सामान्य नागरिकांची आर्थिक लूट थांबवा अन्यथा स्वाभिमानीचा हिसका दाखवणार – राजू मुळीक
दहिवडी प्रतिनिधी:
दहिवडीच्या भूमी अभिलेख कार्यालयात भूमापनच्या नकला वितरित करणारे आणि आस्थापनेवर असणारे कर्मचारी शेतकऱ्यांना त्यांची कागदपत्रे वेळेवर न देता उलट त्यांच्याकडून आर्थिक मागणी करत असल्याचा आरोप करत सामान्य नागरिकांची आर्थिक लूट थांबवा अन्यथा स्वाभिमानीचा हिसका दाखवू असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माण तालुकाध्यक्ष राजू मुळीक यांनी म्हटले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की एका कामासाठी तालुक्याच्या शेवटच्या टोकावरून येणाऱ्या शेतकऱ्याला १५ ते २० दिवस हेलपाटे मारावे लागतात. मात्र वितरित करणारे तथा आस्थापनेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कातील व्यक्ती तथा दलालांना सर्व गोष्टी घरपोच मिळतात, अशी लोकांमध्ये चर्चा असल्याचा आरोपही त्यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.
आपल्या कार्यालयात सर्वसामान्य शेतकऱ्यांचे अशीच आर्थिक पिळवणूक केली जाणार असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसणार नाही. त्याचबरोबर कार्यालयाच्या प्रथम दर्शनी भागात टेबल लावून बसणार यांची आपल्या कार्यालयात कोणत्या पदावर नेमणूक आहे, ते आम्हाला कळवून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट तात्काळ थांबवावी अन्यथा स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन करू असा इशाराही यावेळी राजु मुळीक यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.







