मायणी येथे पत्रकार संघाकडून बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
मायणी :- प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणाऱ्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पवित्र स्मृतीस मायणी येथील पत्रकार संघाकडून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी मायणी परिसर पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप पुस्तके, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सातारा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कोळी त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राज्य मुख्य संयोजक डॉ. विश्वदीप आपगे, त्याचबरोबर सातारा जिल्हाध्यक्ष रुपेश पुंडेकर,तालुकाध्यक्ष डॉ. संतोष डांगे,राज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजाराम कचरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप पुस्तके म्हणाले, मराठी पत्रकारितेची सुरुवात करताना आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी अत्यंत कमी वयामध्ये महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून स्वातंत्र्य चळवळीमधील जनतेला संघटित करण्याचे पाऊल उचलले होते.आज आंतरराष्ट्रीय पातळीवर आधुनिक मीडियाचा मोठा प्रसार झाला असून वृत्तपत्रांची विविध माध्यमे आज आपल्याला पाहायला मिळतात. बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा आजही महाराष्ट्रातील सर्व पत्रकार जोपासत आहेत आणि मराठी पत्रकारितेची दिशा समाजमनावर आजही कोरलेली दिसून येते यामुळे ,हा वारसा यापुढेही नेण्याचं काम सर्व पत्रकारांनी करावे.
डॉ. विश्वदीप आपगे म्हणाले,पत्रकार हा समाजाचा आरसा असून या पत्रकारितेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेला न्याय मिळवून देने याचबरोबर जगभरामध्ये घडणाऱ्या घटना आज तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचं हक्काचे व्यासपीठ म्हणून वृत्तपत्राला पाहिले जाते आणि या वृत्तपत्रासाठी काम करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.परंतु पत्रकारांचीही अनेक प्रश्न प्रलंबित असलेले पहावयास मिळते मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून आम्ही शासनास पत्रकारांनाही मदत करण्यासंबंधी प्रयत्न करण्याची विनंती करणार आहोत.
यावेळी पत्रकार विशाल चव्हाण ,पत्रकार मंगेश भिसे ,पत्रकार दीपक नामदे,पत्रकार पांडुरंग तारळेकर, पत्रकार सतीश डोंगरे, राजू जाधव यांची यांचीही उपस्थिती होती. प्रास्ताविक व आभार संतोष डांगे यांनी केले.







