पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे अचिव्हर्स २०२३ कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन आणि पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
राज्य शासनाच्यावतीने पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. आगामी काळातही पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध राहील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल इलेव्हन २३ येथे आयोजित ‘पुणे अचिव्हर्स २०२३’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, माजी आमदार विलास लांडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, संघटक संजयजी भोकरे, संघाचे महासचिव डॉ विश्वास आरोटे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष गोविंद वाकडे महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अध्यक्ष नितीन शिंदे, पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीचे सदस्य बबन पवार उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी गोविंद वाकडे व डिजिटल मिडिया अध्यक्षपदी सिध्दार्थ भोकरे यांची निवड झाल्याबद्दल यावेळी पत्र देऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा आदरपूर्वक सन्मान करण्यासाठी, त्याच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना सन्मानपूर्वक मानधन देण्यात येत आहे. पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांस शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीतून मदत करण्यात येते.
या निधीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५० कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता आधीचे ५० कोटी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनातील ५० कोटी असे १०० कोटी रुपये झाले आहेत. पत्रकारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन योग्य तो मार्ग काढण्यात येईल.
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, शिक्षण, उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवरांना ‘पुणे अचिव्हर्स २०२३’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुभाष डोके, पत्रकार संघाचे ब्रँड अम्बेसेडर संजय फुलसुंदर, डॉ स्वामी शिरकुल वैदु, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वृत्तवाहिनी पुणे जिल्हाध्यक्ष अतुल परदेशी, पुणे शहर जिल्हाध्यक्ष राकेश वाघमारे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाजीराव फराकटे, जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर नवले, नितीन शिंदे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.