शिरताव ता.माण येथे मानव सेवा प्रतिष्ठाण आयोजित श्री भैरवनाथ यात्रा-२०२३ निमीत्त पार पडलेल्या भव्य मैदानी कुस्तीत दहिवडीचा मल्ल गणेश गोरे विरुध्द तुषार कांबळे यांच्यात सामना रंगला.यात गणेशने तुषारला चितपट करुन यशाला गवसनी घालत चांदीच्या गदेचा मानकरी ठरला.
आंधळी ता.माण सारख्या ग्रामीण भागातून कुस्तीचे धडे घेऊन पुणे व सांगलीत सराव करत गणेश गोरेने कुस्तीला सुरूवात केली.दिवसातून ४-५ तास सराव करत शरीरयष्टी मजबुत केली.माण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील यात्रेनिमीत्त असलेल्या कुस्ती मैदानात त्याने विरोधी पैलवानाला चितपट करत विजयश्री मिळवला.कुठूंबीय शेतकरी असूनही या क्षेत्रात व समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करण्याचा निर्णय त्याने घेतला.
वेळेचे योग्य नियोजन व सरावाचे वेळापत्रक तयार करत त्याप्रमाणे त्याने कष्ट घेतले.
कुटूंबातील कोणताही सदस्य मल्ल नसताना माणसारख्या दुष्काळी व ग्रामीण भागातून शहरी भागात जाऊन सराव करताना अनेक अडचणी आल्याचेही गणेशने सांगितले,तरीही “घेतला वास टाकु नका” या म्हणी प्रमाणे कितीही अडचणी आल्या तरी मागे हटणार नाही,अखंड कष्ट करत राहणार ल उद्दीष्टपुर्तीसाठी प्रयत्न करणार.असेही गणेश गोरे म्हणाला.
गेल्या दोन वर्षापासून गणेश गोरे सातारा जिल्ह्यातील बहुतांश मैदानात आपल्या कलेचे दर्शन घडवत कुस्ती मैदान गाजवताना दिसून येत होता.सांगलीच्या शहाजी पवार यांच्या भोसले व्यायाम शाळेत व पुण्याच्या अमोल बुचडे यांच्या अमोल बुचडे रेसलींग अॅकॅडमीत तेथील नावाजलेले वस्ताद शहाजी पवार,अमोल बुचडे तसेच मार्गदर्शक पै.अक्षय तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन सराव करत असल्याने तो शिरताव केसरी गदेचा मानकरी ठरला.येत्या काळात मेहनतीच्या जोरावर गणेश गोरे सातारा जिल्ह्यासह राज्यातील मैदाने गाजवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पै.गणेश गोरे शिरताव केसरी गदेचा मानकरी!







