- पत्नीच्या रक्षाविसर्जना दिनीच पतीचे निधन
- वरकुटे – मलवडी येथील ह्रदयद्रावक घटन
प्रतिनिधी -वरकुटे – मलवडी /
पती हा आपल्या पत्नीवर निरपेक्षपणे प्रेम करत असतो , अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तो आपल्या धर्मपत्नीला साथ देत असतो. कधीही अंतर देत नाही. तसेच प्रत्येकाच्या मनात पत्नीबद्दल कायमस्वरूपी एक वेगळी भावना असते. त्याचे शब्दात वर्णन करता येत नाही मात्र आपल्या पत्नीच्या निधनाने व्याकूळ झालेल्या पतीने त्यांच्या रक्षाविसर्जनादिनीच आपली इहलोकांची यात्रा संपवल्याची ह्रदयद्रावक घटना वरकुटे – मलवडी येथे नूकतीच घडली आहे. शंकर पडळकर असे या पतीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी वरकुटे – मलवडी ता.माण येथील श्री शंकर पडळकर (वय ९०) हे गेले अनेक वर्षे आजारी पडले होते. त्यांच्या पत्नी सुभद्रा पडळकर (वय ८५) ह्या त्यांची सेवा करत होत्या. दुर्दैवाने त्या गेल्या आठवड्यात आजारी पडल्या होत्या. त्यांच्यावर येथील स्थानिक दवाखान्यात उपचार सुरू होते. वयाच्या मानाने शरीर उपचारासाठी योग्य अशी साथ देत नव्हते. उपचारादरम्यान त्यांचे बुधवार दि. १ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता निधन झाले. शुक्रवार दि.३ रोजी पत्नी शुभद्रा यांचा रक्षाविसर्जन विधीचा कार्यक्रम होता. यावेळी सर्व नातेवाईक , समाजबांधव , मित्रमंडळी उपस्थित होते. पंरतु पती शंकर पडळकर हे आजारी असल्याने त्यांना रक्षाविसर्जन कार्यक्रम स्थळी नेण्यात आले नव्हते. मात्र पिंडदानाच्या वेळी कावळ्याने विधी सूरु असतानाच पिंडींला शिवले होते . कावळ्याने पिंडींला शिवल्याने उपस्थिंताच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.
सर्व विधी पार पडल्या वर आलेले नातेवाईक पती शंकर पडळकर यांना भेटून जाऊ लागले होते. त्यावेळी पती शंकर त्यांना म्हणत होते तुम्ही जाऊ नका मी आता जाणार आहे. मला घालवूनच जावा असे सांगत होते. त्यानंतर सर्व नातेवाईक घरी गेले. मात्र पत्नी वियोगाने व्याकूळ झालेल्या पतीने काही वेळातच आपले प्राण सोडले. त्यांच्या निधनाने वरकुटे – मलवडी येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात दोन मूले , दोन मूली, सुना , नांतवडे असा परिवार आहे. रविवार दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वा. वरकुटे – मलवडी येथे रक्षाविसर्जन आहे.







