मायणी वनविभाग गांधारीच्या भूमिकेत :कारभाराचे अजब नमुने
उपवनसंरक्षकांनी केलेल्या आवाहनाचा स्थानिक वनविभागाला विसर
मायणी :- दत्ता कोळी

दरवर्षी महाराष्ट्र शासन करोडो रुपये पर्यावरण संवर्धन आणि पक्षी व वन्यजीव संरक्षणासाठी खर्च करीत आहे.हे कार्य स्थानिकांच्या सहकार्याने साध्य होण्यासाठी त्या त्या भागातील सामाजिक व पर्यावरणीय समतोल राखणाऱ्या संस्थांना शासन आवाहन करून या पर्यावरण संवर्धन चळवळीत सहभागी व्हा व निसर्ग वाचवा हा संदेश देत आहे. सातारा जिल्हा वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनीही शासनाच्या या धोरणाचा अवलंब करीत मायणी समूह पक्षी संवर्धन राखीव क्षेत्राच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत स्थानिक संस्था व निसर्गप्रेमी यांना पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात होण्याचे आवाहन केले होते. मायणी व परिसरात कार्यरत असणाऱ्या अनेक युवक ग्रुप, मंडळे,सामाजिक संस्था यास प्रतिसाद देत मायणी वनविभाग क्षेत्रात काम करण्यात उत्सुक आहेत. परंतु स्थानिक वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांच्या उदासीनतेच्या धोरनाने शासन व वनविभाग जिल्हाप्रमुखांकडून करण्यात येणाऱ्या निसर्ग संवर्धनासाठी पुढे येण्याच्या आवाहनाचा स्थानिक वनविभागास विसर पडला का काय? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
"वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे*या ब्रीदवाक्याने कार्यरत राहणाऱ्या वनविभागाची निर्मिती ही वन,वन्यजीव व त्याला आधोरोखीत करणाऱ्या ठिकाणांना संरक्षित करण्यासाठी झाली आहे. भारत देशात अनेक प्रदेश आपापल्या भागातील निसर्ग संपदा व वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहेत.याप्रमाणेच सातारा जिल्ह्यातील दुष्काळी खटाव तालुक्यातील मायणी व परिसरात मृगजळ ठरावे असे मायणी पक्षी आश्रयस्थानाची निर्मिती झाली आहे.दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या या परिसरात आजही वनसंपदा आजही टिकून आहे त्याचबरोबर काही जंगली प्राण्यां बरोबर स्थानिक पक्षीच्या प्रजातींच्या सोबत परदेशी पक्ष्यांना आकर्षीत करण्यासाठी हा भाग प्रसिद्ध आहे.
राखीव क्षेत्राचा दर्जा मिळून दीड वर्ष उलटले तरीही कोठेही फलकाद्वारे त्याची प्रसिद्धी नाही
गेल्या पंधरा महिन्यांपूर्वी मायणी सह सुर्याचीवाडी,कानकात्रे,येरळवाडी या परिसरास “पक्षी संवर्धन राखीव वनक्षेत्राचा ‘(काॅन्झर्वेशन रिझर्व्ह’) दर्जा मिळाला असून यामुळे जगाच्या नकाशावर मायणी सह इतर परिसर ठळक बनला. परंतु ,वनविभागाकडून याची माहितीदेणारा कोणताही माहितीफळक लावण्यात आलेला नसून संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातून याठिकाणी येणाऱ्या पक्षीतज्ञ ,पक्षी निरीक्षक ,पर्यटकांना याठिकाणची कोणतीही माहिती मिळत नाही.

मुख्य गेट खुलेच ,आवो जावो घर तुम्हारा. अनैतिकतेला मिळतेय प्रोत्साहन,सुरक्षा रामभरोसे
मायणी पक्षी आश्रयस्थान हे ६५ हेक्टर परिसरात विखुरले गेले आहे.याला प्रमुख चार प्रवेशद्वार आहेत. या प्रवेशद्वाराची अवस्था “कुलपाविना तिजोरी” अशी आहे. मुख्य बगीचा,तलाव व पक्षी पाहणी टॉवर याकडे जाणारे मुख्य प्रवेशद्वार सताड उघडे असल्याने कोणीही ,वनविभागाच्या कोणत्याही परवानगी शिवाय आपली दुचाकी घेऊन वनविभागात राजरोसपणे जाऊ शकतो. कुठे जुगार तर कुठे मद्यपान केले जाते.याचबरोबर प्रेमीयुगलांसाठी तर हा शासकीय संरक्षण देणारा अड्डाच बनला आहे.या वनविभागाच्या भोवतालचे असणारे कुंपण अनेक ठिकाणी पाडण्यात आले असून वनविभागाच्या आशीर्वादाने मायणी -म्हसवड व मायणी-पंढरपूर या दोन रस्त्यांच्या पलीकडे असणाऱ्या तलावाकडे गुरेराखी आपली गुरे पडलेली कुंपणे व रस्ते ओलांडून खुलेआम जातात.हे २००मीटर वर असलेल्या वनविभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांना हे दिसू नये ,हे नवलच म्हणावे लागेल. “कुंपनच शेत खाई” या म्हणीचा प्रत्येय याठिकाणी येतोय.
पर्यटकांच्या नोंदीचे रजिस्टरच नाही

अनेक पर्यटनस्थळ अधोरेखित व चर्चेस येण्याचे कारण त्या ठिकाणचे महत्व व या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या होणाऱ्या नोंदी. येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येचा अभ्यास करून याठिकाणी येणाऱ्या लोकांना सोयीसुविधा व सुरीत्या पर्यटन व्हावे यासाठी शासन निधी देत असते. परंतु मायणी पक्षी आश्रयस्तनात येणाऱ्या पर्यटकांच्या कोणत्याही नोंदी होत नाहीत. संवर्धन संबंधी काही महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत उपवनसंरक्षकानी हे पर्यटक नोंदीचे रजिस्टर स्थानिक वनक्षेत्रपाल व वनपाल यांना मागितले असता. स्थानिक अधिकाऱ्यांना ते त्यांना देता आले नाही.यासंबंधी मायणी येथील सामाजिक संस्थांनी एकत्र येत सुरक्षा रक्षक व पर्यटक संख्या नोंदीचे रजिस्टर ठेवण्यात यावे अशी मागणी केली होती.परंतु यावर अनेक महिने उलटले,आजही याठिकाणी येणारे पर्यटक, पक्षीमित्र,निरीक्षक,स्थानिक रहिवाशी यांची कोणतीही नोंद होत नाही. स्थानिक वनाधिकाऱ्यांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.

गावातील युवकवर्ग व संस्थांनी एकत्र येत केलेल्या मुख्य जुन्या बगीच्यात पुन्हा दुरवस्था
मायणी येथील राज सामाजिक संस्था,शिवनेरी ग्रुप,जगदंब ग्रुप,सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप,विनायक दुर्गामाता ग्रुप,मानवाधिकार संघटना,भूमाता ब्रिगेड,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,राजेप्रतिष्ठान,वजीर ग्रुप ,फ्रेंड्स ग्रुप,मेडिकल असोसिएशन या स्थानिक सामाजिक संस्था ,मंडळे,युवक ग्रुप यांनी एकत्र येत 12 वर्षापासून दुरवस्था झालेली वनविभागातील मुख्य बगीचा अनेक दिवसाचे श्रमदान करून स्वच्छ केला. त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था करणारी टाकी दुरुस्ती, संपूर्ण बागेत वृक्षारोपण,पर्यटक बैठक व्यवस्था, बागेची रंगरंगोटी,पूर्वीची चांद नदी परिसरातील रोपवाटिका परिसर स्वच्छता, तसेच कुंपणांची दुरुस्ती व पक्षांना राहण्यासाठी घरटी ठेवणे अशी अनेक कामे केली होती. परंतु आज याला काही महिने उलटले या बागेची अवस्था पूर्वीप्रमाणेच विद्रुप झाली आहे. संस्थांनी एकत्र येऊन वनविभागास सहकार्य करण्याच्या आवाहनास स्थानिक वनविभागाने सपशेल नाकारले असून यामुळे वरील श्रमदान करणाऱ्या युवक वर्ग ,संस्थांच्यात नाराजगी पसरली आहे.

पक्षी,प्राणी,वनराई वाचवणाऱ्या प्राणीमित्रांचा सन्मान नाहीच
या परिसरात सापडणारे जखमी पक्षी, कासवे ,सर्प व अन्य जीवांना जीवदान देऊन वनविभागाच्या सुपूर्त करणारे,वनपरिसरात वणवा लागल्याचे माहिती होताच वनविभागाकडे धावणारे युवक व निसर्गप्रेमी यांच्या या निस्वार्थ मदतीचा सन्मान करून समाजातील या घटकांना प्रोत्साहन देण्याविषयी वनविभाग उदासीन आहे. अनेक ठिकाणी वन्यजीव, वृक्ष यांचा जीव वाचवणे हे राष्ट्रीय कर्तव्य पार पडणाऱ्या नागरिक, युवकांचा सन्मान करण्यात आल्याचे पाहण्यात आले आहे.परंतु स्थानिक वनविभाग यापासून अनभिज्ञ असलेला पहायला मिळतो. सामाजिक जाणिवेतून प्राणी,पक्षांच्या होणाऱ्या तस्करीच्या घटनांना या उपक्रमामुळे आळा बसू शकतो व समाजात अशा अवैध घडणाऱ्या गोष्टींच्या विरोधात कार्य करणारे हे निसर्गमित्र वनविभागाचे गुप्तहेरही ठरू शकतील.
मुख्य वनबगीच्यात युवकांनी केलेले वृक्षारोपण पाण्याअभावी जाळले,वनविभाग गंधारीच्या भूमिकेत
शासन पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध संकल्पना राबवित वृक्षारोपण करीत आहे.वनविभाग,सामाजिक वनीकरण मार्फत सर्वत्र वृक्षारोपण केले जाते. मायणी पक्षी आश्रयस्थानाचा मुख्य बगीच्यात मायणी गावातील संस्था व युवक वर्गाने अनेक वृक्षांचे वृक्षारोपण केले होते. बागेच्या वृक्षांना पाणी मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून बंद असलेली पाण्याची व्यवस्था या युवकवर्गाने दुरुस्त केली होती. परंतु यानंतर सामाजिक संस्थांकडून संकल्पीत केलेल्या अनेक बाबींना वनविभागाने खो घातल्याने या सामाजिक संस्था व युवक वर्गाने याठिकाणचे आपले कार्य थांबवले. वनविभागाच्या मुख्य बगिच्यात पाण्याच्या टाकीपासून 100 फुटावर असलेली श्रमदान करून लावलेली ही फुला फळांची झाडे ” आपल्या गेस्ट हाऊसच्या नूतनीकारणात मग्न होऊन आपले विशेष कर्तव्य बजावणाऱ्या” संबंधित विभागाने पाणी न दिल्याने जळून गेली आहेत. समाजास करण्यात येणारे संवर्धन कामी पुढे येण्याचे शासनाचे आवाहन त्यांच्याच विभागामार्फत खोडले जात आहे.हे दुर्दैव आहे.
चौकट:-
“उपवनसंरक्षक काय भूमिका घेणार”
मायणी समूह राखीव पक्षी संवर्धन क्षेत्र संबंधी चर्चा करण्यासाठी शुक्रवारी दि – ४ मार्च रोजी उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांचे मायणी याठिकाणी आगमन होणार आहे. मायणी येथील वनसंवर्धन व लोकसहभागासाठी उदासीन असणाऱ्या स्थानिक विभाग अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत दैनिक तरुण भारतच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या सडेतोड भूमिकेविषयी उपवनसंरक्षक मोहिते काय भूमिका घेणार ते आता पहावे लागेल.
फोटो – ग्रुप फोटो १) अस्ताव्यस्त असलेली अनेक वर्षांपासूनची दुर्लक्षित मुख्य बगीचा.
ग्रुप फोटो२)गावातील सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन स्वच्छ केलेला सदर बगीचा परिसर.
३) मुख्य गेट मधून विना रजिस्टर नोंदी व सुरक्षेविना
बिनधास्त दुचाकी घेऊन वनविभागात जाणारे युवक..
४)पर्यटकांच्या गैरसोयी करणारे नादुरुस्त स्वच्छतागृह
५) युवकांनी लावलेली वृक्षांना पाणी घालण्यात वनविभागाने केल्याने बागेजवळ पाण्याची टाकीतुन विनावापर वाया जाणारे पाणी.
६)युवकांनी संवर्धन केलेली बाग व व सध्याची बागेची झालेली पूर्वीप्रमाणे दुरवस्था.







