सकारात्मक ऊर्जा यशाच्या दिशेला घेऊन जाईल – डॉ सयाजीराजे मोकाशी
कॉलेज कॉर्नर इन्स्टिट्यूटचा निरोप समारंभ संपन्न
मायणी :- प्रतिनिधी ,
सध्या शिक्षणासाठी खर्च करणे शक्य होत नाही, सगळ्यांसाठी उच्चशिक्षण घेणे आज कठीण आहे.परंतु सभोवतालची माहिती घेऊन प्राप्त परिस्थितीत विविध कोर्सेस च्या माध्यमातून व्यतिमत्व कौशल्य विकास करणारे शिक्षण आजमितीला महत्वपूर्ण ठरत आहे.आपल्या वाटणीला येणाऱ्या गोष्टीसाठी तक्रार करत बसू नका, नकारात्मक बनू नका , सकारात्मक ऊर्जा तुम्हाला यशाच्या दिशेला घेऊन जाईल,मनाची तयार झाली असेल तरच स्पर्धेत उतरा, जेव्हा तुम्ही पूर्ण क्षमतेने उतरता,तेव्हा यश नक्कीच मिळते,असा विश्वास कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सयाजीराजे मोकाशी यांनी कॉलेज कॉर्नर कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट.मायणीच्या जानेवारी-जून २०२२ बॅचच्या निरोप समारंभ व गुणवंतांचा सन्मान कार्यक्रमाच्या निम्मिताने व्यक्त केला.
यावेळी माजी उपशिक्षणाधिकारी राजकुमार चव्हाण,प्रा.डॉ.श्यामसुंदर मिरजकर, पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर,प्रसिद्ध कथाकथनकार हिम्मत पाटील,जेष्ठ पत्रकार प्रकाश सुरमुख,पांडुरंग तारळेकर,संजय जगताप,मारुती पवार ,माजी मुख्याध्यापक रामदास चौधरी,इन्स्टिट्यूट संस्थापक अध्यक्ष सचिन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ मोकाशी म्हणाले की, सध्या युवकांमध्ये क्रिकेट ,सीरिअल्स, सिनेमाचे आकर्षण आहे,परंतु आपण त्यासाठी सक्षम आहोत का? हा प्रश्न विद्यार्थ्यांनी स्वतःला विचारात आपण स्वतःसोबत समाजासाठी काय करणार आहोत याचे समाजभान असणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाची सुरुवात कुंडीतील रोपाला पाणी घालून करण्यात आले.त्यानंतर इन्स्टिट्यूटच्या MSCIT परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपनिरीक्षक शीतल पालेकर म्हणाल्या की,आयुष्यात संघर्ष करणे हेच जीवनाचे दोतक आहे, कॉलेज शालेय जीवनात जगणं न सोडता मनसोक्त जगा,परंतु भविष्याचे वेध घेऊन आयष्यबर पुरेल असे परिपूर्ण शिक्षण घेऊनच कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी सक्षम व्हा.
प्रा.श्यामसुंदर मिरजकर म्हणाले की, सध्या शरीराचा अंगच बनलेला मोबाईल म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा सातबारा आहे, तुमचे व्यक्तीमत्व म्हणजे काय आहे ते सर्वांपेक्षा तुम्हाला याची माहिती हवी. आजच्या आभासी जगात आपण वावरतो आहे.सेल्फीचे जीवन झाले आहे, तुमचे खरे हितचिंतक आई वडील असतात, त्यानंतरचे मार्गदर्शक हे शिक्षकच असतात.संगणकीय ज्ञान हे साध्य आहे. टक्केवारीची विद्यार्थ्यांची हुशारी आजकाल हुरळून जाऊन कालबाह्य होत असल्याचे दिसून येत आहे. यशस्वी होण्यासाठी दिसण्यापेक्षा आपले व्यक्तिमत्त्व विकसित असणे आवश्यक असते.
माजी उपशिक्षणाधिकारी राजकुमार चव्हाण , सर्वात जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असलेले याभागातील एकमेव इन्स्टिट्यूट असावे , काळाच्या ओघात शिक्षण तंत्रज्ञानामध्ये होणारे बदल आपण समजून घेतले तर आपण जीवनात यशस्वी होऊ.
जेष्ठ पत्रकार प्रकाश सुरमुख म्हणाले, सचिन या नावाचा नावलौकिक अनेक क्षेत्रात सर्वश्रुत आहे.त्याप्रमाणेच मायणी नगरीत बाह्य शैक्षणिक शिक्षणाचे कोर्सेस आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन या इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा सचिन चौधरी यांनी सचिन या नावाला साजरेसे कार्य व वलय निर्माण केले आहे.
या कार्यक्रमाच्या निम्मिताने प्रसिद्ध कथाकथनकार हिम्मत पाटील,नागठाणे यांनी उपस्थितांना खिळवून ठेवणारी कथा सादर केली .
यावेळी कोमल निकम,ऐश्वर्या माळी ,ज्योती माने,पूजा माने या विद्यार्थितींनी मनोगते तर सुप्रिया माळी या विद्यार्थिनीने स्त्री जीवनावरील कविता सादर केली.
या निरोप समारंभाचे प्रास्ताविक व विद्यार्थी आणि मान्यवरांचे आभार मानताना प्राचार्य सचिन चौधरी म्हणाले की, मायणी गावात व्यवसायासाठी आल्यानंतर दोन टाईपरायटरच्या साहाय्याने सुरू केलेले इन्स्टिट्यूट आज अनेक कॉम्प्युटरच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शनाने हजारो विद्यार्थ्यांना बाह्य शिक्षण कोर्सेस चे परिपूर्ण ज्ञानाचे एक महत्वाचे ठिकाण बनले आहे.त्याचबरोबर आजवर समाजाप्रती इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अनेक उपक्रमही राबवले आहेत. विविध स्पर्धा परीक्षेत इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी चमकून शासकीय,निमशासकीय कार्यालयात नोकरी करत आहेत याचे मोठे समाधान वाटते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय कुलकर्णी यांनी केले .






