दहिवडी : ता.२४ दहिवडी नगरपंचायतीच्या नूतन मुख्य प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन तृतीयपंथी रवी जाधव यांच्या हस्ते करत भाजपने राष्ट्रवादीला चांगलाच शह देत नगरपंचायत इमारतीला आमच्या काळात आ.गोरेंच्या प्रयत्नाने १ कोटी २ लाखांचा निधी मंजूर करुन त्याचे भूमिपूजन आ.गोरेंनीच ७ जून २०१९ रोजी केले होते असा आरोप माजी नगराध्यक्षा साधना गुंडगे यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार माण दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान ते दहिवडी नगरपंचायतीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करणार होते.
मात्र भाजपने मोठी खेळी करत शरद पवारांच्या अगोदरच उद्घाटन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला होता. कालपासून नगरपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन कोण करणार यावरून दहिवडीच्या स्थानिक राजकारणात चांगलाच कलगीतुरा रंगला होता परंतू तृतीयपंथीयाच्या हस्ते उद्घाटन घेण्याची संकल्पना नगरसेवक रुपेश मोरे यांनी मांडली होती. राष्ट्रवादीने शरद पवार या इमारतीचे उद्घाटन करणार असे सांगितले होते मात्र भाजपचे तालुकाध्यक्ष,विरोधी पक्ष नेते व आजी माजी नगरसेवक यांच्यासह माजी नगराध्यक्षा साधना गुंडगे यांनीही या गोष्टीला विरोध केला होता. ज्यांनी निधी आणला त्यांनीच विकास कामांच्या उद्घाटनाचे श्रेय घ्यावे अशा पद्धतीच्या प्रतिक्रियाही त्यांनी प्रसार माध्यमांना दिल्या होत्या.
या एकंदरीत गोष्टीचा सारासार विचार करून अचानकपणेच नियोजन करत तृतीयपंथीयाच्या हस्ते उदघाटन करत राष्ट्रवादीला भाजपने शह दिल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. त्यामुळे भाजपने अगोदरच उद्घाटन केलेल्या इमारतीचे उद्घाटन शरद पवार पुन्हा करणार का ?
याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, भाजप महिला तालुकाध्यक्ष व माजी नगराध्यक्षा साधना गुंडगे, विरोधी पक्षनेते धनाजी जाधव, नगरसेवक रुपेश मोरे, नगरसेविका नीलिमा जाधव , राणी अवघडे, उज्वला पवार, स्वि.नगरसेवक सयाजी मोरे, सिद्धार्थ गुंडगे, अतुल जाधव, माजी उपनगराध्यक्षा नीलम शिंदे, रमेश जाधव, लक्ष्मण जाधव, महेश कदम, सचिन पुकळे, विशाल घोरपडे, दिलीप जगदाळे, विजय जाधव, रविंद्र सकुंडे, शैलेश खरात मान्यवर उपस्थित होते.







