मोराळेची जि.प.शाळा राबवतेय विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम
वृक्षारोपण,व्याखाने यामुळे वाढते आहे शिकण्याची गोडी
मायणी:- सतीश डोंगरे
शालेय जीवनातील महत्वाचा टप्पा म्हणजे प्राथमिक शिक्षण.जिल्हा परिषदेतील लहान विद्यार्थांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी शिक्षक-शिक्षिका अनेक उपक्रम राबवित असतात.मोराळे,ता-खटाव येथील शिंदेमळा याठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या “प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेत बालसंस्कारपर व्याख्याने” या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
शिंदेमळा(मोराळे)या जि.प.शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश भोंगाळे यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर बालसंस्कार व्हावेत या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या जीवनातील आतुरतेचा दिवस म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या ‘वाढदिवसाच्या दिवशी विविध बाल मनाला भावतील ,समजतील अशा विषयांना घेऊन अनेक वक्त्यांकरवी व्याख्यानांचे आयोजन करण्यास सुरुवात केली.
यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने पालक स्वतः या व्याखान्यांना हजेरी लावू लागले त्याच बरोबर यादिवशी अनाठायी होणार खर्च टाळून शाळेस मदत करू लागल्याने शाळातील विद्यार्थ्यांना अनेक शालेय वस्तू मिळू लागल्या तसेच त्यांच्या ज्ञानातही भर पडू लागली. आजवर अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘गडकिल्ले,छत्रपती शिवाजी महाराज’विविध पर्यटनस्थळे,वृक्ष म्हणजे आपले मित्र,पर्यावरण,यासह अनेक विषयांची चर्चा या व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना झाल्याची माहिती मुख्याध्यापक प्रकाश भोंगाळे यांनी दिली.
यावेळी बोलताना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाचा पाया या प्राथमिक शाळेत घडत असतो,मुख्याध्यापक भोंगाळे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक असून यामुळे कोरोना काळात विद्यार्थ्यी व शाळा यांच्यामध्ये निर्माण झालेली “दुरी” संपुष्टात येऊन विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा शाळेची गोडी निर्माण झाली आहे.
या उपक्रमाच्या निमित्ताने सरपंच संदीप शिंदे,उपसरपंच प्रेमला निकम,किरण निकम,दादासो शिंदे, अमोल शिंदे, केंद्र संचालक संजय पाटोळे,गडकिल्लेप्रेमी दत्ता कोळी,दशरथ शिंदे,सौ उज्वला शिंदे यांनी शाळेस भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले असून सहशिक्षक सुनिल धर्माधिकारी यांनी बालसंस्कार या उपक्रमास सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.







