आमच्या वाटेला तुम्ही गेलाय ,आता त्याचे परिणामही भोगायला तयार रहा – सुरेंद्र गुदगेंनी दिला विरोधकांना सज्जड दम
मायणी यशवंत सोसायटी निवडणुकीत पुन्हा डॉ.दिलीपराव येळगावकर विरुद्ध सुरेंद्र गुदगे संघर्षाचा भडका.
मायणी :- दत्ता कोळी.
मायणी या गावचे नाव ऐकताच ,लोकांना आठवतो तो वर्षानुवर्षाचा राजकीय विरोध व पारंपारिक सुरेंद्र गुदगे आणि डॉ. दिलीपराव येळगावकर यांचा संघर्ष. जो उभ्या जिल्ह्याने पहिला आहे. त्यातच निवडणुकांचा काळ म्हणजे जणू राजकीय युद्धच.. मग,ते लोकसभा ,विधानसभा,विधानपरिषद असो अथवा स्थानिक स्वराज्य संस्था,ग्रामपंचायत वा सोसायटी निवडणूक.

*बिनविरोध निवडणुकी परंपरेला विरोधकांचा खोडा आता थोरले दादा दाखवणार विरोधकांना त्यांची जागा?*
वर्षानुवर्षे किरकोळ व सहज वाटणाऱ्या यशवंत सहकार विकास सेवा सोसायटी निवडणुकीच्या निमित्ताने यंदा अचानक यशवंत सोसायटीची निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा खंडित झाली आणि कधी नव्हे,ते यशवंत सोसायटीच्या निवडणूकित विरोधकांनी पॅनल टाकलं.आणि थोरल्या दादांचा पारा साहजिकच चढला. कारण,आता थोरल्या दादांचे कट्टर पारंपरिक विरोधक असणारे माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी यशोदीप विकास सेवा सोसायटी "यंदाही बिनविरोध झाली. यापूर्वी त्यांनी कधी गुदगेंच्या "यशवंत" सोसायटीकडे लक्ष दिल होत ना थोरल्या गुदगेंनी डॉ.येळगावकाराच्या "यशोदिप" सोसायटीकडे लक्ष दिले होत.
परंतु यंदा , कै.भाऊसाहेब गुदगे संघटनेच्या जीवावर सुरेंद्र गुदगेंच्या वरदहस्ताने तालुक्याच्या मार्केट कमिटीचा कारभार "सभापती" म्हणून हाकलेल्या सोमनाथ माळी व संघटनेचे प्रमुख म्हणून मिरवलेल्या पांडुरंग झगडे,महादेव यलमर व जगन्नाथ देशमुख यांनी काही कारणाने "(अर्थात थोरल्या गुदगेंनी जाहीर पणाने सांगितल्या प्रमाणे "सोसायटीने माजी सभापतीनां कर्ज देताना काही अटी घातल्याने )" प्रथमच यशवंत सोसायटीत सुरेंद्र गुदगे यांच्या विचाराच्या पॅनल विरुद्ध श्री सिध्दनाथ शेतकरी परिवर्तन विकास पॅनल उभा करून "रान पेटवले". आणि यास नाही, नाही, म्हणत श्री सिध्दनाथ शेतकरी परिवर्तन पॅनल च्या बॅनर वर डॉ.दिलीपराव येळगावकर व धाकटे गुदगे यांचा फोटो झळकला व शांततेत आपापल्या सोसायटीत कारभार हाकणाऱ्या पारंपरिक गुदगे विरुद्ध येळगावकर या विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी आता पुन्हा एकदा झडू लागल्या आहेत.
*आमचं ठरलं होत मग,आता विरोधकांना हातमिळवणी का?*
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमचं ठरलंयच्या टीमच्या माध्यमातून कधी नव्हे ते मायणी गावचे पारंपरिक सुरेंद्र गुदगे व डॉ दिलीपराव येळगावकर हे धुरंधर नेते अंतर्गत वादावर तात्पुरता पडदा टाकून" प्रभाकर देशमुख यांच्यासाठी एकत्र आले होते. या निवडणुकीतील यश-अपयश हा भाग वेगळा पण याप्रकाराने काही प्रमाणात गाव सुखावला होता कारण मायणी सारखे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणारे गाव एक झालं होत. यावेळी दोन्ही संघटनेकडे नसणारे व सध्या यशवंत निवडणुकीत विरोधी पॅनल टाकणारे तिसऱ्या आघाडीचे कार्यकर्ते थोडे अस्वस्थ होते. त्यांनी थेट गोरे बंधूंचा झेंडा हाती घेतला व दोन्ही गोरे बंधूंना वाटून घेऊन संपूर्ण गावापेक्षा वेगळ्या दिशेला पाऊल टाकले होते.
आता सोसायटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने गावापेक्षा वेगळे पाऊल टाकणाऱ्या व दोन्ही संघटनेला शेलक्या शब्दात सुनावणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुन्हा बोराटवाडी व महिमानगड कडे जाणाऱ्या दहिवडी रस्त्यावरील चांदणी चौकात यु टर्न मारून पुन्हा आक्रमक डॉ.दिलीपराव येळगावकर व धाकट्या गुदगेंच्या जवळ आपली गाडी नेऊन थांबवल्याने त्यांच्या पॅनेलच्या बॅनरचा चौकातील फोटो पाहून गावातील समर्थक,मतदार, गावकरी आता तोंडात बोटे घालू लागले आहेत. आणि चारी बाजूने प्रश्न विचारू लागले आहेत. " आपलं ठरलं होत ना मग विरोधकांना हातमिळवणी का?" कदाचित याच उत्तर "दुश्मन का दुश्मन ,अपना दोस्त होता है!",हेही असेल.
*पुन्हा यशोदीप बँक, दूधसंघ व इथोनॉल प्रकल्प*
मायणीच्या या तिसऱ्या आघाडीने गावच्या यशवंत सोसायटीच्या निवडणुकीत अर्ज भरणीच्या शेवटी शेवटी थेट डॉ.येळगावकरांच्या सोबत मनोमिलन करीत सर्वांना धक्का देऊन थोरल्या दादांच्या विचाराच्या पॅनल विरुद्ध पॅनल उभा केले.सहाजिक डॉ.येळगावकर यांनी तिसऱ्या आघाडीच्या मनोमिलनाला मान देत गावातील एका कार्यक्रमाच्या निम्मिताने "आपलं ठरलंय च्या टीमच्या साक्षीने आपल्या आक्रमक शैलीत "विरोधकांच्यावर टीकास्त्र सोडले". टीकेला उत्तर देताना थोरल्या गुदगेंनी ४० कोटींची यशोदीप बँक व दुधसंघ कोठे गेला व ते पैसे कोठे मुरले तसेच टायर पेटवून धूर काढून लाखोंचे शेअर्स गोळा केलेला इथेनॉल प्रकल्प कोणाला विकला. यशोदीप बँकेच्या ठेवीदारांचे पैसे न देता आल्यामुळे येळगावकरांना बँकेच्या इमारतींची जप्ती वाचवण्यासाठी काय काय करावे लागले आणि आता त्या इमारतींचे पुढे ते काय करणार आहेत, याची जंत्रीच लोकांसमोर मांडली.
व्यवस्थित कारभाराने वर्षानुवर्षे शेतकऱ्यांच्या साठी चालणारी यशवंत सोसायटी ही संस्था विरोधकांच्या सूडबुद्धीमुळे निवडणुकीस सामोरी आत आहे व विनाकारण निवडणूकीच्या खर्चाचा लाखोचा बोजा या संस्थेवर पडत असल्याने अनेक वर्षापासून आपल्या आक्रमक स्वभावाला मुरड घालत असलेल्या सुरेंद्र गुदगेंनी यशवंत सोसायटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने घेतलेल्या संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत आपल्या मूळ आक्रमक शैलीत "स्व.भाऊसाहेब गुदगे संघटनेकडून स्वतःचा फायदा घेऊन बाजूला झालेल्या गद्दार कार्यकर्त्यांची पाळेमुळे खणून आपण त्यांना त्यांची जागा दाखवणार असून गावातील पारंपरिक विरोधाला आम्ही कधी जुमानले नाही ,आता आमच्या वाटेला निष्कारण तुम्ही गेलाय तर आता त्याचे परिणामही भोगायला तयार राहा. असा सज्जड दमही त्यांनी दिला आहे.







