खानापूर आटपाडी चा भावी आमदार- राजेंद्र खरात यांची आर पी आय जिल्हाध्यक्ष पदी निवड
आटपाडी ;
उपेक्षित, मागास, अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले आणि गेली ३५ वर्षे आंबेडकरी चळवळीची पताका घेऊन सतत संघर्ष करीत असलेले नेतृत्व म्हणजे आटपाडीचे राजेंद्र खरात हे होत . सामाजीक न्याय विभागाचे केद्रीय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले साहेबांच्या रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या सांगली जिल्हाध्यक्ष पदी ( ग्रामीण ) राजेंद्र खरात यांची झालेली निवड हा स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत जिल्ह्यातल्या आंबेडकरी चळवळीतल्यांनी एक प्रकारे आटपाडी तालुक्याचाच केलेला गौरव होय .
आटपाडीला प्रमुख राजकीय पक्षाचे ज्येष्टा साठीचे जिल्हाध्यक्ष पद मिळण्याची ही तिसरी वेळ . १९८० साली राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या समाजवादी काँग्रेसचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आटपाडी तालुक्याचे मातब्बर नेते दिवंगत र .चि . उर्फ बाबासाहेब देशमुख दादा यांनी धूरा समर्थपणे सांभाळली होती . अभेद्य काँग्रेसला तडा देत जिल्ह्यात पहिला समाजवादी काँग्रेसचा आमदार निवडून आणण्यात ते यशस्वी ठरले होते .
१९९५ साली राज्याच्या सत्तेत आलेल्या युती सरकार मधील भाजपचे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष म्हणून आटपाडीच्या बंडोपंतदादा देशमुख यांनी आपली कारकीर्द गाजविली होती . तालुक्यातील काही युवा नेत्यांनी त्यांच्या पक्षाच्या युवा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली होती आणि आज स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत आटपाडीच्याच सुपुत्राला रिपाईचे जिल्हाध्यक्ष पद मिळते आहे ही बाब राजेंद्र खरातां इतकीच त्यांच्या चाहत्यांच्या दृष्टीने भुषणावह आहे .
उन - वारा - पाऊस अंगावर घेत उमेदीची २० वर्षे मोडक्या तोडक्या घरात व्यतित केलेली . कष्टाशिवाय भाकरी माहित नसलेल्या राजेंद्र खरात यांच्या परिवारातल्या प्रत्येकाने प्रचंड यातना, हाल ,अपेष्टा, उपेक्षा , अपमान सहन करीत जीवन व्यतित केले . सणासुदीला पोटभर गोडधोड खायला, अंगभर कपडा मिळणे दुरापास्त असणाऱ्या खरातांच्या परिवाराला सतत उपेक्षाच्या , अपमानाच्या जगण्याने कधी सुख उपभोगता आले नाही . थोड्या फार फरकाने आपल्या असंख्य बांधवांची अशीच होत असलेली होरपळ , होणारे अन्याय , अत्याचार बघून या विरुद्ध लढायचे, आपल्या बांधवांसाठी त्यांची ढाल व्हायचे, आणि त्यांना न्याय मिळवून देत , त्यांच्याही घरादारात सुख समाधान यावे म्हणून राजेंद्र खरात यांनी आंबेडकरी चळवळीच्या एकसंघ रिपाई मध्ये कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात केली . हा वादळात तेवत असणारा दिवा सतत ३५ वर्षे आपल्या ज्योतिने प्रत्येकाला प्रकाश देण्याचा प्रयत्न करतोय .
मोडेन पण वाकणार नाही या न्यायाने हजारोंच्या प्रश्नांना न्याय देताना जीवाची पर्वा न करता सतत संघर्ष करणारा राजेंद खरात सर्वदूर परिचित आहे. आंदोलन, मोर्चे, उपोषण, सतत पाचवीला पुजल्यासारखे राजेंद्र खरात यांनी या लोकशाहीच्या अस्त्राचा उत्तम उपयोग करून कित्येक प्रकरणात संबधीत व्यक्तींना, त्यांच्या सामुदायीक प्रश्नांना, न्याय मिळवून दिलाच परंतू शासन दरबारी आपली छाप पाडत जरब निर्माण केली .
वयाच्या पन्नाशीत आलेल्या राजेंद्र खरांता जवळ पंचवीशीतला जोश उत्साह असला तरी सततच्या राबण्याने, वेळी अवेळी खाणे , जागरण, सतत प्रवास - पायपीट - चिंता - तणावाने मधुमेहा सह विविध आजाराचे सहकारी बनलेल्या राजेंद्र खरातांनी कधीही परिस्थिती पुढे हार मानलेली नाही . अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आठवले साहेबांच्या रिपाईचे २० वर्षे तालुका अध्यक्ष पद सांभाळणे हे अत्यंत अवघड काम राजेंद्र खरात यांनी सहजरित्या पेलत नवा आदर्श निर्माण केला आहे . ना . रामदास आठवले साहेबांच्या वर अभेद्य निष्ठा देवून सत्ता असो अथवा नसो खंदा आठवले समर्थक म्हणून राजेंद खरात यांची प्रतिमा तयार झाली आहे .
पंढरपुरातून खासदार राहीलेल्या आणि राज्यसभेवर खासदार असलेल्या आठवले साहेबांच्या खासदार फंडातून आटपाडी तालुक्यातील शेकडो कामासाठी करोडो रुपये आणणारे राजेंद्र खरात एकमेव चिवट, जिगरबाज नेते असावेत . रामदास आठवले हाच जीवनाचा जीवन मंत्र बनविणाऱ्या राजेंद्र खरात यांनी भिन्न धर्मिय अल्पसंख्याक, उपेक्षित, मागास,, वंचित, बहुजनाना मोठा आधार देण्यात संपूर्ण जीवन सार्थकी लावले आहे
.
दलित पँथरच्या संस्थापकात आग्रही असणारे आटपाडी तालुक्यातील करगणीचे प्रा . अरुण कृष्णाजी कांबळे यांचा वसा - वारसा समृद्धपणे चालविणाऱ्या राजेंद्र खरात यांना भविष्यात राज्यात अरुण कांबळे सारखे चमकलेले पहायला मिळोत हीच या आनंदाच्या क्षणी निखळ अपेक्षा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, दलित जीवनाचे भाष्यकार, आटपाडीचे दिवंगत शंकरराव खरात साहेबांच्या विचारांचा समृद्ध वसा - वारसा सांगणाऱ्या राजेंद्र खरात यांनी मिळालेली जबाबदारी मोठ्या ताकदीने पार पाडीत आटपाडीचा नावलौकीक जिल्ह्यात वाढवावाच तथापि आटपाडीचे नाव राज्यभर दुमदुमले जावे,
अशी डोळे दीपवणारी कारकीर्द त्यांच्या हातून घडावी . आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी गावचे सुपुत्र दिवंगत ॲडव्होकेट जयंत सोहनी यांना चार वेळा मिळालेल्या तिकीटाच्या संधी पैकी दोन वेळा नम्रपणे संधी नाकारून दोन वेळा जत मधून आमदार म्हणून निवडून येत आटपाडीला राज्यभर माहीत करण्याचे काम सोहनी साहेबांनी केले .
शंकरराव खरात, अरुण कांबळे, जयंत सोहनी यासारख्या दिग्गज आटपाडीकरांचा मोठा वारसा राजेंद्र खरात यांना नव उभारी देत विधान परिषदेवरचा रिपाईचा सांगली जिल्हयातला पहिला आमदार होण्याचे भाग्य राजेंद खरात यांना नियती मिळवून देईल एवढीच या दोस्तासाठीची सदिच्छा ,सदभावना आणि प्रांजळ अपेक्षा विधात्याकडे करतो . राजेंद्र खरात यांच्या भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा .







