जनावरातील व्यंधत्व हे दुग्ध व्यवसायासाठी हानिकारक- डॉ.विकास पाटील
प्रतिनिधी : वरकुटे-मलवडी
वांझ जनावरांची जोपासना हे आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक असून,पशुपालक शेतकऱ्यांनी योग्य प्रजनन दर गाठण्यासाठी गायी-म्हशींना आजारांपासून मुक्त ठेवून, सकस आहार देणे अत्यावश्यक आहे.जनावरांमधील वंध्यत्व हे दुग्ध व्यवसायातील आर्थिक नुकसानीचे मुख्य कारण असल्याने,वंध्यत्वावर वेळेवर उपचार केल्याने जनावरांचे आरोग्य चांगले राहत असल्याचे मत पशुधन पर्यवेक्षक डॉ विकास पाटील यांनी व्यक्त केले.
महाबळेश्वरवाडी ता.माण येथे जागतिक पशुसंवर्धन दिनाच्या औचित्याने पशुव्यंधत्व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी सरपंच इंदुबाई जेडगे,निवृत्ती वगरे,विजय काटकर,आबा पुकळे,दिगंबर नरळे,दत्तात्रय जरे,संतोष जगताप,सदाशिव जरे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.पाटील म्हणाले की,मादी जनावरांमधील वंध्यत्वाची अनेक कारणे असू शकतात.
तात्पुरते वंध्यत्व हे कुपोषण,गर्भाशय संसर्ग,अनियमित लैंगिक चक्र,मादीमधील बीजांड दोष,बीजकोशचा आकार,संप्रेरकांमधील असमतोलपणा,व्यवस्थापकीय चुका,पशुखाद्याचे अयोग्य नियोजन,माजाचे अयोग्य व्यवस्थापन आणि नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतनाचे अयोग्य व्यवस्थापन इ.कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.
या
वेळी महाबळेश्वरवाडी परिसरातील साठ गाय-म्हैस संकरित जनावरांची तपासणी करण्यात आली.यामध्ये गर्भ तपासणी,वांझ तपासणी,कृत्रिम रेतन, जंतुनाशक निर्मूलन,गोचिड गोमाशी निर्मूलन व औषधोपचार इत्यादी उपचार केले.यावेळी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते..







