पुणे जिल्ह्यातील पी.एम.पीचे पासेस बंद , प्रवाशांमधून तीव्र संताप
सवलतीचे पास पुन्हा सुरु करण्याची मागणी
पुणे (प्रतिनिधी )
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हदद वगळुन पी.एम.पी. बसमधुन प्रवास करणार्या प्रवाशांचे दैनिक व मासिक पास बंद केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या भागातील सर्वसामान्य नागरिकांना हक्काची एस.टी सेवा काही महिन्यांपासुन ठप्प झाल्यानंतर पी.एम.आर.डी.ए भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता ही बस सेवा अलीकडच्या काही महीन्यांपासुन विस्तारित करुन अनेक नवीन बसमार्ग सुरु झाले आहेत. पी.एम.पीचे सवलतीच्या दरातील दैनिक सत्तर रुपयांचा पास तर चौदाशे रुपयांच्या मासिक पास विकत घेवून दररोज हजारो प्रवाशी प्रवास करत असतात. प्रशासनाने तीन दिवसांपासून हे पासेस बंद केले आहेत ते पासपुन्हा सुरु करण्याची मागणी पुणे -सासवड मार्गावरिल दत्ताञय फडतरे यांनी पुणे परिवहन महामंडळाकडे केली आहे.
एकीकडे मेट्रोसाठी हजारो कोटी रुपये शासन खर्च करत आहे तर दुसरीकडे मनपा हददीबाहेरील नागरिकांना प्रवासासारखी मुलभुत सेवा काहीशा सवलतीत देण्यास शासनाला काय अडचण आहे ? सध्या पी.एम.पी ने शहरातील दैनिक पास ,मासिक पास सुरु ठेवले आहेत ,हददी बाहेरील पासेस बंद केले आहेत . शहरातील नागरिकांसाठी एक निर्णय आणि शहराजवळील प्रवाशांना एक निर्णय हा काय न्याय आहे का ? या भागातील नागरिक तिकीट न काढता प्रवास करतात का ? जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बसेस कायम खचाखच भरलेल्या दिसत असताना फक्त हेच पी.एम.पीचे मार्ग तोट्यात कसे गेले ? केंद्रशासनाने रेल्वे मध्ये सवलतीचे पास , राज्यशासनाच्या एस.टीमध्ये प्रवाशांसाठी सवलतीचे पास असतात तर पी.एम.पी महामंडळाला सवलतीचे पास का नकोत ? पासेस बंद केल्याने खासगी वाहनाने केलेला प्रवास आणि पी.एम.पी ने केलेला प्रवास यात काय फरक राहीला ? असे अनेक सवाल उपस्थित करत , ग्रामीण भागातील पी.एम.पी प्रवाशांची लुटमार सुरु केली असल्याचा आरोप फडतरे यांनी केला आहे.
पुरंदर , वेल्हा , मुळशी ,दौंड , शिरुर ,जुन्नर, मुळशी ,राजगुरुनगर,मंचर ,कापुरव्होळ,लोणावळा
परिसरातील जनतेचे प्रतिनिधित्व करणार्या लोकप्रतिनिधीनीं पी.एम.पी प्रवाशांना सवलतीचे पासेस सुरु करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. हातावर पोट असणारे गोरगरिब, कष्टकरी ,कामगार , महिला वर्ग , शेतकरी कुटुंबातील शिक्षण घेत असणार्या शाळा काॅलेजमधील विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पी.एम.पी पासेस ही मागणी अगदी रास्त असल्याने महामंडळाने तातडीने याचा विचार करण्याची गरज असल्याचे दत्ताञय फडतरे यांनी सांगितले.







