पाटील यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील वाटचालीचे कौतुक केले. आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या. महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी पत्रकार सुनील पाटील यांचे अभिनंदन केले.
हा पुरस्कार पटकावल्याबद्दल पत्रकार सुनील पाटील यांच्यावर आष्टा शहर आणि वारणा पंचक्रोशीतून अभिनंदनचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
फोटो ओळ :
आष्टा : आष्टा येथील पत्रकार सुनील पाटील यांना लोकभूषण आदर्श पत्रकारकारिता पुरस्कार देताना प्रा.मच्छिंद्र सकटे,वैभवदादा शिंदे, शेजारी मकरंद चितळे,वरदराज शिंदे, विजय दणाणे, पुष्पलता सकटे व अन्य.