लोकाभिमुख नेतृत्व लोकनेते मोहनराव (काका) भोसले यांच्या 8 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
दिनांक – 11 जुलै 2021
आटपाडी तालुक्याचे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे नेतृत्व करणारे, सतत हसतमुख असणारे, कार्यकर्त्याच्या गराड्यातील लोकनेते मोहनराव (काका) हरिबा भोसले यांच्या 8 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
2 आॅक्टोबर 2009 रोजी त्यांच्यातील बुध्दिचातुर्य पाहून पक्षाने त्यांना जिल्हा परिषद सांगली चे उपाध्यक्ष केले. उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना अतिशय कुशलतेने सांगली जिल्हयाचा अर्थसंकल्प मांडून गोरगरीब, शेतकरी आणि वंचितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. टेंभू योजनेसाठी तत्कालीन शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी सांगली जिल्हा परिषद पुणे विभागात दुसरी बसवून “हम भी कुछ कम नही हैं! ” हे सर्वांना दाखवून दिले.
सर्वांना ते आपल्या घरातीलच काका वाटत होते, एखाद्या कार्यकर्त्याला शब्द दिला की तो खरा करुन दाखविण्याची कसब त्यांच्यामध्ये होती. सार्वजनिक,विधायक कामे करण्यात त्यांचा हातखंडा होता, हजारो लोकांची वैयक्तिक कामे त्यांनी करुन दिली त्यामुळे हजारो कार्यकर्ते सुखासमाधानाने आपला संसार करित आहेत.
जिल्हयाला लाभलेला कोहिनूर आपल्या हातून निसटून, देवाच्या हाती लागला,अशा या लोकनेत्यास व त्यांच्या कार्यास त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा!!!
माजी मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील यांच्या व स्व.डॉक्टर पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षामध्ये जबाबदारीने विश्वासाने काम करणारे म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.
सतत हसतमुख लोकांच्यामध्ये मिसळणारा नेता सर्वसामान्या कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा नेता, रांगड्या स्वभावाचा व रात्री-अपरात्री नागरिकांच्या कार्यकर्त्यांच्या अडचणीला धावून येणारा नेता म्हणजेच मोहन (काका)भोसले.आज ते आपल्यात नसल्याची उणीव प्रत्येक कार्यकर्त्यांना होत आहे. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षांमध्ये पडलेली पोकळी अद्याप भरून निघाली नाही व निघणार नाही.
मोहन (काका) भोसले यांचा जन्म 1957 साली झाला. तर त्यांचा 11 जुलै 2013 मध्ये निधन झाले. एकूण 36 वर्षाच्या राजकीय व सामाजिक कारकीर्दीत जनतेची सेवा व पक्षाचे काम प्रामाणिक पणे केले.वयाच्या वीस वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय होते .2013 पर्यंत राजकारणामध्ये सक्रिय होते. आणि 2013 मध्ये त्यांचे दुःखद निधन झाले .त्यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे. अशा लोकाभिमुख सर्वसामान्य जनतेत मिसळणाऱ्या नेत्याला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
सर्वसामान्य भोसले कुटुंबांमध्ये सन 1957 मध्ये जन्माला आले. लहानाचे मोठे होत असताना घरच्या अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर पडल्या घरी जमीन होती. त्याचबरोबर उपजीविकेचे साधन म्हणून पिठाची चक्की , ऊसाचे गुराळ होते. पिठाची चक्की, ऊसाचे गुराळ आणि शेतीमध्ये कष्ट करून जेमतेम शाळा शिकले. हे करत असताना हळू हळू समाजकार्याची ओढ लागली. समाजकार्य करत करत राजकारणामध्ये थोड्याफार प्रमाणात सक्रिय होऊ लागले, हळूहळू राजकारणाचाही त्यांना छंद लागला व राजकारणात चांगलाच जम बसला..
त्यानंतर त्यांचा विवाह अंबुताई यांच्याशी ठरला.विवाह ठर ला.विवाह दिवशी त्यांना पंचायत समितीचे तिकीट जाहीर झाले. म्हणजे त्यांच्या पत्नी अंबुताई यांच्या पायगुणाने पंचायत समितीची तिकीट मिळाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.आणि पुढील काळात राजकारणात यश मिळाले. त्यानंतर राजकारणात त्यांची पक्कड बसली.
पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिले. व विजयी झाले. त्यानंतर राजकारणामध्ये अनेक उलथापालथी झाल्या. राजकारणातील उलथापालथी झाल्यानंतर त्यांना 1979 मध्ये पंचायत समिती च्या उपसभापती पदाची लॉटरी लागली.तसेच 1988 मध्ये प्रभारी सभापती झाले.यानंतर 1997 मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यामध्ये त्यांना शिक्षण खात्याचे सभापती पद मिळाले. आणि जिल्हाभर दृष्ट लागावी असा कामाचा ठसा उमटविला व लोकांच्या गळ्यातील ताईत बनले.
आटपाडी मध्ये माणगंगा फळबाग संघाची स्थापना केली. जिल्हा द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक म्हणून काम पाहिले .आटपाडी तालुका लोकन्यायालय सल्लागार म्हणून काम पाहिले. वसंत दादा सूतगिरणी लिमिटेड सांगली चे संस्थापक, सांगली जिल्हा पाणलोट सप्ताह कमिटीचे सदस्य होते. प्रकाशा ऍग्रो सहकारी संस्था मर्यादित सांगलीवाडी संस्थेचे संचालक होते, त्यानंतर मॉडर्न एज्युकेशन सोसायटी आटपाडी चे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी होते. अशा अनेक पदाच्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पडल्या.
सन 1990 मध्ये वसंत शिक्षण संस्थेचे चेअरमन पद भूषवले त्यानंतर अनेक छोट्या-मोठ्या कमिटी वरती अध्यक्ष सदस्य म्हणून काम पाहिले. सन 2006 मध्ये आटपाडी तालुक्यांमध्ये आटपाडी तालुका को-ऑप.क्रेडिट सोसा. मर्या.पतसंस्थेची स्थापना केली. तसेच काँग्रेस पक्ष जी जबाबदारी देतील ती निस्वार्थी भावनेने पार पाडली.
2.12.2009 ते 20.03.2012 अखेर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.तर शिक्षण व अर्थ खात्याची जबाबदारी पार पाडली
उल्लेखनीय कामगिरी
*आटपाडी मध्ये माणगंगा फळबाग संघाची स्थापना केली.
- सदस्य ते अध्यक्ष म्हणून काम पाहिले
*आटपाडी तालुका को -आॅप. क्रेडिट सोसायटी मर्या. आटपाडी स्थापना केली आणि चेअरमन म्हणून उत्कृष्ट मार्गदर्शन केले
*कॉंग्रेस पक्ष जी जबाबदारी देईल ती नेटाने पार पाडली.
*शैक्षणिक संस्थेत उत्कृष्ट कामगिरी
*जिल्हापरिषद व पंचायत समिती मध्ये अनेक पदाचा पदभार स्वीकारून खंबीरपणे जबाबदारी पार पाडली.- पदावर कार्यरत असताना एक दिवसाचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट रित्या काम पाहिले. लोकनेते कै. मोहनराव काकांचा सामाजिक आणि राजकीय वारसा त्यांची मुले जयदिप (भैय्या) भोसले आणि शरद (भैय्या) भोसले अविरत चालवत आहेत..
आशा लोकभिमुख लोकनेत्याला आठव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन