कोल्हापूर ( कमल धडेल माणगंगा प्रतिनिधी )
श्री . जोतिबा देवाचा नवरात्रोत्सव सोमवारपासुन प्रारंभ होणार असून जोतिबा देवाचे मानाचे उंट ,घोडे जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत .
दख्खनचा राजा श्री .जोतिबा नवरात्रोत्सव हा इतर देवदेवतांपेक्षा वेगळ्या स्वरूपाचा आहे. त्याला आध्यात्मिक व शास्रांचा आधार आहे. जोतिबा डोंगरावर नवरात्रोस्तवात श्रींच्या वेगवेगळ्या सोहन कमल पाकळ्यांतील महापूजा बांधल्या जातात. त्या प्रत्येक पाकळीस मोठे महत्व आहे.
पाच पाकळ्यांपैकी तीन पाकळ्या श्री .जोतिबाचा त्रिदेवात्मक अवतार दर्शवितात. खालील दोन पाकळ्या कमळपुष्पाचे द्विदल आहे. हे मनातील सगुण व निर्गुण भावांचे प्रतीक आहे. श्री . केदारनाथांनी श्री . कमळभैरव नवरात्रोस्तव सोहळ्यात पूजेसाठी काशीहून सुवर्णकमळ आणून देत, अशी आख्यायिका आहे. त्याच्या आधारे कपड्यांच्या रंगीत कमळ पाकळ्या करून या महापूजा पुजारी बांधतात. सोमवारी मंगलमय वातावरणात पहिल्या दिवशी तुतारी, ढोल, सनई, शिंग, ताशा या वाद्यांच्या निनादात मुख्य मंदिरात घटस्थापनेचा विधी होईल . सलग नऊ दिवस जोतिबा ते यमाई मंदिर मार्गावरून धुपारती सोहळा निघेल .
२ ऑक्टोबर रविवारी जोतिबाचा जागर होणार आहे .नवरात्र काळात जोतिबाचा जागर हा सातव्या दिवशी असतो. दोन लाख भाविक जगारा दिवशी डोंगरावर येतात. या दिवशी मंदिर रात्रभर उघडे असते. चार मुक्तीचे प्रतीक म्हणून जोतिबा देवाची सोहन कमलपुष्पातील दख्खनचा राजा रूपातील अलंकारीत बैठी महापूजा बांधण्यात येते. जगारानिमित्त मुख्य मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. ४ ऑक्टोबरला खंडेनवमी साजरी होणार आहे . खंडेनवमी दिवशी पालखी सोहळा, दिवे ओवाळणी, घट उठविणे हे कार्यक्रम होणार आहेत .
५ ऑक्टोबरला विजयादशमी दिवशी (दसरा) श्रींची अंबारीतील वैशिष्ट्यपूर्ण महापूजा बांधण्यात येते. हि पूजा वर्षातून एकदा बांधण्यात येते. सायंकाळी साडेपाच-सहा वाजता येथील दक्षिण दरवाजावर सीमोल्लंघनाचा सोहळा होतो. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा होतो. नवरात्रोस्तवाची सांगता जोतिबा डोंगरावर ललित सोहळ्याने होते. श्रींची गरुडारूढ अशी महापूजा बांधली जाते. मंदिरात रात्रभर विविध धार्मिक कार्यक्रम होतात. मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येते.
चार महिने पोहाळे गावात वास्तव्यास असणारे जोतिबा देवाचे मानाचे उंट , घोडे जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहे . नवरात्रोत्सवाची पुर्वतयारी झाली असून देवस्थान समितीने दर्शन रांगेसाठी दर्शन मंडपामध्ये सोय केली आहे . मंदिर शिखरावर विद्युत रोषणाई केली आहे .