महिला दिनादिवशी सुद्धा मेंढपाळ महिलांचा संसार उघड्यावर
शासनाच्या आरोग्याच्या सुविधामोफत मेंढ्यांना तपासणी, विमासंरक्षण देण्याची गरज
बिदाल प्रतिनिधी (आकाश दडस ):
आठ मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून सर्वत्र केला जातो. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करतात. मात्र, मेंढ्यांच्या मागे पोटची खळगी भरत दिवसरात्र काबाडकष्ट करणाऱ्या मेंढपाळ महिलांकडे कुणी लक्ष सुद्धा दिले नाही.अनेक महिलांच्या सत्काराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतील. मात्र मेंढपाळ महिला अजून सुद्धा कामात व्यस्त आहेत.मेंढपाळ महिलांना त्यांच्यासाठी कोणता दिवस स्पेशल असतो, हे माहिती देखील नसतं.येणारा प्रत्येक दिवस हा जगण्यासाठी त्यांना आव्हान घेऊन येत असतो.
मेंढपाळ व्यवसायीक हा आगळवेगळ अस्तीत्व तयार करणारा आहे. मेंढी अन मेंढपाळ यांच नात जीवाभावाच नात बनत जात. कळपात एखादी मेंढी जरी आजारी पडली तरी त्या मेंढपाळाला कळत. रानावनात जाताना एका मेंढरा माग सगळ्या मेंढ्या जातात. त्यावेळी त्यांची शिस्तबद्धता समजून येते. खेडोपाडी अशी व्यवसायीक चारा धुंडाळत फिरताना दिसतात. शेतात चारा असेल तर शेतकरी देखील त्यांना आवर्जून आमंत्रीत करतो. त्यामुळे खताची उपलब्धता होऊन शेती उत्पादनाला फायदा होतो. उन, वारा, पाऊसाची तमा न बाळगता त्याची भटकंती ही सुरूच असते. या भटकंतीला खरी जोड मेंढपाळ व्यवसायीकाच्या पत्नीची घरातील महिलांची ठरते. कर्तत्वान माणसाच्या मागे स्त्रीचा मोलाचा वाटा असतो. अस म्हटल जात. मेंढपाळ व्यवसाय तर या महिलांच्या कर्तृत्वाचा ठसा ठरलेला पहावयास मिळतो.
मेंढपाळाच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या ठरलेल्या असतात. जिथे जाईल तिथलं पाणी त्यांना प्यायला भाग पडते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या लवकर उद्भवतात. या समस्या सोबत घेऊनच जीवनाचा रहाटगाडगा चालवावा लागतो.
घोड्यावर तंबू, काठ्या, कोंबड्या, नवाजात मेंढ्या, संसार उपयोगी वस्तू, देवघर या बरोबर चिमुकली मुले घेऊन दररोज नवीन गावचा प्रवास अनेक समस्यांच माहेर घर असल्या सारख वाटतो. दररोज नवीन गावात जाऊन ठिकाण शोधायच. उभ्या पिकात जनावर गेल्यावर वेळ प्रसंगी बोलणी खायची. मुक जनावर हाय त्याला काय कळतय का अस म्हणत वेळ मारून न्यायचा. जनावर बसायला जागा मिळाली की तिथच आपल बिऱ्हाड थाटायच. तीन दगडाची चूल करायची जवळच असणाऱ्या काड्या कुड्या गोळा करायच्या त्याचच इंधन म्हणून वापर करायचा. गाव जवळ असल की तेल मिठ मिरची नाहीपेक्षा मिळेल त्याच्यावर आपली उपजीवीका करायची. पण या महिला मात्र मेंढपाळ धन्याला साथ देण्यासाठी सगळ ओझ घेऊनच चालत असतात. त्यामुळे त्यांच्या चटणी मिरची च्या भाकरीत देखील अनोखी चव दडलेली असते. चिमुकल्यांना उभ करण्याची त्यांची जिद्द ही अनोखी असते.
या मेंढपाळ महिलेचा बारा ही महिने सुरू असणारा हा प्रवास अनोखा दिसतो. सोबतचा प्रवास करत असताना पतीला साथ देण्यासाठी वेळप्रसंगी कोणत्याही समस्यांना शारीरिक, मानसिक धैर्याने सामोरे जाण्याची ताकद मेंढपाळ महिलाकडे असते.भाकरीचा चंद्र शोधताना तिच कर्तृत्व मोलाच असल्याचच दिसून येत.
चौकट
कर्तत्वान माणसाच्या मागे स्त्रीचा मोलाचा वाटा असतो.मेंढपाळ महिलांना महाराष्ट्र शासनाच्या व केंद्राच्या कोणत्याही आरोग्याच्या सुविधा मिळत नाही तरी शासनाने आरोग्याच्या सुविधा, मोफत मेंढ्यांना तपासणी, विमासंरक्षण हे मेंढपाळांना दिले पाहिजे ही आमची मागणी आहे.
कृष्णाबाई दादा पडळकर मेंढपाळ व्यवसायिक महिला,







