रात्रभर गटारीत अडकलेला तरुण दुसऱ्या दिवशी सकाळी सापडला.
(सातारा)संदीप सर्जेराव जांभळे असे या युवकाचे नाव आहे. तो काल सायंकाळी पोवईनाका परिसरातील या गटरात पडला होता. काय आहे संपूर्ण प्रकरण – संदीप सर्जेराव जांभळे हा युवक काल सायंकाळी पोवईनाका परिसरातील या गटरात पडला होता. मात्र, बंदिस्त गटारामुळे त्याला बाहेर येता आले नाही.
पावसाच्या पाण्याचा गटारातील प्रवाहामुळे तो आज सकाळी 9.30 वाजता वाहत जिल्हा शासकिय रुग्णालयापर्यंत पोहचला. तेथे थोडेफार गटर फुटलेले असल्यामुळे त्याने तेथून येणाऱ्या जाणाऱ्यांना गटरातून आवाज देण्यास सुरुवात केली. त्याच ठिकाणी काही रिक्षाचालक रिक्षा लावून ग्राहकांची वाट पहात होते. याचवेळी त्यांना गटारातून आवाज ऐकू आला.
यानंतर त्यांनी या गटराच्या फटीजवळ जाऊन पाहिले असता आतून एक युवक ओरडत असल्याचे दिसले. त्यानंतर रिक्षाचालकांनी त्याला तसेच पुढच्या फटीपर्यंत येण्यास सांगितले. तेथे फक्त त्याचे तोंड वर येऊ शकले. लोकांनी आपल्याला पाहिल्यामुळे तो आनंदी झाला.
त्याने लोकांना मला बाहेर नंतर काढा, पहिल्यांदा पिण्यासाठी पाणी द्या, अशी याचना केली. त्याला लगेचच पाणी पाजण्यात आले. नंतर त्याला बिस्किटही देण्यात आले. एका ठिकाणची फर्शी फोडून त्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले.







