दोन वर्षानंतर रंगपंचमीनिम्मित सर्वत्र रंगांची उधळण
पाण्याचा अपव्यय टाळून जागतिक जल दिन साजरा
मायणी :- दत्ता कोळी
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्वच सणांवर व सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लागल्याने जनता इच्छा असूनही आरोग्याच्या प्रश्नामुळे सणांच्या निमित्ताने असणाऱ्या उत्साहावर मुरड घालत होती. परंतु यंदा कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव या कारणाने शिथिल झालेले निर्बंध यामुळे गत दोनवर्षापासून मुरड घातलेल्या उत्साहास मोकळी वाट करून देत मायणी व परिसरातील आबालवृद्ध ,युवकांनी मोठ्या उत्साहात यंदाची रंगपंचमी धुमधडाक्यात साजरी करीत आनंदाच्या रंगांची उधळण केली.

यंदा रंगपंचमीचा युवकवर्गात मोठा उत्साह होता,व्यापारी वर्गात,प्रत्येक घराघरात रंगपंचमी साजरी केली जात होती. याचबरोबर आजच्या दिवसाचे महत्व “जागतिक जल दिनाचेही होते. प्रतिवर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो.स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाच्या निमित्ताने दिला जातो.

आजच्या जागतिक जल दिन व रंगपंचमीचे एकाच दिवशीचे औचित्य साधून मायणी येथील सामाजिक कार्यकर्ते महेश जाधव यांनी पाण्याचा अपव्यय टाळून रंगपंचमी साजरी करावी असा संदेश दिला होता. या संदेशास सर्वत्र प्रतिसाद मिळत युवक व ग्रामस्थांनी पाण्याचा अपव्यय टाळीत सुक्या रंगांचा वापर केल्याचे सर्वत्र दिसून आले.

सण निर्बंध शिथीलतेने साजरे करण्याची दोन वर्षातून पहिल्यांदाच मिळालेली शासनाकडून परवानगी व संत यशवंतबाबा यात्रेतील पुण्यतिथीचा दिवस आणि मातोश्री संत सरुताई यांचा गुरुवारी प्रकटदिनाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे ,भक्तीभावाचे व आनंदाचे वातावरण आहे.







