२९ वर्षानंतर दहावी बॅच विद्यार्थी -विद्यार्थिनी एकत्र
-महाराष्ट्र हायस्कूल खोजेवाडी शाळेस दिली भेट
मायणी :- तानाजी चव्हाण
सन १९९२-९३ बॅचच्या महाराष्ट्र हायस्कूल खोजेवाडीचे विद्यार्थी विद्यार्थिनी तब्बल २९ वर्षानंतर एकत्र येत याठिकाणी शालेय आठवणींना उजाळा देत स्नेह मेळावा पार पडला.
शालेय जीवनातील महत्वाचा टप्पा म्हणजे दहावी ,यानंतर उच्चमाध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनी विखुरले जातात.शिक्षण,व्यवसाय नोकरी,नंतर वैवाहिक जीवनाच्या घोडदौडीत स्वतःच्या शालेय बालपणाच्या आठवणी विरून जाऊन मित्र मैत्रिणी यांच्या भेटीगाठी या दुर्मिळ होऊन जातात.या सर्व बाबीनां व जुन्या बागडलेल्या मैदानातील आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्या उद्योग व्यवसायात विखुरलेल्या आपल्या विद्यार्थी मित्र मंडळींनी सर्वांना संपर्क करीत आपल्या खोजेवाडी शाळेत तब्बल २९ वर्षानी एकत्र येत या सर्व आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमास मुख्याध्यापक कांबळे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थाचे आजीव सदस्य मा.रमुगडे सर, कदम सर, यादव सर, साळुंखे सर,गायकवाड सर,मांजरे सर,अशोक घाडगे सर व माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
२९ वर्षांनी एकत्र आल्यानंतर एकमेकांची वाढलेली वय ,देहबोली यावरून या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींच्यात चांगलाच हास्यकल्लोळ चालला.यावेळी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना पुन्हा ताजे केले.तसेच शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी टीव्ही संचही भेट दिला.
यावेळी जीवनाच्या भागदौडीत पुन्हा एकदा भेटण्याच्या निश्चयाने या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षक ,शाळा व एकमेकांचा जड अंतकरणाने निरोप घेतला.
सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन अंजनकुमार घाडगे यांनी केले तर प्रास्ताविक दादासो गवळी आणि उपस्थितांचे आभार शकुंतला घाडगे-कणसे यांनी मानले.







