महाविकास आघाडी सरकारनंतर सत्तानाट्य होऊन सत्तांतर झाले.तर कॉंग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार सत्तेपासून दुर राहून भाजपा व शिंदे गटाचे सरकार सत्तेत आले.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.तेव्हापासुन जवळजवळ ४० दिवस पुर्ण झाले तरी मंत्रीमंडळ विस्तार रखडला होता.
परंतू आता या सरकारमधील १८ आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली असून राहिलेल्या मंत्र्यांचा शपथविधी सप्टेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे.परंतू पश्चिम महाराष्ट्रातील पाटणच्या शंभूराज देसाईंनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हसवडच्या प्रचारसभेत जनतेला संबोधताना ‘तुम्ही जयाभाऊंना निवडून द्या,मी त्यांना मंत्री करतो’असे जाहीर केले होते.
आ.गोरे हे फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार म्हणून सर्वश्रृत आहेत.राष्ट्रवादीशी त्यांचे विळ्याभोपळ्याचे वैर आहे.राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्याच्या भाजपा जिल्हाध्यक्ष पदी त्यांची निवड करून पक्षवाढीसाठी संधी निर्माण करुन दिली आहे.आ.गोरे आक्रमक म्हणून ओळखले जातात.सलग तीन वेळा निवडून आल्याने त्यांचा विधानसभेत गाढा अभ्यास आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्याचे खासदार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.तर दुसरीकडे सातारा जावळीचे आमदार श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाही प्रचारसभेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘शिवेंद्रराजेंना मंत्रीपद देतो’ असे जाहीर केले होते.आ.शिंवेंद्रसिंहराजे भोसले हे देखील फडणवीस यांचे विश्वासू असून ते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आहेत.त्यांचा मतदारसंघासह परीसरात मोठा राजकीय दबदबा आहे.ते शांत,संयमी,अभ्यासू म्हणून ओळखले जातात.
येत्या काळात उपमुख्यमंत्री दिलेला शब्द पाळून आ.गोरेंना की आ.भोसलेंना मंत्री करणार तसेच सातारच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी भाजपा व शिंदे गट कोणाच्या खांद्यावर सोपवणार याकडे सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.







