माणमध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यांंसह अन्य ५६ फदे रिक्त
- रिक्त पदांमुळे शिक्षण विभागाचा बोऱ्या
- लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे दुलर्क्ष
बापूसाहेब मिसाळ
वरकुटे – मलवडी – प्रतिनिधी
माण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा गटशिक्षणाधिकारी व इतर विविध पदाअभावी पुरता बोऱ्या वाजला आहे. माण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची मदार ही केवळ प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्या वरच आहे. या विभागातील २ शिक्षणविस्तार अधिकारी , १५ केंद्रप्रमुख , २० वरिष्ठ मुख्याध्यापक , ६ पदवीधर शिक्षक , १२ उपशिक्षक ही पदे काही महिन्यांपासून रिक्त आहेत. गेल्या दीड वर्षापासून कोव्हीड – १९ या आजारामुळे शाळा बंद आहेत. एकुण ५६ पदे रिक्त आहेत याकडे पदाधिकाऱ्यांंचे दुलर्क्ष आहे.
माण पंचायत समितीच्या शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी हे पद अनेक महिने रिक्त आहे. त्या जागी सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. नरेद्र मडेवार यांचेकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे . कधी कधी शिक्षणविस्तार अधिकाऱ्यांंकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार असतो. गटशिक्षणाधिकारी हे पदे अनेक वेळा अदलून बदलून दिले जात आहे. कित्येक वर्षांपासून येथे गटशिक्षणाधिकाऱ्या वाणवा आहे. त्याचबरोबर अनेक पदे रिक्त आहेत.
याशिवाय शिक्षणविस्तार अधिकारी एकुण ५ पदे मंजूर असून ३ पदे कार्यरत आहेत तर २ पदे रिक्त आहेत. केंद्रप्रमुख एकुण १९ पदे मंजूर असून. त्यापैकी ४ पदे कार्यरत आहेत तर १५ पदे रिक्त आहेत. वरिष्ठ मुख्याध्यापक एकुण २६ पदे मंजूर असून त्यापैकी ६ पदे कार्यरत आहेत तर २० पदे रिक्त आहेत. पदवीधर शिक्षक एकुण ९३ पदे मंजूर असून त्यापैकी ८७ पदे कार्यरत आहेत तर ६ पदे रिक्त आहेत. उपशिक्षक एकुण ६३८ पदे मंजूर असून त्यापैकी ६२६ पदे कार्यरत आहेत. तालुकास्तरावर एका अधिकाऱ्याला ३ ते ५ पदांचा कार्यभार संभाळावा लागत आहे.
अतिरिक्त कामामुळे शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख चांगलेच गोंधळून गेले आहेत. या कारकुनी कामामुळे शाळांमध्ये कामकाजाची माहिती घेण्यासाठी वेळच मिळत नाही. कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांना शैक्षणिक व अशैक्षणिक कामकाज करावे लागत आहे. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांचे प्रयत्न अपूर्ण पडत असल्याचे दिसून येत आहे.
याकडे संबंधित खात्याचे दूर्लक्ष होताना दिसत आहे. रिक्त पदे असल्याने अतिरिक्त कार्यभार संभाळत असलेल्या कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.
गटशिक्षणाधिकारी , शिक्षणविस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख , शिक्षक हे सर्वजण आँनलाइन कामात सारखे व्यस्त असतात. माण पंचायत समितीच्या शिक्षण विभागत मुख्य पदेच रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाचा व शैक्षणिक कामाचा ताण पडत असल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे.
ज्याप्रमाणे विद्यार्थी तयार व्हायला पाहिजे तसा तो होताना दिसत नाही. एकेका शाळेत तीन ते चार शिक्षक असतील तर एक शिक्षक बँकेत , एक शिक्षक तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी , एक शाळेवर , एक रजेवर अशी परिस्थिती आहे. माण तालुक्यातील अनेक शाळांची दुरूस्ती नाही. या रिक्त पदासाठी लोकप्रतिनिधीनी व संबंधित अधिकाऱ्यांंनी लक्ष घालून रिक्त पदे तातडीने भरावीत . त्यामुळे रिक्त पदांच्या विळख्यातून शिक्षण विभागाला मुक्त करा, अशी मागणी जनतेतून होत आहे.








