नरवणे येथे पारंपरिक पद्धतीने दिवाळी पाडवा साजरा .
नरवणे (वार्ताहार) अशोक हांडे.
नरवणे तालुका माण येथे पारंपारिक पद्धतीने दिवाळी पाडवा नुकताच साजरा झाला. यामध्ये विशेष आकर्षणाचा भाग म्हणजे मेंढ्या पळवणे.
गावामध्ये सर्वेश्वर मंदिराच्या भोवती मेंढ्यांचा कळप फेऱ्या मारतो आणि मंदिरासमोरील विशाल मैदानात नारळाची कमान सजवलेली असते. ही कमान जवळपास जमिनीपासून सात फूट उंचीपर्यंत असते आणि कळपातील मेंढ्या हा नारळ स्पर्श करण्यासाठी उड्या मारतात. ज्या मेंढी पालकाच्या मेंढ्यांनी हा नारळ शिवला त्याला विजेता म्हणून घोषित करण्यात येते.अशी ही नरवणे गावची परंपरा आहे.
मध्यंतरी दोन वर्ष कोरोणाच्या महामारी मुळे अशा पद्धतीचे कार्यक्रम होऊ शकले नाहीत परंतु या दिवाळी पाडव्याला मात्र नरवणे सर्वेश्वर मंदिराच्या समोरच्या मैदानात रसिकांनी सजले धजलेल्या आणि पळणाऱ्या मेंढ्या पाहण्याचा मनमुराद आनंद लुटला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळी उत्सुकता आणि आनंद ओसंडून वाहिलेला पाहण्यात आला. या कार्यक्रमासाठी सुमारे पंचवीस मेंढ्यांचे कळप सहभागी झाले होते . वाजत गाजत मेंढ्यांचे कळप मंदिराला प्रदक्षिणा घालत होते .
आकर्षक रंगरंगोटी करून मेंढ्या सजवल्या होत्या आणि माझ्या कळपातील मेंढ्यानीच हा तोरणा चा नारळ स्पर्श करावा, अशी प्रत्येक पालकाची इच्छा होती आणि यातच गुलाब महानवर यांच्या मेंढ्यानी हा नारळ स्पर्श करण्याचा मान मिळविला. यानंतर गुलाब महानवर यांचा उत्साह पाहण्यासारखा होता.
पाडव्याला मेंढ्या पळवायच्या याची तयारी खूप दिवस आगोदरच होत असते. सुरुवात होते , मेंढ्यांना तळ्यावरती नेऊन स्वच्छ धुऊन घेतलं जातं त्यानंतर त्यांना आकर्षक रंगाने रंगवलं जातं आणि मग प्रत्यक्ष पाडव्यादिवशी या मेंढ्या वाजत-गाजत मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी तयार केल्या जातात .
अशा पद्धतीने नरवणे गावात दिवाळी पाडवा वेगळ्या उत्साहाने भरलेला दिसला.
चौकट – ” मी एक मेंढी पालक आहे . माझ्याकडे असलेल्या मेंढ्या या मला माझ्या अपत्या सारख्या आहेत. मेंढी पालन करणे ही माझी आवड आहे. आणि त्यातून मी माझी संस्कृती देखील जपतो .नव्या पिढीला संस्कृती शिकवत आम्हाला विज्ञान-तंत्रज्ञान हेही शिकवायचे आहे आणि आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होता कामा नये हेही यानिमित्ताने सांगायचे आहे .
(मेंढी पालक – सुरेश नारायण करे नरवणे.)







