निवडणुकीत महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या (फेस्कॉम) ज्येष्ठानसाठी मागण्या
राजकीय पक्षाच्या व उमेदवार जाहीरनाम्यामध्ये ज्येष्ठांचे खालील प्रलंबित प्रश्न व समस्या, इत्यादि बाबी समाविष्ठ कराव्यात व अंमलबजावणी करण्यात यावी. महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधान सभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जवळपास 1 कोटी ४० लाख पेक्षा जास्त आहे. सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ज्येष्ठांना पूर्वीसारखा सन्मान मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सामाजिक, कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बदलल्यामुळे ज्येष्ठांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
आपल्या भारताच्या स्वतंत्र लढ्यात, देश उभारणीत विविध माध्यमातून योगदान देऊन देशासाठी निरपेक्षपणे अहोरात्र कष्ट करणारा महत्वाचा घटक म्हणजे आजचा ज्येष्ठ नागरिक आहे. आपले अनुभव व ज्ञानाची शिदोरी असलेला समाजासाठी वेळ देणारा परंतु सर्व स्तरातून दुर्लक्षित आणि उपेक्षित असलेल्या ज्येष्ठ नागरिक यांना आपल्या पक्षाकडून व आपल्या कडून न्याय मिळेल म्हणून खालील मागण्या करीत आहोत.
सध्या सर्व राजकीय पक्ष उमेदवार निवडणुकीच्या तयारीस लागले आहात. सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष व उमेदवार जनताभिमुख व विकासात्मक जाहीरनामा प्रसिद्ध करून जनतेचे लक्ष वेधून घेत आहात. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) ही महाराष्ट्रात कार्य करणारी एकमेव मोठी संघटना आहे. फेस्कॉम मध्ये 14 प्रादेशिक विभाग असून 5000 संघ कार्यरत आहेत. ज्येष्ठाचे मतदान सरासरी सर्व मतदानाच्या 15 % असून त्याच्या 70 ते 75 % मतदान ज्येष्ठ नागरिक करतात याची सर्व पक्ष व उमेदवार यांनी दखल घ्यावी. व ज्येष्ठच्या मागण्यांचा विचार करावा.
महाराष्ट्रात एक कोटी ४० लाखावर हे मतदार आहेत. मतदाना दिवशी ज्येष्ठ नागरिक सुट्टी असून देखील पर्यटनाला न जाता मतदानाचा हक्क बजावून प्रामाणिकपणे पवित्र असे राष्ट्रीय कर्तव्य बजावत असतात. तेव्हा अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आपला पक्ष व आपण कोणत्या सुविधा देणार याचा पण उल्लेख आपल्या जाहीरनाम्यात करणे अगत्याचे आहे.
ज्येष्ठांचे उर्वरित आयुष्य सुखाने, समाधानाने जगण्यासाठी काही मुलभूत उपाय योजना करणे अत्यंत आवश्यक आहे. काही बाबतीत प्रयत्न झाले पण त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. दिनांक २०.१०.२०२४ रोजी फेस्कॉमचे श्री आण्णासाहेब टेकाळे ,अध्यक्ष यांच्या उपस्थित वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठांच्या समस्यांवर चर्चा झाली. ते प्रलंबित प्रश्न व समस्या इ. मुद्दे पुढीलप्रमाणे आपणास सादर आपणास सादर करत आहोत
ज्येष्ठासाठी प्रलंबित प्रश्नाचा जाहीरनामा.
१. रेल्वे सवलत पुन्हा प्रदान करणेबाबत, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात यावा . पुरुषांना ६० वर्षानंतर ४०%, आणि महिलांना ५८ वर्षानंतर ५०% रेल्वे प्रवास सवलत देय होती. काही कारणामुळे केंद्र सरकारने सदरची सवलत स्थगित केली. कोरोना कालावधी संपून जवळपास २ वर्षे संपली आहेत. तरी देखील रेल्वे सवलत सुरु करण्यात आलेली नाही. या बाबत आमच्या संघटनेने खासदार, रेल्वे मंत्री, केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्याकडे सतत पाठपुरावा करून देखील अद्याप यश मिळालेले नाही. तरी ज्येष्ठ नागरिकांना या पूर्वी मिळत असलेली रेल्वे सवलत पुनश्च देण्याबाबत आपल्या पक्षाच्या व आपल्या जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख करावा.
२. शेजारील राज्याप्रमाणे (आंध्र प्रदेश रु.४,०००/-) (आणि तेलंगाना रु. ४,०००/-) महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना किमान रु. ३,०००/- पालन व पोषण भत्ता देण्यात यावा.
३. ज्येष्ठ नागरिकांसाठी मंजूर झालेल्या ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळावर महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) चे ५०% प्रतिनिधीत्व देण्यात यावे व रचनात्मक कार्यक्रम सुरु करण्यात यावा.
४. ज्येष्ठ नागरिकांचे वाढते वयोमान लक्षात घेता स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले जाईल.
५. आर्थिक लाभासाठी योजनेतील ६५ वर्षे वयाची अट रद्द करून सर्व६०+ ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक योजनेचा लाभ देण्यात यावा.
६. ज्येष्ठ नागरिकांचे म्हणजेच फेस्कॉमचे २ प्रतिनिधी विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून घेतले जावेत.
७. आयुष्यमान भारत कार्ड नुसार ५ लाखाचा लाभ शासकीय व खाजगी रुग्णालयात देण्यात यावा. दरवर्षी जिल्हा नियोजन समितीकडून स्वतंत्र आर्थिक तरतुदीचे नियोजन करून सदरची रक्कम ज्येष्ठ नागरिकांच्या भल्यासाठी खर्च करण्यात यावी.
८. ग्राम पंचायत / नगरपालिका / महानगरपालिका यांचे बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ३% ऐवजी ५% तरतूद करण्यात यावी.
- ज्येष्ठ नागरिकांना आपतकालीन मदत वेळेवर मिळण्यासाठी, अशा रुग्णांचा प्राण वाचवण्यासाठी फिरता दवाखाना व तातडीची विनामूल्य ऍम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करण्यात यावी ज्येष्ठ नागरिकांच्या सुखी आनंदी आरोग्यमय निरामय समाधानी व सुरक्षित व सन्मानजन्य जीवनासाठी आपल्या पक्षाच्या व आपल्या जाहीरनाम्यात वरील मागण्यांचा आवर्जून उल्लेख करण्यात यावा ही विनंती.
९) लडकी बहीण, प्रमाणे जन्मदाते मायबाप योजना सुरू करण्यात यावी.
आदरपूर्वकआवाहन फेस्कॉम मुबंई अध्यक्ष सुरेश ईश्वर पोटे यांनी केले.