*आठवणींच्या हिंदोळ्यावर…**राष्ट्रपतींसमोर मी मारलेली उडी.* ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
राष्ट्रपती, पंतप्रधान, देशाचे लष्कर प्रमुख, किंवा सरन्यायाधीश हे सर्व अतिविशिष्ट व्यक्ती म्हणूनच ओळखले जातात. त्यामुळे त्यांना विशेष सुरक्षा कवच दिले जात असते. कधीकाळी कोणाकडून जाणता किंवा अजाणता हे सुरक्षा कवच भेदण्याचा प्रयत्न झाला तर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर येते आणि त्याच्याकडून जाणता अजाणता प्रयत्न झाला असेल त्याला चांगलेच धारेवर धरले जाते, याबाबतचे अनेक किस्से आपण ऐकतो. असंच एक किस्सा माझ्या आयुष्यात देखील घडला होता. त्यावेळी राष्ट्रपतींची सुरक्षा यंत्रणा भेदण्याचा माझ्याकडून अजाणता प्रयत्न झाला होता.
मात्र सुदैवाने त्यात काही विपरीत घडले नाही. असे असले तरी ती आठवण कायम राहिली आहे. हा १९८१ सालच्या ऑगस्ट महिन्यातला प्रसंग असावा. त्यावेळी माझे वय जेमतेम २६ वर्षाचे होते. त्यावेळी मी दूरदर्शन चा वृत्त संकलन करणारा छायाचित्रकार म्हणून कंत्राटी पद्धतीवर काम करत होतो. भारतीय विद्या भवन च्या वतीने नागपुरात एक भव्य असे ऑडिटोरियम बांधण्याचे प्रस्तावित होते. त्याचा शिलान्यास समारंभ देशाचे तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचे हस्ते करण्याचे ठरले होते. या कार्यक्रमावर आधारित एक विशेष वृत्तचित्र मुंबई दूरदर्शन प्रसारित करणार होते.
त्यासाठी मुंबईहून एक पथक तर येणार होतेच, पण त्याचबरोबर मला देखील त्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करायचे होते. आधी हा कार्यक्रम नागपुरात अजब बंगल्याच्या बाजूला भारतीय विद्या भवन चा जो विस्तीर्ण असा भूखंड होता, त्यावर भव्य असा मांडव टाकून करण्याचे निश्चित झाले होते. मात्र कार्यक्रमाच्या चार दिवस आधीपासून नागपुरात पावसाची संततधार लागली होती. त्यामुळे त्या पटांगणात उभारलेला तो मांडव आणि तिथल्या सर्व व्यवस्थेची नुसतीच वाट लागली होती. कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे आयोजकांना ऐनवेळी कार्यक्रमाची जागा बदलावी लागली, आणि हा कार्यक्रम विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार दीक्षांत सभागृहात सर्व व्यवस्था देखील करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या दिवशी सकाळीच मुंबई दूरदर्शनची चमू नागपुरात येऊन पोहोचली होती.
त्यांच्या समवेत चर्चा करून कशाप्रकारे सर्व नियोजन करायचे हे आमचे ठरले होते. कार्यक्रम दुपारी चार वाजता होणार होता. मात्र आम्ही दुपारी तीन वाजताच तिथे जाऊन सर्व मोर्चे बांधणी करून ठेवली होती. राष्ट्रपतींचा कार्यक्रम असल्यामुळे सर्वांचे पोलीस पासेस असणे गरजेचे होते. ते देखील मी आदल्या दिवशीच पोलीस आयुक्त कार्यालयातून घेऊन घेतले होते. त्यामुळे कार्यक्रमाच्या तासभर आम्ही जाऊन तिथे आम्ही आमच्या नियोजनाला सुरुवात केली होती. दीक्षांत सभागृहाच्या उजव्या हाताला असलेल्या पोर्चमध्ये राष्ट्रपतींचे वाहन येऊन थांबणार होते. तिथेच भारतीय विद्या भवन चे तत्कालीन पदाधिकारी बनवारीलालजी पुरोहित आणि आशादेवी माहेश्वरी हे त्यांचे स्वागत करणार होते. नंतर तिथूनच त्यांना व्यासपीठावर नेले जाणार होते पोर्चमध्ये सुद्धा कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती.
राष्ट्रपती कारमधून खाली उतरल्यावर त्यांचे तिथे स्वागत होत असतानाचे चित्रीकरण मी करायचे आणि लगेच पुढे जाऊन ते व्यासपीठावर चढत असतानाचे चित्रीकरण करायचे असे मी आणि मुंबईहून आलेला माझा सहकारी आम्ही आपापसात ठरवले होते. मधल्या भागात राष्ट्रपतींच्या हालचालींचे चित्रीकरण मुंबईचा माझा सहकारी करणार होता. पोर्चमध्ये मी चित्रीकरण करायला उभा राहिलो खरा, पण तिथे गेल्यावर माझ्या लक्षात आले की राष्ट्रपती कारमधून उतरल्यावर स्वागत करणाऱ्यांचा आणि सुरक्षारक्षकांचा त्यांच्याभोवती गराडा असेल. त्यामुळे त्यांचा चेहरा कदाचित नीट दिसणार नाही.
मग काय करायचे असा विचार करत असतानाच पुढच्या बाजूला असलेल्या भिंतीमध्ये जेमतेम एक माणूस उभा राहील इतकी मोकळी जागा (खाच) सोडलेली होती. मी अंग चोरून त्या खाचेत उभा राहिलो आणि चित्रीकरणासाठी सज्ज झालो. ठरल्याप्रमाणे चार वाजता राष्ट्रपतींचे वाहन पोर्चमध्ये आले. कारमधून राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी आणि महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल निवृत्त एअर चीफ मार्शल ओ पी मेहरा हे उतरले. भारतीय विद्या भवन च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी नागपूरचे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि सर्व वरिष्ठ अधिकारी तिथे उपस्थित होतेच. या सर्व प्रसंगाचे मी चित्रीकरण केले. आता त्या खाचेतून खाली उतरायचे तर उडी मारावी लागणार होती.
तशी उडी मारण्यात थोडा धोका होता. समोर उभे असलेल्या एखाद्याच्या अंगावर मी पडू शकत होतो. क्षणभर विचार केला. तितक्यात समोरचे दोन पोलीस कर्मी थोडे बाजूला झाले, तशी मी दणकण खाली उडी मारली. कितीही नाही म्हटले तरी थोडा आवाज झालाच. आजूबाजूचे सुरक्षारक्षक आणि पोलीसकर्मी एकदम अलर्ट मोडवर आले. बाजूलाच उभे असलेले नागपूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त व्यंकटाचलम हे धावले. एव्हाना मी पुढे जाण्याच्या प्रयत्नात होतो. तितक्यात मागून कोणीतरी दणकट हाताने माझी मानगुट पकडली. मी घाबरून मागे पाहिलेष तर मानगुट पकडणारे दस्तूरखुद्द पोलीस कमिशनर व्यंकटाचलम साहेब होते. त्यांनी क्षणभर माझ्याकडे डोळे रोखून पाहिले. माझ्याबद्दल आलेला संताप त्यांच्या नजरेतून स्पष्ट दिसत होता. मात्र ते मला व्यक्तिशः चांगले ओळखत असल्यामुळे त्यांनी परिस्थिती ओळखली, आणि क्षणाचाही विलंब न लावता माझी मानगुट तशीच पकडून मला सभागृहाच्या दिशेने ढकलले.
मला पकडायला एक दोन पोलीस कॉन्स्टेबल पुढे येत होते. मात्र व्यंकटाचलम साहेबांनी त्यांना हातानेच थांबा म्हणून इशारा केला आणि मला नजरेने “तू पुढे जा” असे सांगितले. मी तसाच आत धावत निघालो आणि व्यासपीठापाशी जाऊन कॅमेरा पोझिशन घेऊन उभा राहिलो. कार्यक्रम संपल्यावर त्या परिसरातील काही स्नेही असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मला “तू आज चांगलाच वाचलास” असे सांगितले. मलाही नेमके असे काय झाले हे कळेना. तरीही मी त्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करत फिल्म मुंबईला पाठवणे, मुंबईच्या मित्रांना रवाना करणे, या कामात व्यस्त होऊन गेलो. दुसऱ्या दिवशी दुपारी माझ्या घरचा फोन वाजला. मी फोन उचलला तेव्हा समोरून पोलीस कमिशनर चे पी ए बोलत होते त्यांनी मला दुपारी चार वाजता व्यंकटाचलम साहेबांनी त्यांच्या चेंबरमध्ये भेटायला बोलावले आहे असा निरोप दिला. त्यानुसार मी पोलीस आयुक्त कार्यालयात दुपारी चार वाजता पोहोचलो.
लगेचच व्यंकटाचलम साहेबांनी त्यांच्या दालनात बोलावले. मी समोर बसल्यावर त्यांनी मला उभे आडवे झाडायला सुरुवात केली. ते म्हणाले ,”तरुण माणसा, मी तुला चांगला ओळखतो आणि तू अशी उडी का मारली याचे मला त्या क्षणी भान आले, म्हणून तू काल वाचलास. अन्यथा तुझे चित्रीकरण बाजूला राहिले असते आणि तुला लगेच बर्डी पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये पाठवले असते”. मग त्यांनी अधिकच स्पष्ट केले. “तू सध्या खूप तरुण आहेस. त्यामुळे तुला बऱ्याच गोष्टी माहित नाहीत. मात्र राष्ट्रपती पंतप्रधान अशा मंडळींना अतिविशिष्ट व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते, आणि त्यांना विशेष सुरक्षा कवच असते. अशावेळी ते भेदण्याचा प्रयत्न करणारा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्यावर तात्काळ कारवाई करता येते. कारण सुरक्षेत थोडीही गडबड झाली आणि त्या अतिविशिष्ट व्यक्तींच्या जीवाला थोडाही धोका झाला तर शेवटी जबाबदारी आमची असते.
त्यामुळे आम्ही तिथे कोणतीही हयगय करत नाही. काल तू तुझ्या टीव्ही कव्हरेजच्या धावपळीत होतास, त्याच प्रकारात तू उडी मारली, बाकी तिथे कोणताही धोका निर्माण करण्याचा तुझा विचार नव्हता, याची मला खात्री होती. म्हणूनच मी तुला सोडले,” हे देखील त्यांनी चर्चेत स्पष्ट केले आणि भविष्यात असला धोका पुन्हा पत्करू नकोस हे देखील त्यांनी ठणकावले. आज या घटनेला ४५ वर्ष होतील. नंतरच्या काळात अनेकदा पंतप्रधान उपपंतप्रधान राष्ट्रपती सरन्यायाधीश लष्कर प्रमुख यांच्या कार्यक्रमाचे वृत्त संकलन करण्याची वेळ आली. मात्र हा अनुभव लक्षात ठेवून मी कायम सावधपणे वागत आलो. मात्र आजही ही आठवण ताजीच आहे आणि ताजीच राहणार आहे.






