“आपले सरकार गेले, कुणीकडे?”
‘मंजुरी एकीकडे, केंद्र भलतीकडे. मूळ उद्देशालाच फासला जातोय हरताळ.’
त-हाडी :- शासकीय किंवा खाजगी कामांसाठी लागणारी कागदपत्रे लोकांना ते जिथे राहतात,त्या परिसराच्या जवळपास मिळावीत यासाठी आपले सरकार सेवा केंद्रे सुरु करण्यात आली. मात्र ज्याठिकाणी ज्या ठिकाणी या केंद्राना मंजुरी देण्यात आली आहे,त्याठिकाणी हे केंद्र सुरु करण्याऐवजी दुसरीकडेच चालविली जात असल्याचे खरे वास्तव आहे.त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्रे गेली कुणीकडे असे म्हणण्याची वेळ सद्या नागरिकांवर आली आहे.तर दुसरीकडे हे केंद्रे सुरु करण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
जनतेला हवे असलेले प्रमाणपत्र लाईनमध्ये उभे न राहता घरबसल्या त्यांना ऑनलाईन पोर्टलवर आपली आवश्यक कागदपत्रे जोडून गरज असलेले शासकीय प्रमाणपत्र मिळावे. यासाठी आपले सरकार सेवा केंद्रे सुरु करण्यात आली आहे. या सुविधा केंद्रात उत्पन्नाच्या प्रमाणपत्रातून जातीचे प्रमाणपत्र,वय अधिवास, प्रकल्पग्रस्त अशी वेगवेगळ्या प्रकारची प्रमाणपत्रे जे नागरिक जेथे राहतात तेथेच वेळ खर्च न होता, तहसील कार्यालयात धाव न घेता सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने आपले सरकार सेवा केंद्र ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरु केली गेली आहेत.या केंद्राच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करतांना ते कोणत्या ठिकाणी सुरु करायची आहे, ते स्पष्ट नमूद करावे लागते.तशी नोंद अर्जामध्ये करून ते मंजूर झाल्यानंतर दर्शविलेल्या ठिकाणीच सुरु केले पाहिजे असा दंडक आहे.मात्र सद्यस्थितीत ही आपले सरकार सेवा केंद्रे मंजूर कुठे तर चालविली जातात वेगळ्याच ठिकाणी असे दृश्य ठिकठिकाणी पहावयास मिळत असल्याने मूळ उद्देशाला यातून हरताळ फासला जात आहे.
चौकट ;
“निकष काय सांगतो.”
आपले सरकार सेवा केंद्र सुरु करतांना ग्रामीण भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक,तर शहरी भागात दहा हजार लोकसंख्येसाठी एक केंद्र सुरु करण्यात येते.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बऱ्याच ठिकाणी जेथे केंद्र मंजूर झाले आहे.तिथे हे केंद्र चालविण्याऐवजी ती केंद्रे आपल्या सोयीनुसार भलतीकडेच थाटली गेली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आवश्यक असणाऱ्या प्रमाणपत्रांसाठी दूरच्या केंद्रावर किंवा तहसीलकडे हेलपाटे घ्यावे लागत आहे.