आटपाडी तुषार वाघमारे यांना पी.एच.डी प्रदान..
आटपाडी ;
महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचा आर्थिक व सामाजिक दृष्ट्या केलेला भौगोलिक अभ्यास या विषयावर तुषार तुकाराम वाघमारे संशोधक, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी हे संशोधन कार्य त्यांच्या भूगोल शास्त्र विभागास नुकतेच सादर केले. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय व राहणीमानाचा अभ्यास यापूर्वी कोणत्याही संशोधकांनी पूर्ण केला नव्हता म्हणून हा विषय तुषार वाघमारे यांनी आपल्या संशोधन कार्यासाठी निवडला
. महाराष्ट्राबरोबरच सांगली जिल्ह्यातील अनुसूचित जातींचा सखोल अभ्यास त्यांनी त्यांच्या प्रबंधात मांडलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील या जातींचा अभ्यास केला असता असे निदर्शनास आले की अजूनही या जातींचा म्हणावा इतका विकास झालेला नाही अनुसूचित जातीच्या अंतर्गत एकूण ५९ उपजाती महाराष्ट्रात आढळतात त्यापैकी महार, मांग, व चांभार या उपजाती प्रमुख आहेत. आर्थिक निकषाचा संदर्भ लक्षात घेता त्यांचे एकूण उत्पन्न, व्यवसायाचे स्वरूप, राहणीमानाचा दर्जा व घराची स्थिती हे सर्व घटक यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. सामाजिक दृष्ट्या मागासलेला अनुसूचित जातीचा आर्थिक व राजकीय दृष्ट्या ही आज मितीला मागासलेपणा दिसून येतो या पाठीमागे भरपूर कारणे आहेत त्यापैकी शिक्षणाचा अभाव, बेरोजगारी, व्यसनाधीनता, गरीबी व कामाबद्दल असणारी निष्क्रियता या एक ना अनेक कारणांमुळे या विशिष्ट जातींचा विकास झालेला नाही. त्यांनी त्यांच्या कामामध्ये २००१ व २०११ या दोन्ही दशकातील सत्य परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे.
यामुळे आटपाडी करांची मान उंचावली आहे . या कामासाठी त्यांना डॉ. संभाजी शिंदे, डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. सुरेश पवार, डॉ. प्रशांत पाटील, प्रा. प्रकाश वाघमारे तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
तुषार तुकाराम वाघमारे यांचा थोडक्यात अल्प परिचय..
शिक्षण: नेट, सेट, पी. एच. डी.
विषय: भूगोल
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण दिघंची हायस्कूल दिघंची येथे पूर्ण केले, पदवीचे शिक्षण श्रीराम एज्युकेशन सोसायटी चे आटपाडी महाविद्यालय आटपाडी येथे भूगोल शास्त्र विभागातून ९०.५० टक्के गुण मिळवून सांगली जिल्ह्यात सर्वप्रथम क्रमांक मिळवून पूर्ण केले.
त्यानंतर त्यांनी कोल्हापूर गाठले, पदव्युत्तर शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधील भूगोल शास्त्र विभागांमध्ये प्रवेश घेतला. पूर्णता इंग्रजीमध्ये शिक्षण असल्यामुळे सर्वप्रथम त्यांना त्रास सहन करावा लागला परंतू जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी यांच्या जोरावर त्यांनी पदव्युत्तर विभागांमध्ये भूगोल या विषयातून सुवर्णपदक पटकावले त्याच बरोबर सर्व विज्ञान शाखेमध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधून सर्वप्रथम येण्याचा बहुमानही त्यांना मिळाला. त्यानंतर त्यांनी पी.एच.डी. साठी डॉ. के.सी. रमोत्रा यांच्याकडे प्रवेश घेतला.
त्यांना संशोधन कामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत शिष्यवृत्ती मिळाली यासोबतच राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेसाठी त्यांची निवड झाली. त्यांनी त्यांचे संशोधनाचे कार्य अगदी थोड्या कालावधीमध्ये पूर्ण करून नुकतीच पी.एच.डी. संपादन केली आहे.