आधुनिक वाल्मिकी
दैवदत्त शब्द सिद्धी लाभलेले ,कुठल्याही अनुभवाला आपल्या शब्दांनी शीघ्र रूपवान करणारे,कवी,गीतकार,संवादलेखक गीतकार,पटकथाकार,कादंबरीकार ,अभिनेता,नाटककार,संपादक अशा अनेक क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करणारे आणि महाराष्ट्राला ”गीतरामायणासारखी ”अनमोल साहित्यिक भेट देऊन येथील जनतेच्या हृदयात मानाचे स्थान मिळविणारे श्री गजानन दिगंबर माडगूळकर यांची आज १०१ वी जयंती !!!!!!! अर्थात जन्मशताब्दी वर्ष संपन्न ….!!!
महाराष्ट्राचे लाडके दैवत पु.ल.देशपांडे यांनी काहीसे असे वर्णिले आहे ……”माडगूळकरांच्या शब्दांनी ,,त्यांच्या गीतांच्या झोक्यांनी पाळण्यातले चिमुकले डोळे गाई गाई करत,त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या शब्दात”माझा होशील का असे विचारून प्रेयसी आपले प्रेम प्रगट करी …….खेड्यातील स्त्रिया वारुळी नागोबाला पुजायला जाताना त्यांचीच शब्दफुले वाहत,गीतरामायणातील स्वरांनी ओसऱ्या दुमदुमत त्यांच्या लावण्यांनी जत्रेतील रात्री रंगात येत ……”जिंकू किंवा मरू ”या त्यांच्या गीताच्या तालावर सैनिकांची पावले पडत ………..”एकाच व्यक्तीच्या मध्ये किती गुण दडलेले असावेत………..शीघ्र तरीही प्रतिभावान शब्द ,आणि तेही असे कि त्यातील वर्णन डोळ्यापुढे साक्षात अवतरावे……….चित्रमय शैली,नादमय शब्द जणू हृदयात वीणा झंकार घडविणारे,संतकवींचा वारसा आपल्या शब्दात समर्थपणे जपणारे ,भावगीते ,भक्तिगीते जितकी सुंदर तितकीच हळुवार मखमली युगलगीते देणारे आणि तितक्या रांगड्या शब्दात लावण्या रचणारे ………काय वर्णावी या शब्दप्रभूंची महती……..खुद्द श्रीमती शांताबाई शेळके म्हणतात……..”झुमका गिरा रे सारख्या रचनेवरून ”बुगडी माझी सांडली ग ”ची रचना करणारे ,यथा काष्ठम् च काष्ठम् च ”या गीतेतील श्लोकावरून ”दोन ओंडक्यांची होते सागरात भेट ”असे अर्थपूर्ण अध्यात्मिक शब्द लिहिणारे,”नवल वर्तले गे माये ,उजळला प्रकाशु ”यासारखे अनमोल शब्द ज्ञानेश्वरांच्या ओव्यांवरून प्रेरणा घेऊन लिहिणारे ,एक धागा सुखाचा,जग हे बंदिशाला ,उद्धवा अजब तुझे सरकार यासारखी संतकवींचा वारसा सांगणारी अनमोल गीते रचणारे,लहानग्यांसाठी तितक्याच प्रेमाने ”आजीचे व्रत ,मुंगी नेसली लुंगी ”यासारखी बडबड गीते लीलया रचणारे ”गदिमा ”पाहिले कि मन थक्क होते……….त्यांच्या प्रतिभेचा हा भरधाव धावणारा वारू पाहिला कि आपोआप मस्तक झुकते……….!!!!!!!!!
आमच्या सांगली जिल्ह्याच्या माणदेशातील त्यांचा जन्म,प्रतिभेचा वारसा स्वरचित ओव्या रचणाऱ्या आईकडून तसेच हरिदासी आख्यानातून,भजन ,कीर्तनातून प्राप्त झालेला……….”आईच्या ओव्या “या कवितेत त्यांनी आईची, आईकडून आलेल्या वारशांची,
मातृभाषेची थोरवी गायलेली आहे…….
आठवणीत ओवीचा,गावताच शिलालेख
डोळ्यातून ओघळला, उपकारांचा आलेख
आलेखाचा आविष्कार,आपोआप झाला ओठी
धावल्या ग तुझ्या ओव्या ,गीत माझे गाण्यासाठी
घरघर चालू झाली ,दोन पाषाणांची साथ
जीवनाच्या चक्रासह ,चाले तुझे भावगीत
बढतीच्या बडिवार ,तुझ्या वाहतो पायाशी
तुझ्या गीत गंगेतील एक भरली कळशी
मॅट्रीक झाल्यावर त्यांनी कोल्हापूरची वाट धरली…….. तिथेच एच एम व्ही चे वसंतराव कामेरकर ,गदिमा,बाबूजी,पातकर याना भेटले एकमेकांशी परिचित झाले आणि त्यांनी मराठी रसिकांचे भाव विश्व् समृद्ध केले ”चांदाची किरणे विरली” आणि “छुमछुम छुम छुम नाच मोरा” हि दोन गदिमा रचित आणि बाबूजींनी संगीतबद्ध केलेली आणि कु. पद्मा पाटणकर यांनी गायिलेली दोन गाणी ध्वनिमुद्रित झाली….याच “पद्मा पाटणकर “पुढे “सौ विद्या माडगूळकर “झाल्या.या गीतांनी “गदिमा आणि बाबूजी” यांच्यापुढे नवे कला दालन उघडले……….आणि पुढे त्यांनी चित्रपट सृष्टीत एक नवा इतिहास रचला…..!!!!!
१९४७-४८ नंतरची २०-२५ वर्षे म्हणजे गदिमांच्या उत्कर्षाचा काळ……….त्यांची गीते म्हणजे “यशाचा मार्ग” हे समीकरण बनले त्यांनी जणू चित्रपट गीत कसे असावे याचा आदर्श घालून दिला.त्यात भावगीते,भक्तीने ओथंबलेले अभंग,युगलगीते,लावण्या,बालगीते, राष्ट्र गीते, अशा विविध प्रकारांचा समावेश होता …….!!!!!!गजाननराव वाटवे यांनी गायिलेली “पंचमीचा सण आला”,”चंद्रावरती दोन गुलाब”,”घरधनी गेला दर्यापार”,बबन नावडीकर यांनी गायिलेली “रानात सांग कानात आपुले नाते”,”तुझ्या डोळ्याच न्यार पाणी ग”,मालती पांडे यांनी गायिलेले “लपविलास तू हिरवा चाफा,या कातर वेळी “माणिक वर्मा यांनी गायलेले “बहरला पारिजात दारी,अंगणी गुलमोहोर फुलला “हिराबाई बडोदेकर यांचे “सखये प्रेम पत्र माझे” अशी त्यांची कितीतरी गीते आजही मनात रेंगाळतात….
हिंदीत हृदयाला “सीना”असे म्हणतात,मग गदिमा,बाबूजी,आशा ताई यांची कितीतरी गीते केवळ हृदयात वसणारी अशी “सिनागीते” किंवा हृदयगीते म्हणावी लागतील….मराठी मना मनात आजही ती विराजमान आहेत….आजही “माझा होशील का “ची गोडी तशीच आहे….आजही “सुवासिनी”तील “राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा”,”येणार नाथ आता”,”जिवलगा कधी रे येशील तू “आणि जगाच्या पाठीवर मधील “विकत घेतला श्याम”,”तुला पाहते रे तुला पाहते”,थकले रे नंदलाला हि अवीट गोडी लाभलेली गीते रसिकमनात दिमाखाने विराजमान आहेत.गदिमांचे सुगंधी शब्द ,बाबूजींचे त्या शब्दांच्या भावना चपखल गुंफणारे मधुर संगीत आणि स्वर आणि त्याला आशा ताईंच्या स्वरेल गळ्याची मिळालेली साथ या सगळ्यामुळे एक संगीताचे मधुर विश्व निर्माण झाले… त्यात रसिक सचैल न्हाऊन निघाले…इंद्रायणी काठी देवाची आळंदी,तू वेडा कुंभार,गुरुविना कोण दाखवील वाट या भक्तिरसात भिजलेल्या गीतांनी मराठी मने सुखावली….. !!!!”डोळ्यात वाच माझ्या”,”सप्रेम नमस्कार विनंती विशेष”यासारखी आगळी वेगळी युगलगीतेही त्यांनी दिली…
मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपट सृष्टीही त्यांनी गाजविली.२५ पटकथा लिहून त्यावरही आपला ठसा उमटविला.व्ही शांताराम यांचा” दो आँखे बारह हाथ”,”नवरंग”,”गुंज उठी शहनाई”,”तुफान और दिया” हे चित्रपट गदिमा यांचेच…तसेच गुरुदत्तच्या “प्यासा” ची मूळ कथा ,राजेश खन्ना चा “अवतार”आणि अमिताभ यांचा “ब्लॅक”यांची मूळ संकल्पना त्यांच्याच लेखणीतून उतरली होती.
मराठी साहित्यात गदिमांचा सर्व क्षेत्रात लीलया वावर होता.आरंभी वि स खांडेकर यांचे लेखनिक म्हणून त्यांनी काम पाहिले नंतर त्यांची स्वत:ची सुगंधवीणा, जोगिया,चार संगीतिका,चैत्रबन,गीतगोपाल अशी काव्यनिर्मिती झाली.लपलेले ओघ,बांधावरच्या बाभळी,कृष्णाची करंगळी यासारखे लघुकथा संग्रह,आकाशाची फळे ,उभे आडवे धागे यासारख्या कादंबऱ्या,युद्धाच्या सावल्या ,परचक्र यासारखी नाटके त्यांनी लिहिली…
“गीतरामायण”हा गदिमा आणि बाबूजी यांचा अत्युच्य कलाविष्कार….!!!!नव्हे तो त्यांच्या आयुष्यातील एक चमत्कार होता….ती महांकाळेश्वराची कृपा होती….गीत रामायणातील ५६ गीते म्हणजे जणू ५६ गीत रुपी हिऱ्यांचा जडविलेला शारदेच्या गळ्यातील रत्नजडित हार….या प्रत्येक गीतातील भावना, त्यानुसार बाबूजींनी योजलेला राग आणि केलेले गायन सारे काही अलौकिक,अद्भुत,दैवी…..”गीतरामायण “हि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांची निर्मिती….अशी कलाकृती पुन्हा होणे नाही असे प्रत्यक्ष बाबूजींनी म्हटले आहे…..!!!!!गीतरामायणा मुळेच गदिमा महाराष्ट्राचे “आधुनिक वाल्मिकी” म्हणून ओळखले जाऊ लागले…..
प्रतिभा हि दैवी देणगी….!!!!याच गदिमांच्या प्रतिभासंपन्न साहित्याने कित्येक पिढ्या संस्कारित झाल्या…एका कुरूप बदकाच्या पिलातून “राजहंस”घडविण्याचे सामर्थ्य त्यांच्या प्रतिभेत होते….”रातभर रहियो, सवेरे चले जाईयो”चे शीघ्र भाषांतर”रातभर ऱ्हावा जी,झुंजूरका उठून जावा जी”असे करणारे गदिमा खरंच महान होते….परमेश्वराने माण देशातील डोंगराळ माथ्यावर एक कवित्वाचे बीज पेरले आणि त्याचा वेलु गगनासी भिडला …आजही त्यांचे शब्द,साहित्य अमर आहे…प्रेरणा देणारे आहे…त्यांच्याच शब्दात सांगायचे तर
पळून गेलेल्या काळाच्या कानात माझ्या गीतांची भिकबाळी डोलते आहे
आयुष्याच्या अटीतटीच्या संगरात मी कधीच थकणार नाही
आकाशातील अगणित नक्षत्रांसारख्या माझ्या कविता मला आभाळभर प्रकाश देतील…..
आज १०१ व्या जयंतीदिनी गदीमा तथा माडगूळकर अण्णांना लक्ष लक्ष प्रणाम……!
राजवर्धन जाधव