शेती किफायतशीर होण्यासाठी कारखाना ऊस विकासाचा कार्यक्रम राबवणार :- प्रभाकर घार्गे
खटाव माण अँग्रोच्या तृतीय गळीत हंगामाची सांगता : मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव
मायणी :- दत्ता कोळी
यावर्षीचा तिसरा गळीत हंगाम चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला आहे. एकूण आठ लाखांचे विक्रमी गाळप करण्यात आले असून शेतकऱ्यांना वेळोवेळी उसाची बिले त्यांच्या खात्यावर जमा केल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे .शेतकऱ्यांनी खटाव- माण कारखान्यावर विश्वास ठेवून ऊस दिला त्याच प्रमाणे हा हंगाम चालू असताना शेतकरी तोडणी वाहतूक शेती विभाग कारखान्याचे कर्मचारी या सर्वांचे फार मोठे योगदान लाभले आहे. आगामी काळात शेती किफायतशीर व फायद्याची होण्यासाठी कारखाना ऊस विकासाचा कार्यक्रम राबवणार असल्याचे प्रतिपादन खटाव मान साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.
यावेळी माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर,इंदिराताई घार्गे, श्रीमती मंगलताई घोरपडे,काँग्रेसनेते संजीवभाऊ साळुंखे,राहुल पाटील,संचालक विक्रम घोरपडे,मोहन देशमुख,माजी सभापती सी एम पाटील,प्रकाश घार्गे,शिवाजी सर्वगौड,श्रीमंत पाटील,रवींद्र सानप,हणमंत घोरपडे,बम्हाकुमारी राणी बहीणजी,संचालक अण्णासाहेब निकम,प्रीती घार्गे,महेश घार्गे,वैभव चव्हाण,संजय शिंगाटे,गणेश भोसले,मोहित काटे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला कार्यस्थळी पूजा संपन्न होऊन ९ लाख ११हजार १११ व्या पोत्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
ते पुढे म्हणाले,उसात आंतरपिके घेऊन उसाचा खर्च आंतरपिकातून काढून शेतकऱ्यास उसाची किंमत पूर्णपणे मिळेल असे नियोजन कारखान्यामार्फत करण्यात येणार आहे. सोयाबीन, हरभरा यासारख्या पिकातून ऊसास नायट्रोजन व कंपोस्ट खत मिळाल्याने उसाचे चांगले उत्पादन होऊ शकते. या संदर्भात तज्ञ मंडळींना बरोबर घेऊन गावोगावी जाऊन कारखान्यामार्फत कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांच्या हिताचे काम केले जाईल.
गेल्यावर्षी अडचणीच्या काळात कारखान्याच्या संचालक संग्रामसिंह घोरपडे, प्रितीताई घार्गें, इंदिराताई घार्गे यांनी कारखान्याचे योग्य नियोजन करून तिसरा गळीत हंगाम यशस्वी केला व दहा लाखांच्यावर साखरेच्या पोत्यांचे विक्रमी उत्पादन केले. भविष्यकाळात सहकार वऔद्योगीकरणाच्या माध्यमातून तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँक, मार्केट कमिटीच्या माध्यमातून सोयाबीन पिकाचे उत्पन्न कसे घ्यावे यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचा कारखान्याचा मनोदय आहे.
यावेळी संचालक विक्रम घोरपडे म्हणाले, जगाच्या नकाशावर पडळचे अधोरेखित करणाऱ्या के एम शुगरला अडचणीत आणण्यासाठी काही अपप्रवृत्ती आपली ताकत खर्ची घालत आहेत.परंतु शेतकरी ,तोडणी कामगार,वाहतूकदार यांचा चेअरमन प्रभाकर घार्गे,को-चेअरमन मनोजदादा घोरपडे ,कार्यकारी संचालक संग्रामबापू घोरपडे यांच्यावरील असणारा विश्वास आज ८ लाख मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळपाच्या माध्यमातुन दिसून येत आहे.वेळेत होणारे उसाचे बिल यामुळे लोकांचा कारखान्याच्या नेतृत्वावर असणारा विश्वास व्यक्त होत आहे. हंगाम यशस्वी पार पाडण्यासाठी कष्ट घेणाऱ्या संचालक मंडळ,अधिकारी कर्मचारी वर्ग,तोडणी कामगार व वाहतूक यंत्रणा या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
कार्यक्रमात उच्चांकी तोडणी करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या कंत्राटदार व कर्मचाऱ्यांचा ट्रॉफी ,शाल देऊन सन्मान करण्यात आला. सदर वेळी ओम शांतीच्या प्रसारक ब्रह्मकमारी राणी बहीणजी यांनी उपस्थितांना संबोधित केले. याचबरोबर कॉंग्रेस नेते संजीव भाऊ साळुंखे ,माजी सभापती शिवाजी सर्वगौड यांनीही याठिकाणी के एम उभारणीबद्दल चेअरमन प्रभाकर घार्गे व को-चेअरमन मनोजदादा घोरपडे यांचे शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानले.
यावेळी प्रास्ताविक जनरल मॅनेजर अशोक नलवडे यांनी केले.कार्यकारांचे सूत्रसंचलन वसंत पोफळे यांनी तर उपस्थितांचे आभार संचालिका प्रीतीताई घार्गे यांनी केले.







